Details
असीफाला न्याय मिळाला का?
18-Jun-2019
| 0
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
असिफा बानो या आठ वर्षांच्या बालिकेच्या खुनाचे प्रकरण धसास लागले आणि त्यात सातपैकी सहा आरोपींना सजाही लागली हे बरे झाले. अतिशय घृणास्पद असा तो सारा प्रकार होता. असिफा ही बकरवाल या भटक्या विमुक्त समाजातील मोहम्मद युसूफ यांची लेक. हे लोक बकऱ्यांचे कळप घेऊन या गावातून त्या गावात फिरत असातत. तसे ते जम्मूमधून निघून काश्मीर खोऱ्यातील उंच पर्वंतराजीकडे निघाले होते. या मंडळींचा दरवर्षीचा हा प्रवास असा हंगामानुसार होत राहतो.
जेव्हा जानेवारीनंतर थंडी ओसरू लागते, डोंगर शिखरांवरचे बर्फ वितळू लागते तेव्हा हे मेंढपाळ आपापले कळप घेऊन, बायका-पोरांचे लटांबर घोड्यांवर लादून, तंबू वगैरे बाडबिस्तरा गुंडाळून, हिमालयातच्या पायथ्याकडच्या कुरणांतून निघतात आणि उंच पर्वतशिखरांकडे जातात. जम्मू भागातून हे स्थलांतर दरवर्षीच होते. पुन्हा अतिथंड हवामानात डोंगरांवर बकऱ्यांना काहीच चरायला मिळत नाही असा काळ आला की नोव्हेंबर-डिसेंबरनंतर ही मंडळी पुन्हा सारी सर्कस घोड्यांच्या पाठीवर लादून पंधरा दिवसांची, महिन्याभरांची पायपीट करत हिमालयाच्या पायथ्याशी, खाली सपाट कुरणांच्या प्रदेशात येतात.
देशाच्या सर्वच प्रांतांमध्ये भटके, विमुक्त आणि गाववाले यांच्यात एक संघर्ष सुरू असतो. भटक्यांची पाले गावाबाहेर पडली की गाववाले त्यांच्याकडे संशयानेच पाहत असतात. त्याच पद्धतीने बकरवाल लोक हे चोर असतात असा समज जम्मू भागातील गावकऱ्यांचाही आहेच. हा पारंपरिक समज आहे. कठुआ या लहान शहराच्या जवळ असणाऱ्या रसना खेड्यामध्ये जेव्हा या बकरवालांचा मुक्काम होता तेव्हा, म्हणजे जानेवारी 2018 मध्ये, मोहम्मद युसूफची छोटी आठ वर्षांची मुलगी एकेदिवशी गायब झाली. तिचे कुटूंबीय बकऱ्या चारण्यासाठी घोड्यांसोबत दूर गेले होते. ते वस्तीकडे परत आले तेव्हा तंबूत असीफा नव्हती. चार दिवसांनी कुटुंबाने कठुआच्या हिरानगर पोलीसठाण्यात पोरगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
बकरवाल हा समाज प्रामुख्याने मुस्लीम आहे तर कठुआ गावात हिंदुंचे प्राबल्य आहे. असीफाचा मृतदेह कठुआपासून जवळ आढळला. तिच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार करून तिला मारून टाकले होते. त्या घटनेने सारे बकरवाल तर हादरलेच पण देशही हादरला. त्यातच गावात मोठा जातीय तणाव निर्माण झाला. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार होते. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचे सरकार तेव्हा भाजपाच्या आधारावरच तगलेले होते. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपा सहभागी होता आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची मंत्रीपदेही होती.
कठुआजवळच्या एका मंदिरात असीफा गेली होती असे तपासात आढळले तेव्हा तणाव आणखी वाढला. सहा-सात लोकांना पोलिसांनी संशयाच्या आधारे धरले. त्यातील काहींचा गुन्ह्यातील सहभागही स्पष्ट झाला. तणाव वाढतच होता. भाजपावादी पँथर्स पार्टीने आरोपींच्या सुटकेसाठी निदर्शने केली. त्यात भाजपाचे दोन मंत्री सहभागी झाल्यामुळे आणखी मोठा तणाव तयार झाला. या गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत राजकारण घुसलेच. पण एका छोट्या अभागी जिवाच्या परवडीचे राजकारण होणे हे अत्यंत वाईटच होते. कठुआत वा जम्मूत हा खटला चालला तर न्याय मिळणार नाही असे बकरवाल समाजाच्या मंडळींना वाटू लागले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. कठुआ येथील बिघडलेल्या सामाजिक वातावरणाचा अंदाज घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हा खटला पंजाबमधील पठाणकोट शहरातील न्यायालयात हलवला. तिथे जवळपास वर्षभर सुनावणी झाली. साक्षीपुरावे झाले आणि असीफावर अत्याचार करून तिचा बळी घेतल्याबद्दल तीन आरोपींना जन्मठेपेची सजा झाली. या तिघांना मदत करणाऱ्या अन्य तिघांना पाच-पाच वर्षांची सजा ठोठावली गेली आणि एक इसम मात्र निर्दोष सुटला.
या साऱ्या प्रकरणातील राजकारण अद्यापी संपलेले नाही. कारण हा खटला सुरू होता त्या दरम्यान जम्मू-काश्मीरमधील राज्य सरकार कोसळले. मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपाने काढून घेतला. तरी भाजपाचे जे दोन मंत्री कठुआतील आरोपींच्या बाजूने निदर्शने करायला पुढे आले होते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा ही मागणी आजही विरोधी पक्षाचे लोक करीत आहेत. गेल्या एप्रिलमध्ये त्या दोघा मंत्र्यांची हकालपट्टी भाजपाने मुफ्ती मंत्रीमंडळामधून केली होती. मंत्रीपदे काढून घेतली जाणे इतकीच शिक्षा त्यांना झाली आहे. एका निरपराध छोट्या मुलीचा बळी घेऊन त्या लोकांना काय मिळाले? आणि मानवतेला काळिमा लावणाऱ्या गुन्ह्याबद्द्ल दोषींना अधिक कठोर शासन व्हायला हवे होते की नको? हे सवाल आपल्याला अस्वस्थ करतच राहणार.”

