Homeडेली पल्स‘वर्षा’वरच्या चहात सोन्याचे...

‘वर्षा’वरच्या चहात सोन्याचे पाणी घालतात का?

गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या चहापानावर दोन कोटी 38 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. वर्षावर देण्यात येणाऱ्या चहामध्ये सोन्याचे पाणी घालून देतात की काय, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईच्या विधानभवनात उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापानासाठी निमंत्रित केले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत विधानभवनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक झाली. रायपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित असल्यामुळे काँग्रेसचे नेते या बैठकीला हजर राहू शकले नाहीत. त्यांनी दूरध्वनीवरून बैठकीतल्या निर्णयांना पाठिंबा जाहीर केला. या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या वतीने अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

गेल्या आठ महिन्यांत जाहिरातींवर पन्नास कोटींची उधळण करण्यात आली. याशिवाय मुंबई महापालिकेने जाहिरातींवर सतरा कोटी रुपये खर्च केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे हसरे फोटो दाखवण्यासाठी ही उधळण कशासाठी? आज एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. शेतकऱ्यांना जाहीर केलेले सहाय्य मिळालेले नाही. लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत. धनगरांचे आरक्षण अजूनही बोंबललेलेच आहे, अशी टीकाही विरोधी पक्षनेत्यांनी केली.

गेल्या आठ महिन्यांत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुमार कामगिरी पाहता, महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी त्यांची कामगिरी पाहता या नामधारी, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानाला उपस्थित राहून आम्ही जनतेची प्रतारणा होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत आम्ही विधिमंडळाच्या मागच्या अधिवेशनात सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांची सध्याची स्थिती काय आहे, त्यांची कितपत पूर्तता झाली आहे याचा आढावा घेतला. कांदा उत्पादकांची सध्याची स्थिती पाहता कांदा निर्यातीच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती फार गंभीर झाली आहे. आमदार प्रज्ञा सातव यांना मारहाण झाली. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी मिळाली. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे आरोप होत आहेत. हे सर्व बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे द्योतक का नाही का, असा सवाल त्यांनी केला.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच पक्ष चिन्ह शिंदे गटाला देऊन पक्षपातीपणा केला असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार दुसरीकडे गेले म्हणून काय मनसे त्यांना देणार काय? राज्य सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे, अशी भावना लोकांमध्ये आहे. आम्ही महाविकास आघाडीतले सर्व घटकपक्ष यावेळी एकजुटीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content