Homeकल्चर +इंदिराजींच्या वानर सेनेआधी...

इंदिराजींच्या वानर सेनेआधी उषाबेन महेता यांची मांजर सेना!

मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक उपक्रम राबवले. इंदिरा गांधी यांची वानर सेना स्थापन होण्याच्याही आधी, उषाबेन मेहता यांनी मुंबईत मांजर सेना सुरू केली होती. या सेनेकडे ब्रिटिश पोलीस आणि सैन्याला त्रास देण्याची, त्यांना हैराण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानी रोहिणी गवाणकर यांनी दिली.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील, स्वातंत्र्यलढ्यात 1930 ते 1940 या दशकात, मुंबईतील महिलांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे खूप कौतुक केले होते आणि त्यांचेही योगदान संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल, असे म्हटले होते, अशी आठवणही या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानींनी सांगितली. पीआयबी मुंबईने आयोजित केलेल्या, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे योगदान’ या विषयावरील वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

नेतृत्त्वहीन झालेली चळवळ महिलांमुळे जिवंत

स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या टप्प्यात, सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यास कोणीही उरले नव्हते, अशावेळी, मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी ही चळवळ जिवंत ठेवली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईतील अनेक शूर महिलांनी भाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना सश्रम करावासाची शिक्षादेखील भोगावी लागली होती. मुंबईतल्या पारसी महिला, मादाम कामा यांनी एकटीने जर्मनीत भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवत संपूर्ण देशाला राष्ट्रध्वज फडकावण्याची प्रेरणा दिली होती. दादाभाई नौरोजी यांची नात पेरिन कॅप्टन आणि त्यांच्या दोन भगिनींनी मुंबईत दारोदारी जाऊन खादीचा प्रचार आणि विक्री केली होती आणि ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले होते, अशा प्रेरक आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

गुप्त निरोप पोहोचविणेही फार मोठे काम

रोहिणी गवाणकर यांनी, स्वातंत्र्यलढ्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दलही माहिती दिली. माझ्या एक भावाला तुरुंगवास आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागली होती. दुसऱ्या भावाने पत्री (प्रति) सरकार आंदोलनात भाग घेतला होता. त्यावेळी मी 14 वर्षांची होते. मी सगळ्या लहान मुलांना गोळा करत असे आणि आम्ही सगळे उच्चरवात देशभक्तीची गीते गात असू. पत्री सरकारच्या आंदोलनात मी गुप्त निरोप पोहोचवण्याचेही काम केले होते, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, माहिती आणि प्रसारण मंत्रालय साजरा करत असलेल्या ‘आयकॉनिक विक’चा भाग म्हणून पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक जनसंपर्क विभागातर्फे हे वेबिनार आयोजित करण्यात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आधी होती भारतीय राष्ट्रीय संघटना

या वेबिनारमध्ये बोलताना, इतिहासाच्या अभ्यासक आणि निवृत्त प्राध्यापक अनुराधा रानडे यांनी सांगितले की, 1757 ते 1857 या शतकात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात, 300पेक्षा अधिक छोटेमोठे उठाव या देशात करण्यात आले होते. या लढ्यातली मुंबईची भूमिका विशद करताना त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या योगदानाविषयी सांगितले.

ब्रिटिशांच्या विभाजनवादी आणि अन्याय्य धोरणांना प्रतिकार करण्यासाठी देशाच्या अनेक भागात, अनेक संघटना स्थापन झाल्या होत्या. त्यापैकी एक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसीएशन, 1885 साली स्थापन करण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मूळ नाव, भारतीय राष्ट्रीय संघटना असे होते. मात्र, या संघटनेच्या मुंबईत 1885 साली झालेल्या अधिवेशात, तिचे नाव, इंडियन नॅशनल काँग्रेस असे करण्यात आले. मुंबईतील तेजपाल सभागृहात हे अधिवेशन झाले होते. यात एकूण 72 जण सहभागी झाले होते. त्यातले 18 जण मुंबईतील होते. मुंबई भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होते आणि दक्षिण मुंबईत ब्रिटिशांच्या धोरणांविरोधात अनेक आंदोलने त्यावेळी करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

महालक्ष्मी आणि चौपाटीवर झाला होता मिठाचा सत्याग्रह

अभ्यासक आणि राज्यशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापक अरुणा पेंडसेही या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतल्या स्थानिक नागरिकांनी कसा सहभाग घेतला होता, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

त्यावेळी मुंबईकरांनी महालक्ष्मी आणि चौपाटी इथे मिठाचा सत्याग्रह केला. 1942च्या लढ्यातील घटनांनी मुंबईचे बहुरंगी, बहुसांस्कृतिक एकजिनसी स्वरूप सर्वांना दिसले. महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली गुजराती व्यापाऱ्यांनीही या स्वातंत्र्यलढ्यात पूर्ण सहभाग घेतला होता. मराठी लोकही यात सहभागी झाले होते. व्यापक प्रमाणात राजकीय मोर्चाची सुरुवात त्यावेळी पहिल्यांदा गोवालिया टॅंक म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानापासूनच झाली होती. इथेच आठ ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला होता. त्यानंतर, शिवाजी पार्क आणि इतर ठिकाणी अनेक मोर्चे, रॅली निघाल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफअली आणि उषा मेहता यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली. या लढ्याचे केंद्र मुंबईच राहिली आणि इथूनच हा लढा इतर प्रांतात पसरला, असे पेंडसे यांनी सांगितले.

पत्र सूचना कार्यालयातील सहाय्यक संचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले तर प्रदर्शनाच्या सहाय्यक आरओबी शिल्पा नीलकंठ यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले. माहिती सहाय्यक सोनल तुपे यांनी आभारप्रदर्शन केले.

हा  संपूर्ण वेबिनार https://youtu.be/pVnITlGLAF4 या लिंकवर बघता येईल.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content