Details
बोगस पत्राचा बोथट प्रचार
17-Apr-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
देशात निवडणुकांचा मोसम सुरू आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. पूर्वी फक्त पत्रकबाजीने हे काम होत असे. आता व्हॉटसअप नावाच्या विद्यापीठाची त्यात भर पडली आहे. सोशल मीडिया जबरदस्त पसरला आहे. एखादी गोष्ट सोशल मीडियात टाकली की, ती क्षणार्धात व्हायरल होते.
या सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेदेखील भरपूर आहेत. सोशल मीडियामुळे अनेक गुन्हेगार पकडले जातात. असहाय्य लोकांना मदत मिळू शकते. रक्ताची गरज असलेल्यांना हव्या त्या ब्लड ग्रुपचे रक्त मिळते. पण त्याचबरोबर अनेक अफवादेखील व्हॉटसअपवरून पसरविल्या जातात. निवडणुकांच्या काळात तर अशा अफवांना विशेष जोर येतो. खरे म्हणजे, अफवा पसरविणे हा दखलपात्र गुन्हा आहे. पण तो दाखल करण्यासाठी गुन्ह्याचा शोध घेणे आवश्यक असते. अनेक बोगस पोस्ट अशा असतात ज्यांचा उगम शोधून काढणे कठीण जाते.
आता अलिकडचीच गोष्ट पाहा : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी नाकारली. साहजिकच, दोघेही नाराज झाले असणार. पण रा. स्व. संघाच्या कडक शिस्तीत आणि संस्कारात वाढलेल्या या नेत्यांनी आपली नाराजी उघड केली नाही. तथापि, डॉ. जोशी यांनी अडवाणी यांना लिहिलेले हिंदीतील एक तथाकथित पत्र सोशल मिडीयात व्हायरल झाले. या पत्राने एकच खळबळ उडवून दिली. या तथाकथित पत्रात त्यांनी आपली नाराजी दर्शविल्याचे आणि पहिल्या टप्प्यात 91 जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपला केवळ 8 ते 10 जागा मिळतील असे म्हटल्याचे दर्शविले होते. सदर पत्र वाऱ्यासारखे सर्वत्र पसरताच डॉ. जोशी यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या लेटरहेडवर, त्यांच्या सहीने लिहिले गेलेले अस्खलित हिंदीतील ते पत्र त्यांनी लिहिलेलेच नव्हते. ते एक बोगस पत्र होते. डॉ. जोशी यांनी त्वरीत मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून या बोगस पत्राविषयी कळविले. या पत्राबाबत सविस्तर शोध घ्यावा असे आवाहनदेखील त्यांनी आयुक्तांना केले. साहजिकच, त्यांच्या त्या बोगस पत्रातील हवा निघून गेली.
मतदारांची दिशाभूल करण्यासाठी अशाप्रकारची बोगस पत्रे प्रसिद्ध करण्याची प्रथा नवी नाही. 1987 साली विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेतर्फे डॉ. रमेश प्रभू निवडणूक लढवीत होते. शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर लढविलेली ती पहिली निवडणूक होती. मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इतर शिवसेना नेत्यांसह एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी रेल्वे मंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्राची झेरॉक्स प्रत सादर केली. त्या पत्रावर मुख्यमंत्र्याची सही नव्हती. खाली फक्त नाव होते. पण त्या पत्राद्वारे मुंबईतील एका रेल्वे स्टेशनला एका मौलवीचे नाव देण्याची शिफारस केली होती. हे पत्र मतदानाच्या दिवशी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले. अर्थात ते बोगस पत्र होते. त्यावरचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयातून मतदान संपल्यावर करण्यात आला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या निवडणुकीत रमेश प्रभू काँग्रेसचे प्रभाकर कुंटे यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले.
पण कुंटेंनी डॉ. प्रभू व शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना कोर्टात खेचले. धर्माच्या नावाखाली निवडणूक लढविल्याचा त्यांचा आरोप होता. या न्यायालयीन लढाईत कुंटे विजयी झाले. डॉ. प्रभू यांची निवड अवैध ठरली. इतकेच नव्हे, तर त्यांना आणि बाळासाहेबांना पुढील सहा वर्षे मतदान करण्यास न्यायालयाने बंदी घातली. एका बोगस पत्रामुळे डॉ. प्रभू विजयी झाले. पण न्यायालयात मात्र पराभूत झाले. त्या बोगस पत्राचा प्रचार बोथट ठरला. निवडणुकीत हे असेच असते. सत्यापुढे असत्य दीर्घकाळ टिकूच शकत नाही. ज्यांनी डॉ. मुरली मनोहर जोशी यांचे बोगस पत्र व्हायरल केले, त्यांना भविष्यात तरी तसे न करण्याची सद्बुद्धी लाभो!”

