कोरोना काळात मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची परिसीमा गाठत मयतावरच्या टाळूवरचे लोणी खायचे प्रकार झाले आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाईट्सपेक्षाही सुरस आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.
तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोकपर्व चमकले पण मराठापर्व रखडले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी केली. डिजिटल स्कूलच्या गमजा मारणाऱ्यांनी राज्यातील शिक्षणाला थर्ड क्लास बनवलं, ही वस्तुस्थिती आहे. कोविड काळात कफनचोर, खिचडीचोर ही बिरुदेही कमी पडतील, असा मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केला. ऑक्सिजन प्लान्ट उभारणीतही यांनी भ्रष्टाचार केला.
उत्तर प्रदेशमधील एका कंपनीने स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी घेऊन कामे केलीत. मी काही नावे वगळली आहेत. आदित्यराजाच्या कृपेने वरुणराजाने टेंडरचा पाऊस पाडला. या सर्व गोष्टीत महत्त्वाचे प्यादे आहे तो रोमिल छेडा. जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकल्पापासून ही कथा सुरू होते. या हाय वे बनविणाऱ्या कंपनीला पेंग्विन आणायचे काम दिले. चार वर्षांत रोमिल छेडाला ऑक्सिजन प्लान्ट उभारायचे कामही दिले. रस्ता बांधणाऱ्यांना पेंग्विनचे काम, प्राणवायूचे काम.. सगळे दिले. गंमत म्हणजे त्याचे बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर हे कपड्याचे दुकान होते. कपड्याचे दुकान होते त्या रोमिल छेडाच्या खात्यात दोन टक्के सोडून बाकीचे पैसे वळवण्यात आले.
प्राणवायू प्लान्टचे साठ कोटीचे काम जुलैऐवजी ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले. पण ते ऑगस्टमध्येच पूर्ण झाल्याचे दाखवून फक्त तीन कोटी रुपये दंड लावण्यात आला. काम पूर्ण झाल्याच्या दाखल्याच्या आधारे ऐंशी कोटींचे काम देण्यात आले. रस्ते बांधण्याच्या कामातील माणसाला रोबोटिक झू, प्रशासकीय कार्यालय, लांडगे, कोल्हे, बिबटे, एक्झिबिशन हाऊस, रेपटाइल हाऊस ही सर्व कामे दिली. पेंग्विन कक्षाच्या देखभालीचे काम दिले गेले, असे ते म्हणाले.
गंजलेला प्राणवायू प्लान्ट दिल्याने काही लोकांचे डोळे गेले तर काहींचे जीव गेले. पण, त्यांना मतलब फक्त पैशाशी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सगळे टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी आणि जनता फिरतेय दारोदारी… अशी स्थिती या लोकांनी करून टाकली. रस्ते बनणाऱ्या कंपनीला प्राणवायू बनवायचे काम देऊन संपूर्ण व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेय. लाईफ लाइन नव्हे तर डेथ लाइन होती. लाईफलाइनच्या सुजीत पाटकरांनी तर भ्रष्टाचारांचा उच्चांकच गाठलाय. काल्पनिक रुग्ण, काल्पनिक डॉक्टर आणि औषधेही वितरित केल्याचे दाखवले त्यांनी. त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
घरी बसून एक नंबरचा सीएम, असा नंबर कसा मिळवला, तर तो नंबर पुढून नाही तर पाठून होता. सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाने कंत्राट. खिचडी तीनशे ग्रामऐवजी शंभर ग्राम दिली गेली आणि ज्या पर्शियन दरबारच्या नावाने किचनचा पत्ता दिला त्यांना त्याचा पत्ताच नाही. त्यांनी तसे प्रतिज्ञापत्रच दिले आहे. युवा नेते पारखी असल्याने रेमडिसिव्हरचे काम एका पुण्यवानाला दिले गेले, अशी उपहासात्मक टीका मुख्यमंत्री शिन्दे यांनी केली.
धारावीतील अधिकृत-अनधिकृत अशा सर्व रहिवाशांना पुनर्विकासानंतर घरे मिळणार असून अनधिकृत रहिवाशांना दहा किलोमीटर परिसरात भाड्याची घरे मिळणार आहेत. दहा लाख लोकांच्या जीवनाशी निगडित हा प्रकल्प असल्याने ही गोष्ट लोकांना समजल्यावर मोर्चातेल लोक उलट्या दिशेनेही मोर्चा काढू शकतात याचे भान या लोकांनी ठेवावे, असा इसाराही मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी दिला.