Thursday, December 12, 2024
Homeकल्चर +.. आणि देमार...

.. आणि देमार ॲक्शन चित्रपटांचा जमाना सुरू झाला!

सुपरस्टार अमिताभ बच्चनचा जंजीर, हा प्रतिष्ठित चित्रपट रिलीज होऊन याच महिन्यात ५१ वर्षं झाली. जंजीर १९७३च्या मे महिन्यात रिलीज झाला होता. प्रकाश मेहरा दिग्दर्शित, निर्मित आणि सलीम-जावेद लिखित या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया भादुरी, प्राण, अजित आणि बिंदू यांनी भूमिका केल्या होत्या. तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला जंजीर हा हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक हिंसक आणि आक्रमक दिशेने वळवणारा टर्निंग पॉईंट बनला. आणि तेव्हापासून चित्रपटसृष्टीत देमार ॲक्शन चित्रपटांचा जमाना सुरू झाला.

जंजीर रिलीज होण्यापूर्वी अमिताभ बच्चनचे ओळीने नऊ पिक्चर फ्लॉप झाले होते. जंजीरच्या आधी असा एकही चित्रपट नव्हता जो अमिताभने फक्त आपल्या खांद्यावर घेउन हिट केला होता. सात हिंदुस्तानी, प्यार की कहानी, परवाना, एक नजर, रास्ते का पत्थर, गरम मसाला (पाहुणा कलाकार) आणि बन्सी बिरजू फ्लॉप ठरले होते. जंजीरच्या पुढेमागे रिलीज झालेल्या गेहरी चाल आणि बंधे हाथ ह्या अमिताभपटांना तिकीट बारीवर आपली जादू निर्माण करण्यात यश आले नव्हते.

जंजीर, या चित्रपटाने अमिताभ बच्चनच्या सुरुवातीच्या संघर्षमय कालखंडाचा शेवट केला. जंजीरनंतर अमिताभ बच्चनने मागे वळून पाहिलं नाही. ह्या सुपरहिट सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीला एकमेवाद्वितीय असा सुपरस्टार दिला. जंजीरच्या यशामुळे सलीम-जावेद ही लेखक जोडीही सुपरहिट झाली. ह्याच सिनेमाने अमिताभ बच्चन नावाचं वादळ चित्रपटसृष्टीत निर्माण झालं. जंजीरने अमिताभला सुपरस्टार म्हणून स्थापित केलं. त्यातून अभिनेत्यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा दिली. जंजीरचे रिमेक करण्याचा अनेक निर्मात्यांनी प्रयत्न केला.

जंजीरचा दक्षिण भारतीय चित्रपटांवरही लक्षणीय प्रभाव पडला. अमिताभ बच्चनच्या अभिनयाने भावी तमिळ सुपरस्टार रजनीकांतलाही प्रेरणा दिली. आज जंजीर हा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील एक उत्कृष्ट आणि महत्त्वाचा चित्रपट म्हणून ओळखला जातो.

जंजीरमधील मुख्य भूमिका दिलीप कुमार, देव आनंद, राज कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासह अनेक प्रस्थापित कलाकारांना ऑफर करण्यात आली होती. परंतु सर्वांनी ती नाकारली. त्यावेळी राजेश खन्ना रोमँटिक हिरो म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर होता. आणि चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपटांचा बोलबाला होता. तथापि, अमिताभ आणि जया यांच्या मुख्य जोडीमध्ये एकही रोमँटिक दृश्य न दाखविलेल्या जंजीरने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा दिली.

चित्रपटाला नकार देणाऱ्या अनेक अभिनेत्यांना त्यामुळे आपली प्रतिमा खराब होईल अशी भीती वाटत होती. पण स्टार म्हणून अजून स्वत:ला प्रस्थापित करू न शकलेल्या अमिताभ बच्चनने जोखीम पत्करून ही भूमिका स्वीकारली. त्याचं गोमटं फळ त्याला मिळालं आणि जंजीर बच्चनच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट बनला, ज्याने आगामी वर्षांमध्ये त्याच्या सुपरस्टार बनण्याचा मार्ग मोकळा केला.

जंजीर अनेक गोष्टींकरिता संस्मरणीय ठरला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चनची अँग्री यंग मॅन अशी इमेज या चित्रपटातून बनायला सुरुवात झाली. सर्वच कलाकारांचा अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी संवाद, सुंदर स्क्रीन प्ले, ह्या सगळया या पिक्चरच्या जमेच्या बाजू होत्याच, परंतु “यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी” या गाण्याने जंजीरला विशेष ओळख मिळवून दिली. अमिताभ बच्चन आणि प्राण यांच्या अभिनयातली जुगलबंदी म्हणजे जंजीरचा अनमोल ठेवा होता.

“जब तक कहा नही जाय, तब तक चुपचाप खडे रहो. ये पुलिस स्टेशन है. तुम्हारे बाप का घर नही” असं रुबाबदारपणे म्हणत, लाथेने खुर्ची उडवणारा अमिताभ पाहयला लोक थिएटरकडे वळू लागले. तपकिरी केस आणि तपकिरी दाढीतल्या शेरखान पठाणाची भूमिका प्राणने अजरामर केली. जंजीर लोकप्रिय झाल्यावर दोस्तांच्या मैफिलींमध्ये दोन्ही हातात रुमाल घेऊन, तो उडवत नाच करण्याची फॅशनच सुरू झाली. सगळ्या उत्सवांमध्ये या गाण्याची रेकॉर्ड वाजू लागली. याच चित्रपटापासून हिंदी चित्रपटसृष्टीत देमार ॲक्शन चित्रपटांचा जमाना सुरू झाला.

Continue reading

‘डॉन’ फक्त एकच! अमिताभ बच्चन!!

लहानपणच्या आम्हा मित्रमंडळींचं आणि अमिताभ युगाचं नातं वेगळं करता येणार नाही. अमिताभ बच्चन हा महानायक त्याकाळी प्रत्येक श्वासात होता. त्यावेळचं संपूर्ण जनजीवन हेच अमिताभमय होतं. अमिताभ बच्चन आणि सुपरहिट सिनेमा हे समीकरण सर्वार्थाने रूढ झालं होतं. १९७८ सालचा त्याचा...
Skip to content