Homeन्यूज अँड व्ह्यूजपुन्हा छत्रपतींचा एक...

पुन्हा छत्रपतींचा एक नवा पुतळा प्रस्तावित!

दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व दिसतही आहे. परंतु स्थानकपरिसरात पी. डिमेलो मार्गांवरून आत येणाऱ्या मार्गाशिवाय मोठी मोकळी जागा सध्यातरी कुठे दिसत नाही. येथे शिवछत्रपतींचा पुतळा उभारला जाईल की नाही याबाबत शंका आहे. कारण, नाही म्हटलं तरी तो परिसर स्थानकाच्या मागील बाजूस आहे. कारण “statue without garden is like a sentence without its verbs” असं म्हणतात आणि महाराजांचा पुतळा म्हटला की तो भव्यदिव्य असलाच हवा, असा आपल्याकडला रिवाज आहे. आणि यादृष्टीने विचार करता रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकपासून तो लोकल गाड्यांची जागा अधिक बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांच्या फलाटाच्या शेवटापर्यंत इतकी मोकळी जागा सध्या तरी कुठेच दिसत नाही. अखेर सरकारने ठरवले तर ते कुठेही जागा निर्माण करू शकतात, हे जरी खरे असले तरी जनतेला दिसेल अशा ठिकाणी पुतळा उभारला जाईल इतकी मोठी जागा स्थानकाच्या आत तर नाहीच नाही.

मुंबई महापालिका मुख्यालयासमोरचा रस्ता तसेच दादाभाई नवरोजी मार्गावरील स्थानकाचे प्रवेशद्वार या सर्व ठिकाणी सध्यातरी कुठेच जागा दिसत नाही. नाही म्हणायला आझाद मैदान आहे. पण तेथेही मोर्चा अडवण्याचे व निदर्शने करण्याचे ठिकाण जाहीर केल्यामुळे मोकळी मोठी जागा मला तरी माझ्या चष्म्यातून कुठेच दिसत नाही. सरकारने जागा करायचीच म्हटली तर स्थानकासमोरची कॅपिटल सिनेमाची जागा ते घेऊ शकतात. समोरच्या बाजूस भाटिया बाग, त्यानंतर मुख्य डाकघर (पोस्ट ऑफिस) दंत महाविद्यालय, सेंट जॉर्जस रुग्णालय आदी दाटीवाटीचा परिसर आहे. तसेच या परिसरात लवकरच भुयारी मेट्रो रेल्वे धावणार आहे. एकूणच हा सर्व परिसर हा गर्दीचा व प्रचंड वाहतूककोंडीचा आहे. शिवाय या रेल्वेस्थानक परिसरापासून अवघ्या सात मिनिटांच्या अंतरावर गेट वे इंडिया परिसरात महाराजांचा आश्वारूढ भव्य पुतळा असताना स्थानक परिसराला पुतळ्यासाठी का बरे वेठीस धरले जात आहे? आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध मुळीच करत नाही. तसा आमचा मानसही नाही. आम्ही फक्त वस्तुस्थिती निदर्शनास आणत आहोत. ठाणे रेल्वेस्थानकात जर दररोज सुमारे पाच लाख प्रवासी ये-जा करत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात दररोज सुमारे 25 लाख प्रवासी नक्कीच ये-जा करत असतील. शिवाय स्थानकात येणाऱ्या टॅक्सीज, खासगी गाड्या यांची गणतीच नाही. आणि यातच जर महाराजांचा पुतळा आला की महाराजांना वंदन करण्यासाठी हजारो शिवप्रेमी येतील. त्यामुळे सुरक्षेचे जटील प्रश्न उभे राहतील. त्यातील काही गंभीरही असू शकतात. म्हणूनच याबाबत सावध पावले उचलली पाहिजेत, असे वाटते.

महापालिका मुख्यालयासमोरील बाजू तसेच पोलीस आयुक्त कार्यालयापासून स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावरही मोठी मोकळी जागा कुठेच दिसत नसल्याने स्थानक परिसरातील प्रचंड वाहतूककोंडीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या घोषणेचा पुनर्विचार करावा असे आम्ही विनयाने सुचवू इच्छितो. “The statue has the power to preserved history and evoke emotions” हे कितीही खरं असलेतरी आज्ञापत्र म्हणते “राजे लोकांस मुख्य साधनीय तो कारभार आहे, त्यास विक्षेप पडो न द्यावा. कलावंत, धाडी, गवई, निजग्रही यांचे नृत्यगायन मोहोस्तव विरहित दरबारी करू नये… काही एक आसक्ती जाहलीयाने चित्त आवरीत म्हणता आवरले जात नाही, तेव्हा व्यसन प्राप्त होऊन राजकार्ये आंतरतात; किंबहुना आणखीही यामुळे दोष घडतात… परंतु केवळ स्वस्तुतीप्रिय होणे हाही दोषच आहे. याकरिता कारभार अंतरून त्याच भरी न भरावे. तैसेच भाटही मजलसीत स्वारीमध्ये पूर्वी राजे यांनीही संरक्षिले आहेत, याकरिता थोडेबहुत गुणी पाहून त्यांचाही संग्रह करावा. परंतु हे लोक कारभाराचे समई आणू नयेत.”

नाही म्हणायला यलो गेटपासून सुरु होणाऱ्या गोदीत मात्र बक्कळ मोठी जागा आहे. मात्र जवळच समुद्र असल्याने तगडी सुरक्षा ठेवावी लागेल. त्यापेक्षा मुंबई शहर आणि उनगरात शिवप्रभुंचे अनेक पुतळे असल्याने होणारा नियोजित खर्च एखाद्या समाजोपयोगी कार्यक्रमासाठी वापरला गेला तर ते महाराजांनाही आवडेल.

छायाचित्रः प्रवीण वराडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मंत्रालय परिसरासारखे चकाचक रस्ते इतर ठिकाणी नकोत का?

कालच्या शनिवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंत्रालयजवळील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेलो होतो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम काहीसा लवकर संपल्याने हाताशी बराच वेळ होता. म्हटलं.. एकेकाळी दररोज या परिसरात येत होतो, जरा उसंत मिळाली आहे, या परिसरातील 'प्राणवायू' प्राशून घरी जाऊया.. कारण,...

अहो ऐकलं का? ठाणे रेल्वेस्थानकातली घाण छप्पर नसल्यामुळे…

बोरींबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हे रेल्वेस्थानक छप्पर असलेलं स्थानक असल्याने तेथे भरपावसातही तुलनेने स्वच्छता असते, फलाटावर चिखलयुक्त काळे पाणी नसते, उलट ठाणे रेल्वेस्थनकावर छप्परच नसल्याने हजारो प्रवाशांच्या पायाने जी घाण येते तीच असते, असा बचावात्मक पवित्रा रेल्वेच्या...

बेशिस्त ठाण्याला वेळीच आवरा!

गेले दोन-तीन दिवस जोरदार पाऊस पडत असताना काही कामानिमित्त ठाण्याच्या रेल्वेस्थानक परिसरात जायला लागले होते. वेळ अर्थात संध्याकाळची! टीएमटीने सॅटिसवर गेलो तोच जोरदार पाऊस सुरु झाला. सॅटिसवर संध्याकाळी तुफान गर्दी असतेच. त्यात पावसाने सॅटिस अगदी किचाट झाले होते. सॅटिसच्या...
Skip to content