Friday, July 12, 2024
Homeचिट चॅटमहिला दिनानिमित्त झाला...

महिला दिनानिमित्त झाला अष्टनायिकांचा सन्मान

मुंबईतल्या विश्वभरारी फाउंडेशन-विलेपार्ले आणि नॅशनल लायब्ररी-वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, “अष्टनायिका सन्मान सोहळा” एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिमाखात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने विविध क्षेत्रातील, आठ विदुषी या सोहोळ्यास आमंत्रित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून निर्माती-दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणि भूलतज्ज्ञ डॉ. अलका मांडके यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. या कार्यक्रमात रसिका धामणकर, विद्या प्रभू, सोनल खानविलकर, डॉ. श्वेता वर्पे, डॉ. सुचिता पाटील, डॉ. मृण्मयी भजक, अश्विनी देशपांडे, मीना गागरे या अष्टनायिकांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिपाली बोबडे यांनी दमदार आवाजात पोवाडा गाऊन, संपूर्ण सभागृहाला वीर रसात न्हाऊ घातले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा लता गुठे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची संकल्पना अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केली. नॅशनल‌ लायब्ररीच्या ग्रंथपाल धनश्री कुलकर्णी यांनी वाचनालयाच्या वतीने प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कांचन अधिकारी यांची मुलाखत डॉ. मृण्मयी भजक व प्रकाश राणे यांनी घेऊन, प्रेक्षकांना स्त्री सक्षमीकरण काय असू शकते याचे प्रबोधन केले. कांचन अधिकारी यांची मुलाखत चौफेर फटकेबाजी करणारी झाली. मंगला खाडिलकर यांची मुलाखत तेजेस्विनी मुंडये आणि प्रकाश राणे यांनी घेऊन त्यांच्याकडून अनेक मार्गदर्शनपर गोष्टी ऐकवित कार्यक्रमात बहार आणली. डॉ. अलका मांडके यांनी आपल्या छोटेखानी भाषणात प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये आणि चारुलता काळे यांनी अतिशय समर्थपणे केले. अष्टनायिकांच्या वतीने सन्मानाला उत्तर देताना अश्विनी देशपांडे म्हणाल्या की, या सन्मानाने आम्ही साऱ्याजणी भारावून गेलो आहोत. कार्यक्रमाला आल्यावर आम्हा बायकांना माहेरी आल्यासारखे वाटले.

विश्वभरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा लता गुठे आणि कार्यवाह प्रकाश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्णत्वास नेला. चंद्रकांत बर्वे, प्रशांत राऊत, अशोक शिंदे, स्वाती पोळ तसेच नॅशनल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपाध्यक्ष गुरुनाथ तेंडुलकर यांनी आभार मानले.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!