बिहारचे राजकारण आता कोणत्या दिशेला जाईल या संदर्भात वेगवेगळ्या पातळीवर चर्चा होणार आहे. तशी ती सुरुदेखील झाली आहे. बिहार हे सध्यातरी द्विपक्षीय राजकीय मैदान नाही. तीन प्रमुख आणि इतर बारीकसारीक घटक आहेत. एका बाजूला जेवढी ताकद जमा होईल त्यात कमीजास्त होऊन एक बाजू सत्ताधारी होते. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात जे नेतृत्त्व नव्याने पुढे आले त्यात लालू यादव, नितीश कुमार हे प्रमुख. शरद यादव आणि रामविलास पासवान हेदेखील त्याच काळातील. पण दोघेही केंद्रीय राजकारणात राहिले. पासवान यांनी सत्ताधारी गटात राहण्याचे कसब प्राप्त केले होते. शरद यादव यांचा मार्ग मुख्यतः वैयक्तिक राजकारण आणि त्यातून येणाऱ्या सुविधा हाच होता. बिहारच्या राजकारणात जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रभाव समता पार्टी असताना होता. पण ती पार्टी नितीश कुमार यांनी गिळंकृत केली.
बिहारच्या राजकारणात जातीय गणिते असली तरी नितीश कुमार हे ज्या कुर्मी जातीचे आहेत त्या जातीचे मतदान मर्यादित आहे. पासवान यांच्या संदर्भात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापक जातीय गणित मांडून ही मंडळी राजकारण करतात. बिहारच्या राजकारणातून काँग्रेसचे उच्चाटन झाल्यानंतर आणि विशेषतः जनता राजवटीनंतर एक वेगळे वळण घेतले. लालू आणि नितीश कुमार एकत्र असण्याचा फायदा जनता परिवाराला झाला. लालू यादव यांनी त्याचा सर्वाधिक उपयोग करुन घेतला आणि एक वेळ अशी आली की लालूंंना तुरुंगवास झाल्यानंतर त्यांनी पत्नी राबडीदेवी यांना घराच्या चार भिंती ओलांडून राजकारणात आणले आणि मुख्यमंत्री केले. बिहारच्या जनतेने हा तमाशा सहन केला. पण नितीश कुमार पुढे आले आणि भाजपला केंद्रात चांगले दिवस आले त्याचा परिणाम बिहारच्या राजकारणावर झाला.

लालूंंना बाजूला करुन बिहारने नितीश कुमार यांना स्वीकारले. पण एकट्याने बिहारचे राजकारण करणे नितीश कुमार यांना जमले नाही ते जातीय गणिते बाजूने नसल्यामुळे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार आणि लालू यादव यांचे पक्ष वेगवेगळे लढले होते. तेव्हा नितीश कुमार यांच्या पक्षाला लोकसभेत फक्त दोन आणि लालू यादव यांना चार जागा मिळाल्या. २०१५मध्ये विधानसभा निवडणुकीत नितीश आणि लालू एकत्र आले तेव्हा या दोन पक्षांना मिळून १८०पेक्षा अधिक तर भाजपला फक्त ५३ जागा मिळाल्या, हे लक्षात घ्यायला हवे.
आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत मतदान कसे झाले याची आकडेवारी बघितली तर महत्त्वाचे तीन पक्ष सोळा-सतरा ते चोवीस टक्के एवढे मतदान मिळवू शकतात. एकट्या लढणाऱ्या पक्षाचे अनेक उमेदवार असल्यामुळे मतदान यापेक्षा थोडे अधिक मिळताना दिसले तरीही त्या प्रमाणात जागा मिळताना दिसत नाही हे लक्षात घ्यायला हवे.
घराणेशाहीची मानसिकता
भारतीय राजकारणात घराणे ही अपरिहार्यता आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना थेट उपमुख्यमंत्रीपदावर कसे बसविण्यात आले आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना राज्यसभा सदस्य म्हणून अलगद प्रवेश मिळाला हे लोक शांतपणे बघत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचे पुत्र निशांत यांनी पक्षात औपचारिक प्रवेश केल्यानंतर लगेचच पक्षाचे भावी नेते म्हणून शिक्कामोर्तब झाले. निशांत पन्नास वर्षांचे आहेत. त्यांना आमदार किंवा खासदार करावयाचे नितीश कुमार यांनी ठरवले असते तर आजवर त्यांची राजकीय कारकीर्द पंचवीस वर्षे झाली असती. आता नितीशकुमार राज्यसभा सदस्य होणार हे पक्के झाले आहे. औपचारिक घोषणा सोळा तारखेला होईल. नितीश कुमार यांना केंद्रात मंत्री होऊन राष्ट्रीय राजकारण करण्याची इच्छा आहे किंवा कसे हे पुढे स्पष्ट होईलच. पण त्यांचे पुत्र निशांत बिहारच्या राजकारणात सक्रिय झाले हे महत्त्वाचे.

