पूर्वीच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचेस हे दोन मोठे नेते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक. दोघेही गजाआड राहिलेले.. समदःखी आणि मोकळ्या हवेत लोकशाहीतली मूल्ये जपण्यासाठी विधानभवनात यायला मिळाले म्हणून आनंदीही… महाविकास आघाडी सरकारमधले हे दोघेही पॉवरफुल मंत्री. तेव्हाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिखट हल्ल्याला परतवत सर्व विरोधकांना पूर्ण तयारीनिशी जाणाऱ्या या दोन्ही नेत्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे बराच काळ तुरूंगात गजाआड घालवावा लागला. तोही त्यांचे सरकार असताना… केंद्रीय तपासयंत्रणांच्या दणक्यामुळे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना पदावर असतानाच तुरूंगात जावे लागले.
सरकार बदलले… एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सरकारची वर्षपूर्ती झाली नाही तोच राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर प्रथम अनिल देशमुख व नंतर नवाब मलिकही जामिनावर कारागृहाबाहेर आले. राष्ट्रवादीची दोन शकले झाली. एका गटाचे नेतृत्त्व शरद पवार करत आहेत तर दुसऱ्या गटाचे नेतृत्त्व अजितदादा करत आहेत. दोन्ही बाजूंनी पक्षावर तसेच चिन्हावर दावा करण्यात आला आहे. त्याचा फैसला अजून व्हायचा आहे.
तुरूंगातून जामिनावर का होईना बाहेर आलेल्या या दोन नेत्यांपैकी अनिल देशमुख शरद पवार यांची साथ देत आहेत तर नवाब मलिक अजितदादांच्या गटात सहभागी झाले आहेत. आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे दोन्ही नेते नागपूरला विधानभवनाच्या आवारात दाखल झाले. एकमेकांना असे मोकळे, मोकळ्या वातावरणात बघून त्यांना एकत्रिक फोटो घेण्याचा मोहही आवरला नाही. त्यानंतर उभयतांनी परस्परांची चौकशीही केली. मग कामकाजात सहभागी होण्याकरीता दोघेही आतमध्ये रवाना झाले.