Details
…तर माणसांची माकडे होतील!
18-Dec-2018
| 0
”
नरेंद्र वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@redifmail.com
भोपाळ वायू गळतीतून निर्माण झालेली हिमालया एवढी शोकांतिका कोण विसरेल? दि. २-३ डिसेंबर १९८४ च्या मध्यरात्री युनियन कार्बाईड या अमेरिकन कंपनीच्या कारखान्यातून मिथाईल आयसोसाइनेट गॅसची (एमआयसी) गळती झाली. जगातील या सर्वात मोठ्या गॅस गळतीच्या शोकांतिकेत दोन आठवड्यात आठ हजार लोक किड्या- मुंग्यांप्रमाणे मारले गेले. पाच लाखांहून अधिक लोक बाधित झाले. या दुर्घटनेनंतर त्वरीत जर्मनीहून तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सोडियम थायोसल्फेट, या औषधाचा मारा सुरू केला. हे औषध प्रभावी ठरले. पण, त्यानंतर आठवडाभरातच प्रशासनाची बुद्धी फिरली. दि. ११ डिसेंबर १९८४ रोजी ते औषध बंद करून स्टेरॉईडस आणि ब्रोंचोडायलेटर्स हे नवीन औषध सुरू केले. पण ते निरूपयोगी ठरले. तीन महिन्यांनी डॉक्टरांना जाग आली. त्यांनी पुन्हा सोडियम थायोसल्फेटचे इंजेक्शन सुरू केले. तथापि, हे उपचार जून १९८५ मध्ये पुन्हा बंद करण्यात आले. दुर्दैवाने फक्त पाच टक्के लोकांवर योग्य उपचार झाले. अनेक लोक योग्य उपचारा अभावी आणि ठप्प प्रशासनामुळे मरण पावले.
तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांना ही गोष्ट तब्बल नऊ महिन्यांनंतर समजली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. प्रशासनाच्या मठ्ठपणामुळे अनेक निष्पाप लोकांची निर्घृण हत्त्या झाली होती. आजही दर महिन्याला या गॅस गळतीमुळे बाधित झालेले २० ते २५ दुर्दैवी लोक मरण पावत आहेत. सारांश, जगातील गॅस गळतीची ही सर्वात मोठी शोकांतिका आजही थांबलेली नाही.
हे सारे आठवण्याचे कारण असे की, पनवेलजवळ असलेल्या हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड (एचओसीएल) कारखान्यातून नुकतीच गॅस गळती झाली. या प्राणघातक विषारी गॅस गळतीमुळे तब्बल ३१ माकडे आणि १४ कबुतरे मरण पावली. कारखान्यातील कर्मचार्यांनी ही दुर्घटना लपविण्यासाठी कारखान्याच्या आवारात मोठा खड्डा खोदून त्यात या दुर्दैवी जीवांना गाडून टाकले. इस्रोसाठी इंधन तयार करणार्या युनिटमधून बुधवारी रात्री ही गॅस गळती झाली. या गॅसचा दर्प इतका उग्र होता की आसपासच्या गावात तो पोहोचला. मोहपाडा, आपटा आणि आंबिवली गावात गॅसची दुर्गंधी पसरली आणि एकच हाह:कार माजला. काय घडले हे पाहण्यासाठी गावकर्यांनी, पत्रकारांनी एचओसीएलच्या दिशेने धाव घेतली. पण सुरक्षारक्षकांनी पत्रकारांनादेखील आत जाऊ दिले नाही. दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी वन विभागाने एचओसीएल आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या सात कर्मचार्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नाही. पण मुकी माकडे आणि गरीब कबुतरे मात्र जीवानिशी गेली. भोपाळ दुर्घटनेनंतरदेखील विषारी गॅस ओकणारे कारखाने किती बेपर्वाईने चालविले जात आहेत हे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सरकारने वेळीच सावध होऊन योग्य ती उपाययोजना केली नाही तर उद्या माणसांचीदेखील माकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज माकडे आणि कबुतरे गेली. उद्या माणसे जातील. तो दिवस उगवेपर्यंत सरकार वाट पाहणार आहे का?”

