Homeमाय व्हॉईसठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला...

ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला झेला फक्त ‘उद्याच्या भविष्यासाठी’!

ठाणे जिल्हा तसेच ठाणे शहराचा महाराष्ट्र राज्याच्या महसुलात चांगला मोठा वाटा असला तरी राजकीय नेते तसेच राज्यातील नोकरशहा ठाणे जिल्हा आणि शहराकडे म्हणावे तसे लक्ष देतच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागत आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाचे साधे उदाहरण घेऊ. या विषयाला हात घालण्याआधी एक स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना काळात सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयांनी खरोखरच चांगले काम केले आहे आणि याची नोंद सर्वच यंत्रणांनी व समाजाने घेतलेली आहे. आता विषयाकडे..

हे ठाणे जिल्हा रुग्णालय बरीच वर्षे जुने आहे. तेथील डॉक्टर्स, परिचारिकावर्ग तसेच कर्मचारी कामगारांनी या रुग्णालयासाठी बरेच परिश्रमही घेतले आहेत, हे मान्य केले तरी प्रत्यक्ष पाहणीत मात्र निराशाच पदरात पडली. याचे प्रमुख कारण म्हणजे रुग्णालयाची नियोजित मोठी इमारत! या प्रस्तावित नवीन इमारतीबाबत आजच काही बोलत नाही. हा स्वतंत्र विषय आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कानोसा घेतला असता या नवीन प्रस्तावित इमारतीला किमान पाच-सहा वर्षे निश्चित लागणार. सरकारी काम असल्याने हा कालावधी दहा वर्षे लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात नवीन इमारत होईपर्यंत जुन्या इमारतीची आबाळ हे ठरलेलेच. त्यातच, काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक-दोन आठवड्यात येथील काही रुग्णकक्ष हळूहळू मेंटल रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित केले जाणार आहेत. म्हणजेच नवीन चकाचक इमारत तयार होईपर्यंत जुन्या इमारतीकडे पाहायचेच नाही, असे प्रशासनाने ठरवलेले दिसते. हे म्हणजे मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास जनतेने ‘उद्याच्या भविष्यासाठी’ खुशीने सोसावा असाच असावा. 

सुमारे तीन-चार तास जिल्हा रुग्णालयाच्या आवारात फेरफटका मारला असता दोनचार गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्या येणेप्रमाणे.. रुग्णालयाच्या आवारात प्रवेश केल्यापासून तो कोरोना रुग्णांच्या इमारतीपर्यंतच्या छोट्या टप्प्यात किमान सात-आठ खटारा रुग्णवाहिका मान टाकून धूळ खात पडलेल्या दिसून आल्या. त्यातील एक खटारा रुग्णवाहिका विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या आमदारकीच्या काळात आमदार निधीतून घेतल्याची जाहिरातच केलेली आहे. खरेतर ही व इतर खटारा रुग्णवाहिकांची विल्हेवाट रुग्णालय प्रशासन स्वतःच्या अधिकारात लावू शकते. मग हे प्रदर्शन कशासाठी? या खटारा रुग्णवाहिकांचे पर्यटन आयोजित करण्याचा प्रशासनाचा मानस तर नाही?

दुसरी एक नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे कंटेनर्स क्यूबिक! असे किमान 15/20 तरी कंटेनर्स क्यूबिक आहेत. जुन्या इमारतीत बसण्यायोग्य जागा नसल्यानेच हे कंटेनर्स आणण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सर्व कंटेनर्सच्या घोळक्यात एक कापून ठेवलेला झाडाचा बुंधाही दिसून आला. या कंटेनर्समध्ये आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत ही त्यातली समाधानाची बाब. बाकी सर्व आनंदीआनंदच आहे. रुग्णांचे केसपेपर्स काढण्याच्या जागेत प्लास्टिकचे भले मोठे पाईप आणून टाकले आहेत. त्याच्या थोडेसे बाजूला बाबा आदमच्या काळातील एक जुनाट यंत्र चिरविश्रांती घेत असल्याचे दिसून आले.

कोरोना रुग्णांची इमारत वगळता इतर सर्व इमारती अगदी विटलेल्या आहेत. इतक्या की, गेल्या 15/20 वर्षांत बांधकाम विभागाने साधा चुनाही तेथे मारलेला दिसत नाही. चुन्याचे बिल मात्र त्यांनी नक्की पाठवले असेल आणि संमतही झाले असेल. रुग्णालयाच्या आवारातील सार्वजनिक स्वछतागृहाची हालतच आहे. पाण्याच्या नावाने आनंद आहे. अनेक ठिकाणी पाईपच नाहीत. पॅथॉलॉजी विभागाच्या खिडकीत ढीगभर कचरा अडकलेला आहे. हे तर काहीच नाही. जिल्हा सर्जन बसतात त्यांच्या केबिनच्या खाली तळमजल्यावर प्लास्टिक बाटल्यांचा ढीग आहे. तो कोणाला सहजासहजी दिसू नये म्हणून हिरवा पडदा लावलेला आहे. बागेत ठेवलेल्या खेळण्यांना गंजाची पुटे चढली आहेत. ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी कोणालाही न कळवता या जिल्हा रुग्णालयाला नक्की भेट द्यावी. थोड्या आशा तरी पल्लवित होतील..

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content