Homeटॉप स्टोरीममता-पवार भेटीनंतर काँग्रेस...

ममता-पवार भेटीनंतर काँग्रेस बिथरली! आघाडीला धोका?

राज्याच्या सत्तेचे सूत्रधार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तसेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील युपीएचे अस्तित्त्वच नाकारल्यामुळे सत्तेतल्या महाविकास आघाडीतले अंतर्गत मतभेद विकोपाला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर स्वतः शरद पवार यांनीही सध्याचे राजकारण पाहता नेता रस्त्यावर राहिला तरच विजयी होऊ शकतो, असे भाष्य केल्यामुळे पुढच्या काळात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी, ममता बॅनर्जींच्या आघाडीत सहभागी होण्याची दाट शक्यता असून त्यांच्याबरोबरच शिवसेनाही या प्रस्तावित आघाडीत सहभागी होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. या साऱ्या राजकीय घडामोडी पाहता महाविकास आघाडीतले अत्यंत दुय्यम स्थान पुढे किती काळ स्वीकारायचे यावर काँग्रेसचे हायकमांड लवकरच नक्की निर्णय घेईल, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.

ममता बॅनर्जी कालपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सुरू केलेल्या या दौऱ्यात काल रात्री शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. आज दुपारी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी भेट घेतली. तेथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. येथे जवळजवळ तासभर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय स्तरावरील राजकीय परिस्थितीची चर्चा केली. त्यानंतर ममता बॅनर्जी तसेच शरद पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बातचीत केली.

यावेळी ममता बॅनर्जी यांना युपीएबद्दल विचारले असता त्यांनी युपीए काय आहे, असा प्रतीप्रश्न केला. युपीए आता उरली नाही, असेही त्या म्हणाल्या. शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्त्व करावे का, या प्रश्नावरही बोलतानाही त्यांनी याच प्रतीप्रश्नाचा पुनरूच्चार केला. जो प्रत्यक्ष मैदानात राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो खरा विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? असे बोलून त्यांनी राहुल गांधी फक्त एसीत बसणारे नेतृत्त्व असल्याचे सूचित केले.

फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सध्याच्या सत्तेविरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणे अत्यावश्यक आहे. भाजपाविरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून युपीएव्यतिरिक्त वेगळा पर्याय आम्ही देणार आहोत, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

ममता बॅनर्जींच्या मताशी पवार सहमत

ममता बॅनर्जींनंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या मताशी मी सहमत आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी मिळवलेला विजय हेच दाखवतो. तळागाळात काम करणारे लाखो कार्यकर्ते आणि ममता लढल्या, त्यामुळेच ते शक्य झाले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. सध्याचे राजकारण पाहता नेता रस्त्यावर राहिला तरच विजयी होऊ शकतो असे ममता बॅनर्जींशी चर्चा करताना लक्षात आले. येत्या काळात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

आपल्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि कम्युनिस्ट व त्यांच्या मित्रपक्षांना बाजूला ठेवत एक स्वतंत्र आघाडी करून पुढच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पर्याय निर्माण करण्याचाही त्यांचा मानस आहे. याच प्रयत्नात त्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.

मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींच्यांही भेटी घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये उद्योग वाढविण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ममता राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर त्या भर देतील. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुका लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.

ममता

भाजपाविरोधात अहंकाराने लढता येणार नाही – नाना पटोले

भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस सातत्याने लढत आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ते मोदी सरकारविरोधात लढले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही, असा टोलाही त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

सोयीप्रमाणे भूमिका घेऊन लढता येणार नाही – बाळासहेब थोरात

भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या. मात्र तरीही राहुल गांधी मागे हटले नाहीत. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशावेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात?, असा सवालही त्यांनी केला.

काँग्रेसच्या नेतृत्त्वाला कोणाच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही – अशोक चव्हाण

लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्त्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्त्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

गेली ७ वर्षे केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करत आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे, सा टोलाही त्यांनी लगावला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content