केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे काल संध्याकाळी इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाईन बिएनाले-2023 (IAADB ‘23) या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘कर्टन रेझर’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रमाच्या लोगोचेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि वायव्य प्रदेशातील राज्यांच्या विकास विभागाचे मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घोषणा केली की, सांस्कृतिक मंत्रालय इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाइन बिएनाले या कार्यक्रमाचा प्रारंभ डिसेंबर 2023 मध्ये करणार असून या कार्यक्रमांतर्गत दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. त्यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या.
परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी कार्यक्रमात बीजभाषण केले. इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाइन बिएनाले कार्यक्रम भारताच्या उत्सव संस्कृतीमध्ये दीपस्तंभ म्हणून काम करेल ज्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताच्या अलौकिक अशा वास्तुशिल्प आणि कलेचे प्रदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय समकक्षांच्या भव्यतेला प्रतिबिंबित करणारा ठरणार असून यामुळे केवळ प्रेरणाच नव्हे तर मोठा बदल देखील अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे भारतातील तळागाळातील कारागीर आणि समकालीन डिझायनर यांना सहभागी करून त्यांच्यात परस्पर संवाद, नावीन्य आणि सहयोगाची सुरुवात होईल, ज्यामुळे सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
या कार्यक्रमात डिप्लोमॅट्स, कलाकार, वास्तुविशारद, डिझायनर, क्युरेटर, सरकारी अधिकारी, गॅलरिस्ट आणि संग्रहालय कामकाजाशी संबंधित व्यावसायिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. यावेळी ‘कॅपिटल थ्री’ या जॅझ संगीत कलाकारांनी आपल्या मनमोहक संगीताने या कार्यक्रमाची रंगत वाढवली.