Details
गडकरींचे काय होणार?
13-Apr-2019
| 1
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
नागपूरकर नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात गुरूवारी मतदान झाले. तेथे अवघे ५४.१२ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा ते साडेतीन टक्क्यांनी कमी (५७.७४) होते. मतदानानंतर गडकरींचा चेहरा टीव्हीवर दिसला. सदैव हसतमुख असणारे गडकरी गुरूवारी प्रचंड तणावग्रस्त दिसत होते. जणू त्यांना आपल्या पराभवाची चाहूल लागली होती. गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे राष्ट्रीय नेते आहेत. ते रा. स्व. संघाच्या जवळ आहेत. भविष्यात नरेंद्र मोदींना जर मित्रपक्षांनी नाकारले तर नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात, असे राजकीय निरीक्षकांचे भाकीत आहे. हे भाकीतच गडकरींना घातक ठरले आहे.
पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे नाव अचानक पुढे आले. त्यापूर्वी नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात होते. मात्र पूर्ती घोटाळा उघड झाला आणि गडकरी अडचणीत आले. या मराठी माणसाला बाजूला सारून नरेंद्र दामोदरदास मोदी पंतप्रधान झाले. गेल्या पाच वर्षांत मोदी जितके वादग्रस्त ठरले तितका कोणताच पंतप्रधान वादग्रस्त ठरला नाही. भाजपचे काही मित्रपक्ष भाजपपासून दूर गेले. आंध्रचे चंद्राबाबू नायडू तर मोदींचे कट्टर शत्रू बनले. या पार्श्वभूमीवर उद्या सत्ता मिळविण्यासाठी भाजपला मित्रपक्ष जोडावे लागल्यास नितीन गडकरी हा हुकूमाचा एक्का भाजपकडे होता. पण गडकरींचे हे महत्त्व ओळखूनच त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गडकरी यांच्या विरोधात नानाभाऊ पटोले उभे आहेत. हे पटोले पूर्वी काँग्रेसमध्ये होते. तेथून ते भाजपमध्ये आले. पुढे ते मोदींशी पंगा घेऊन बाहेर पडले. आज तेच पटोले काँग्रेसच्या तिकीटावर गडकरी यांच्याविरोधात उभे आहेत हा योगायोग नव्हे. पटोले हे मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. गडकरी यांना विकासपुरुष म्हटले जाते. त्यांचे समर्थक त्यांनी केलेल्या विकासकामांची यादी देतात. पण या यादीतील बरेच प्रकल्प सुरूच झालेले नाहीत, हे ते सांगत नाहीत. पुन्हा ज्याला ते `विकास’ म्हणतात त्याबाबत बहुसंख्य लोकांमध्ये नाराजी आहे. उच्च मध्यमवर्गीय माणूस सोडला तर मेट्रो प्रकल्प जनतेच्या पचनी पडलेला नाही. 10 हजार कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाची गरज होती का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. शिवाय या प्रकल्पामुळे खरोखर लोकांची सोय होणार आहे का? हा प्रकल्प जनतेच्या हितासाठी की ठेकेदारांच्या हितासाठी राबविला जातो आहे, असादेखील प्रश्न जनतेला पडला आहे.
हे प्रश्न लोक गांभीर्याने आणि नाराजीने विचारत आहेत. मेट्रोमुळे दळणवळणाचा प्रश्न सुटणार नाही, असे लोकांना वाटते. दरमाणसी सर्वात जास्त दुचाकी असलेले शहर ही नागपूरची ओळख आहे. स्वत: गडकरी सुरूवातीला स्कूटरवरून फिरत होते. केवळ दुचाकीला प्राधान्य देणारे नागपूरकर गैरसोयीची मेट्रो स्वीकारतील का, असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. मेट्रो प्रकल्प कधी पूर्ण होणार हे निश्चित नाही. पण 2016 पासून मेट्रोचा टॅक्स नागपूरकरांच्या डोक्यावर बसला आहे. सिमेंट रोडबाबतही लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. आपल्या मित्रांच्या सिमेंट कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून गडकरींनी चांगले डांबरी रोड फोडून सिमेंट रोड तयार केल्याचा उघडपणे आरोप होत आहे. या रस्त्यांना तडे जात आहेत. त्यामुळे शहराचे तापमान तीन डिग्रींनी वाढले आहे. हे दुष्परिणाम लोकांच्या नाराजीत भर टाकत आहेत.
मेट्रो आणि सिमेंटचे रस्ते या दोन्ही गोष्टींची गरज लोकांना वाटत नाही. 10 हजार कोटींचा आकडा सांगितला की लोक म्हणतात, `यातील दोन हजार कोटी तर मंत्र्याच्याच खिशात जाणार. या विकासामुळे आमचा काय फायदा होणार?’ सिमेंट रोडच्या उंचीमुळे गेल्यावर्षी हजारो घरात पाणी शिरले. अनेक इमारती खचल्या. त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न लोक विचारत आहेत. सारांश, गडकरी यांच्याविरोधात नाराजी स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच गडकरी यांचे काय होणार, असा प्रश्न आज आम्हाला पडला आहे.”

