Monday, November 4, 2024
Homeएनसर्कलश्रीक्षेत्र भीमाशंकरसह पुण्यातल्या...

श्रीक्षेत्र भीमाशंकरसह पुण्यातल्या ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू!

मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पुणे जिल्हा निमंत्रक ह.भ.प. चोरघे महाराज, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त संगिताताई ठकार, कऱ्हे पठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, श्री चतुःश्रृंगी देवस्थानचे नंदकुमार अनगळ, हडपसर येथील श्री तुकाई देवस्थानचे सचिव सागर तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्याप्रमाणे यापूर्वीच नागपूर, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, कोल्हापूर, यांसारख्या अनेक जिल्ह्यातील मंदिरांमध्येही वस्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि विदेशातील मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय तेथील विश्वस्तांकडून उस्फूर्तपणे घेतला जात आहेत, असे घनवट यांनी सांगितले.

वर्ष २०२०मध्ये शासनानेही राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. देशभरातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीसठाणे आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहितेचे काटेकोर पालन होते. याच धर्तीवर हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांच्या विश्‍वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

घनवट पुढे म्हणाले की, ५ फेब्रुवारी २०२३, यादिवशी ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आल्यानंतर महासंघाचे कार्य राज्यभरात उत्तरोत्तर वाढतच आहे. श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला. मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी हे कसे चुकीचे आहे यासाठी टाहो फोडतात. समाजात भारतीय संस्कृतीविषयी चुकीचे विचार पसरवतात. परंतु मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. मंदिर विश्वतांनी या सर्वांचा अतिशय चांगला विचार केला आणि हा निर्णय घेतला. त्यामुळे येथून पुढे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील आणि संस्कृती रक्षणास मदतच होईल.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्‍वर मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथील श्री घृष्णेश्‍वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्‍वेश्‍वर मंदिर तसेच आंध्र प्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. एवढेच नसून अन्यधर्मियांच्या प्रार्थनास्थळामध्येही वस्त्रसंहिता लागू आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच पायात ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे, हे मान्य करून १ जानेवारी २०१६पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content