बिहारमधील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणाऱ्या बातम्या वाचल्या तर लालू यादव यांच्या पक्षाला नितीश कुमार यांची अनुपस्थिती लाभदायक ठरेल असा एकंदर सूर आहे. पण आता बिहारमध्ये निवडणूक नाही. लालू यादव स्वतः कोर्टात खेटे मारण्यात आणि तब्येत सांभाळण्यात व्यस्त आहेत. राबडीदेवी यांना कोणी नेता मानत नाही. बाईसाहेब आल्या म्हणून मान मिळतो एवढेच. तेजस्वीची विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पीछेहाट झाली आहे. अवघ्या पंचवीस आमदारांच्या बळावर फारसे राजकारण करता येत नाही. मुस्लिमबहुल भागात ओवेसी यांनी तळ ठोकला आहे आणि केवळ यादव समाजाच्या बळावर राजकारणात टिकून राहणे सोपे नाही. शिवाय रेल्वे जमीन घोटाळा प्रकरण तेजस्वी यांचा पाठलाग करीत आहे.
भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांना दिल्लीला पळवून नेले आहे असा एकंदर सूर आहे. आता इंडी आघाडीला मदत करुन नितीश कुमार काही चमत्कार करतील ही परिस्थिती नजीकच्या काळात निर्माण होईल, असे दिसत नाही. इंडी आघाडी नितीश कुमार यांच्याकडे आशेने बघेल ही शक्यतादेखील नाही. अशा परिस्थितीत भाजप बिहारमधील आपली मांड पक्की करण्याची योजना तयार करुनच आहे. बिहारमधील कुशवाह वगैरे चार-पाच टक्के मतदान असणारे पक्ष किंवा प्रवाह भाजपच्या बरोबर जाण्यात फायदा आहे हे ओळखून आहेत. चिराग पासवान यांना मुख्यमंत्री म्हणून विराजमान होण्याची इच्छा आहे. पण मुख्य पक्षाबरोबर राहिलो नाही तर दोन जागादेखील मिळणार नाहीत हे त्यांना माहित आहे. म्हणजे भाजप हा बिहारमधील एकेकाळी दुर्लक्षित किंवा बाजूला पडलेला पक्ष आता आक्रमक होत आहे. भाजपला रोखण्याची ताकद तेजस्वीकडे नाही. वडिलांची पुण्याई फारशी नाही. तरीही तेजस्वी याच्याकडेच पक्षाची सूत्रे असल्यामुळे तो प्रवाह दुर्लक्षित करता येत नाही.

निशांत याचे आगमन राजकीय पटलावर झाले आहे. परिणाम असा झाला आहे की, नितीश कुमार बरेचसे अलिप्त होते. पण आता निशांत यांनी पक्षात सक्रिय होणे आणि राज्यव्यापी दौरा करुन पक्षाच्या कार्यकर्ते मंडळींशी संवाद साधणे ही सकारात्मक गोष्ट. महाराष्ट्रात जसे सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्त्व गेल्याने कार्यकर्ते मंडळींची अस्वस्थता कमी झाली, तशीच परिस्थिती बिहारमध्ये निशांत यांच्यामुळे झाली आहे. भाजप आपले डावपेच सुरु ठेवील. पण चिराग पासवान, तेजस्वी यांना दुर्लक्षित करुन चालणार नाही. नितीश कुमार यांचे पुत्र असल्याचा फायदा निशांत यांना होणार आहे आणि होत आहे. वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन बिहारचे आहेत. त्यांची ओळख करुन देण्याची जबाबदारी देशभरात पक्षाने वाटून दिली आणि त्यांचा प्रभाव दिसून आला.
भाजपला बिहारमध्ये मांड पक्की बसवणे आहे, पण नितीश कुमार यांंचा पक्ष गिळंकृत करुन तिथे भाजपला बस्तान बसविता येणार नाही याची जाणीव आहे. लोकसभेत चाळीस खासदार पाठविणारे हे राज्य आहे. शेजारी प. बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, ओदिशा ही राज्ये आहेत. काऊ बेल्टमधील हे राज्य आहे. इथे नितीश कुमार यांचे पुत्र राजकारणात चमकले तरी भाजपला आक्षेप नाही. नितीश कुमार यांच्याप्रमाणे भविष्यात निशांत लालू, तेजस्वी यांच्या गटात जातील ही शक्यता आजतरी दिसत नाही. पण जनता दल युनायटेड सांभाळून ठेवण्यात निशांत यांना यश मिळाले तरी भाजपला त्यात निश्चितपणे समाधान आहे.
(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

