Saturday, July 13, 2024
Homeकल्चर +'मिफ्फ'मध्ये आता जतन...

‘मिफ्फ’मध्ये आता जतन केलेले लघुपट पाहण्याची संधी

सध्या सुरू असलेल्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) आता राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)च्या संग्रहातील निवडक लघुपट, ऍनिमेशनपट तसेच माहितीपट अनुभवण्याची अनोखी संधी रसिकांना मिळणार आहे. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत हे चित्रपट डिजिटल पद्धतीने पुनर्संचयित केले असून भारतातील समृद्ध सिनेमॅटिक वारसा त्यामुळे अधोरेखित होत आहे.

1980मध्ये सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला “पिकू” हा यातील ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. 26 मिनिटांचा हा बंगाली चित्रपट रे यांच्या पिकूर डायरी या लघुकथेचे चित्रपट रूपांतर आहे. लहान पिकूच्या आयुष्यातील एक दिवस यात दाखवला असून त्याच्या आई-वडिलांच्या विस्कळीत नातेसंबंधाच्या गुंतागुंतीचा प्रवास आणि त्याच्या निष्पाप एकाकी जगाचे मार्मिक चित्रण यात आहे. 1981मध्ये बी. आर. शेंडगे यांनी दिग्दर्शित केलेला “द आर्ट ऑफ ॲनिमेशन”, ॲनिमेशनच्या कष्टप्रद प्रक्रियेची ओळख करून देतो. 10 मिनिटांचा हा हिंदी चित्रपट कागदावरील स्थिर प्रतिमांपासून ते आकर्षक चलचित्रांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवतो.

1965मध्ये ऋत्विक घटक यांनी दिग्दर्शित केलेला “फिअर” हा भविष्यातील पार्श्वभूमी दाखवणारा दुर्मिळ लघुपट आहे. तो भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थांच्या विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. 16 मिनिटांचा हा हिंदी चित्रपट एका येऊ घातलेल्या आण्विक हल्ल्याचा सामना करत असलेल्या सैनिकी तळावर चित्रित करण्यात आलेला आहे. 1988मध्ये संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला “द स्टोरी ऑफ टिब्लू” हा अरुणाचल प्रदेशातील इडू या दुर्गम खेड्यातील नऊ वर्षांच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास आहे. 84 मिनिटांच्या या हिंदी चित्रपटात टिब्लूचे शिक्षणाबद्दल असलेले प्रेम आणि त्याचा तिच्या समाजावर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दाखवण्यात आला आहे.

2018मध्ये संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केलेल्या “अराउंड इंडिया विथ अ मूव्ही कॅमेरा”मध्ये साबू आणि गांधी यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या ब्रिटिश आणि भारतीय उपखंडातील सामायिक इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी संग्रहित प्रतिमा वापरल्या आहेत. 86 मिनिटांचा हा इंग्रजी चित्रपट एक काव्यात्मक आणि आकर्षक कथा सादर करतो. 1978मध्ये दीपक हळदणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या “व्हेअर टाइम स्टँड स्टिल”मध्ये अभूजमाड आणि बस्तर क्षेत्राच्या लगतच्या परिसरातील आदिवासींचे मानववंशशास्त्रीय चित्रण आहे. 11 मिनिटांचा हा हिंदी चित्रपट त्यांच्या आत्मनिर्भर कृषी पद्धती, सामाजिक चालीरीती आणि सामुदायिक सहभाग अधोरेखित करतो.

एनएफडीसी-एनएफएआयविषयी थोडेसेः 

पुण्यात मुख्यालय असलेले एनएफडीसी-एनएफएआय हे भारत आणि जगभरातील चित्रपटांचे संकलन, सूची आणि जतन करते. मूकपट, माहितीपट, कथापट आणि लघुपटांसह 30,000हून अधिक चित्रपटांच्या विशाल संग्रहासह, एनएफएआय भारताच्या सिनेसृष्टीतील इतिहासाचे संरक्षक म्हणून काम करते. चित्रपट जतनासाठी एनएफएआयची बांधिलकी त्याच्या अत्याधुनिक चित्रपट संकलन सुविधा, तापमान-नियंत्रित व्हॉल्ट्स आणि चित्रपट रिळांची काळजीपूर्वक देखभाल करणाऱ्या समर्पित तज्ञ कर्मचाऱ्यांमधून प्रतीत होते.

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान)विषयी जाणून घ्या-

2015मध्ये सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी उपक्रम आहे. भारताच्या अफाट सिनेसृष्टीतील वारशाचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. एनएफएचएम हा एक बृहद उपक्रम आहे ज्यामध्ये चित्रपट संरक्षणाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. खराब होत चाललेल्या चित्रपटांचे पुनर्संचयन करणे, चित्रपटाच्या प्रिंट्सचे डिजिटायझेशन, दस्तावेज बनवणे आणि खबर्दारीपूर्वक संवर्धन यांचा यात समावेश आहे. हे सर्व एनएफडीसी- एनएफएआयच्या पुणे येथील संकुलात अत्याधुनिक पुनर्संचयन आणि डिजिटायझेशन सुविधेद्वारे केले जाते. ‘आज आपण 4K रिझोल्यूशनमध्ये बघत असलेली सामग्री जतन करणे हा यामागचा उद्देश आहे.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!