Homeमाय व्हॉईसआप्पासाहेबांनी समाजासाठी काम...

आप्पासाहेबांनी समाजासाठी काम करण्याची दिली शिकवण!

वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाजबांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गौरव केला.

राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022चा महाराष्ट्र भूषण सन्मान आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी मुंबईतल्या खारघर येथील विस्तीर्ण अशा मैदानात लाखो श्री सदस्यांच्या उपस्थिती देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रसिद्धीची आस न ठेवता समाजसेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळत असते. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्त्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म – डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली. मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य हे श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरूच राहणार आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करत आहे.

उद्ध्वस्त कुटुंबांना दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांचे – मुख्यमंत्री शिंदे

धर्माधिकारी कुटुंबीय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उद्ध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले.

ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते तसे माणसं जोडून माणुसकीचा महासागर आप्पासाहेबांनी निर्माण केला आहे. अरे माणसा कधी व्हशील माणूस तू.. या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला आहे. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आप्पासाहेबांकडे मन स्वच्छ करण्याची अद्भुत कलाउपमुख्यमंत्री फडणवीस

जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्री सदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेबांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द

कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे 20 लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित श्री सदस्यांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाची क्षणचित्रे

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात “जय सद्गुरु” म्हणत केल्यावर श्री सदस्यांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या.

• वीस लाखापेक्षा अधिक श्री सदस्य शिस्तबध्द रितीने बसून होते.

• मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे आणि पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील आपल्या परिवारासह सर्वसामान्य श्री सदस्यांसारखे गर्दीत उन्हात बसून कार्यक्रम पाहत होते.

• कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशातूनही भाविक या कार्यक्रमासाठी दाखल झाले होते.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content