मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करणारे रक्तदान प्रणेते श्रीधर बुधाजी देवलकर यांना ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र जनजागृती ऑनलाईन काव्य स्पर्धा सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि योगेश वसंत त्रिवेदी यांच्या हस्ते मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय सभागृहात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येऊन देवलकर यांना सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरचित रक्तदान स्पर्धा ‘रक्तदानावर लिहू या काही’ या विषयावर रक्तदान जनजागृती काव्य स्पर्धेत कामगार राज्य विमा योजना रुग्णालय कांदिवली (पूर्व) मुंबई येथील सेवानिवृत्त परंतु आजही या पवित्र कार्यात पूर्णवेळ कार्यरत असलेले रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ आणि रक्तदान शिबिरांचे विक्रम प्रस्थापित करणारे देवलकर यांनी आपल्या शासकीय रक्तपेढी विभागातील सेवेतील अनुभव असल्याने आणि ते स्वतः कवी असल्याने त्यांनी या रक्तदान जनजागृती स्पर्धेत भाग घेतला.
रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आलेले रुग्ण व गरजवंत रुग्णांना विनामूल्य रक्तकुपींचा पुरवठा करून रुग्णांना जीवनदान मिळण्याकरिता एक छोटासा प्रयत्न करून रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराच्या आनंदात आत्मिक समाधान मानणारे देवलकर यांनी रक्तदान स्पर्धेत भाग घेताना स्वरचित कवितेतून रक्तदानाचे महत्त्व सादर केले. त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा आणि रक्तपेढी विभागातील जनजागृतीचा अनुभव व त्यांची रक्तदान या विषयावरील स्वलिखत कविता ऑनलाईन व्यक्त झाली. या कवितेची दखल घेऊन देवलकर यांना ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या संस्थेद्वारे मिळालेले सन्मानचिन्ह, सन्मान पदक, सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाच्या संजना वारंग उपस्थित होत्या.