Sunday, September 8, 2024
Homeडेली पल्सअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २८...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २८ जूनला शक्तीप्रदर्शन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह इतर मागण्या मार्गी लागण्यासाठी शासनावर दबाव आणण्याकरीता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जूनला मुंबईतल्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

बेलापूरमध्ये काल आयसीडीएस आयुक्त कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये संघटनेच्या सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे.

पगारे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले.

सेविका व मदतनिसांना प्रत्येकी १०,००० मानधन वाढ प्रस्तावित करावी या मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले.

मासिक पेन्शनबाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे.

ग्रॅच्युइटीबाबत निर्णय घेण्यात आला असून निधी मंजूर करण्यात येईल.

२०२२च्या आधी नियुक्त १०वी पास मदतनिसांची सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात येईल.

सुपरवायझर पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल.

मुंबईसारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान ४००० करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.

सर्व थकित एकरकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा ३ महिन्यांच्या आत दिल्या जातील.

मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण दिले जाईल. रिचार्जची रक्कम वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.

नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ८ किमीपेक्षा जास्त अंतरावर बोलावल्यास टीएडीए देण्याचा आदेश काढला जाईल.

नागरी प्रकल्पात रुपांतरीत आदिवासी लाभार्थ्यांना पेसाअंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल. दुर्गम भागाचा १०० व ७५ रुपये भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल.

५ व १० वर्षांवर मिळणारी केंद्रीय वाढ रु ३१ व ३२ तसेच १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी ३, ४, ५ % वाढ फरकासहित देण्यात येईल.

आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.

अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचवण्याच्या मागणीवर विचार केला जाईल.

बैठकीत कृती समितीच्या वतीने कॉ. एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, राजेंद्र बावके, संगीता कांबळे, राजेश सिंग, निलेश दातखिळे सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वतीने उपायुक्त विजय क्षीरसागर, संगीता लोंढे, काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content