HomeArchiveबारामती अभेद्य राहणार?

बारामती अभेद्य राहणार?

Details
बारामती अभेद्य राहणार?

    22-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
बारामती हा शरद पवार यांचा अभेद्य आणि हक्काचा बालेकिल्ला. हा मतदारसंघ म्हणजे एकतर्फी निकाल असे आजवरचे चित्र होते. मात्र, गेल्या 2014 च्या मोदी लाटेतील निवडणुकीत या मतदारसंघातही भविष्यात बदल घडू शकतो, याची चुणूक पाहयला मिळाली. त्यामुळे भाजपने यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्र अवलंबिले आहे. सुळे या मुरब्बी राजकारणी, तर कुल या राजकारणात नवख्या अशी स्थिती असताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कार्य सुळे यांना तारणार, की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा चालणार, याबाबत या मतदारसंघात उत्सुकता आहे.

२०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपचे कमळ चिन्ह न घेता निवडणूक लढविल्याने त्याचा फटका त्यांना बसला. त्या निवडणुकीनंतर पवार यांच्या या बालेकिल्ल्याचा बुरूज ढासळू शकतो, याची जाणीव भाजपला झाली. सुळे यांनी अवघ्या ६९ हजार ७१९ मतांच्या फरकाने विजय मिळविला. जानकर यांचा पराभव हा जिव्हारी लागणारा होता. मात्र, त्यानंतर जानकर या मतदारसंघाकडे फारसे फिरकले नाहीत. ते मतदारांच्या सतत संपर्कात राहिले असते तर त्यांचा प्रभाव पडला असता. त्यामुळे भाजपला उमेदवार निवडताना अन्य ठिकाणी चाचपणी करावी लागली. शेवटच्या क्षणी कांचन कुल यांचे नाव निश्चित झाले.

या मतदारसंघात खडकवासला, पुरंदर, भोर, बारामती, दौंड आणि इंदापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आजपर्यंत ग्रामीण भागातील मतदार या मतदारसंघामध्ये जास्त होते. मात्र, मतदारसंघ फेररचनेनंतर खडकवासला या शहरी भागाचा समावेश या मतदारसंघात झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही डोकेदुखी झाली आहे. गेल्या निवडणुकीत शहरी मतदारांनी सुळे यांना नाकारले होते. ही बाब प्रामुख्याने खडकवासला मतदारसंघात दिसून आली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असले तरी मागील दोन विधानसभा निवडणुकांत येथे भाजप बाजी मारत आला आहे. गेल्या निवडणुकीत सुळे यांना या मतदारसंघात सुमारे २७ हजार मते कमी मिळाली होती. ही धोक्याची सूचना असल्याने सुळे यांनी गेल्या वर्षभरापासून खडकवासल्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमांतून त्या खडकवासला मतदारसंघातील मतदारांच्या संपर्कात आहेत. या मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे.

खडकवासल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुरंदर विधानसभा मतदारसंघ त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे प्राबल्य आहे. त्याचा फायदा कुल यांना होणार आहे. याठिकाणी काँग्रेसचीही ताकद आहे. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शब्द हवा आहे, तो म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दगाफटका न करण्याचा! या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पराभव पत्करावा लागतो, याची बोच काँग्रेसला आहे. स्थानिक पातळीवरील हा प्रश्न सुटल्यास पुरंदरचा पाठिंबा सुळे यांना मिळू शकतो; अन्यथा धोक्याची घंटा आतापासूनच वाजू लागली आहे.

हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य चारपैकी दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप यांना समसमान संधी आहे. या मतदारसंघावर विद्यमान आमदार कुल यांचा प्रभाव आहे. मात्र, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद या मतदारसंघात आहे. त्यामुळे दौंडमध्ये मतविभागणी होणार असल्याची स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे त्यांचा हक्काचा बारामती मतदारसंघ. कुल मूळच्या बारामतीच्या असल्यातरी त्यांचे भावनिक आवाहन कितपत मतदारांवर प्रभाव टाकेल, याबाबत साशंक स्थिती आहे. बारामतीतील मतदार कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. भोर मतदारसंघामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्याचबरोबर भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे सुळे यांचे मताधिक्य वाढते. यावेळीही अशी स्थिती राहू शकते. याठिकाणी मते मिळविण्यासाठी कुल यांना पराकाष्ठा करावी लागेल. इंदापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्याने त्यांच्यात मनोमीलन झाल्याचे चित्र आहे. यावेळी काँग्रेसने साथ दिल्यास सुळे यांना मतांची आघाडी घेता येईल तर कुल यांना इंदापूरमध्ये मते मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

या मतदारसंघात भाजपने प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघाचा विकास हा प्रमुख मुद्दा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त बारामतीचा विकास केला, असा प्रचार भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रवादीने आमदार राहुल कुल यांना लक्ष्य केले आहे. कुल यांच्या ताब्यात असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आला आहे. या कारखान्यातील कामगारांना वेतन नाही आणि शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात आलेली नाही, हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारात सतत उपस्थित करून कुल यांच्यावर टीका करण्यात येत आहे. एकंदरीत या मतदारसंघात खडकवासल्यातील शहरी मतदारांनी सुळे यांच्या बाजूने कौल दिला आणि पुरंदरने साथ दिली तर सुळे यांचा विजय सुकर होणार आहे.

कुल यांच्यासमोर सर्व स्तरावरील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. मतदानासाठी अवधी कमी राहिला असताना, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जिल्ह्यात झाल्यास कुल यांच्यासाठी वातावरणनिर्मिती होईल असे सांगण्यात येत होते. पण मोदी सभा घेणार नसून अमित शाह यांची सभा घेण्यात येईल. त्याचा कीती परिणाम होतो हे समजेल.”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content