Details
भय्यूजी महाराज आत्महत्त्या प्रकरणाला मिळणार कलाटणी!
31-Dec-2018
| 0
”
जगदीश भोवड
jagdish.bhovad@gmail.com
अध्यात्मिक गुरूमहाराज हे समाजाला मार्गदर्शन करीत असतात. पीडितांना-वंचितांना ईश्वरभक्तीच्या माध्यमातून जीवन-मार्ग दाखवत असतात. त्यामुळेच जीवनात हेलकावे खाणारे असंख्य लोक आध्यात्मिक गुरूमहाराजांच्या भजनी लागलेले आपण पाहत असतो. अशाच आध्यात्मिक गुरू असलेल्या भय्यूजी महाराजांनी वंचित-पीडित तर सोडाच, पण मोठमोठे राजकीय नेते त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असताना, सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना आपले जीवन का संपवावे? त्यांनी आत्महत्त्या का करावी? त्यांच्या आत्महत्त्येमागे काय कारणे असतील, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आता भय्यूजी महाराजांच्या आत्महत्त्या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका तरूणीमुळे भय्यू महाराजांनी टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात असून विनायक दुधाळे या भय्यूजी महाराज यांच्या विश्वासू सेवकानेच त्या तरूणीच्या मदतीने त्यांचा ‘विश्वासघात’ केल्याचे आता पुढे येत आहे. भय्यूजी महाराजांनी आत्महत्त्या केल्यानंतर फरार झालेल्या या सेवकाला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे.
भय्यू महाराजांनी आत्महत्त्या केल्यानंतर, त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. भय्यूजी महाराजांच्याच घरात मोठे वादळ निर्माण झाले होते. महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा हिच्याकडे संशयाने पाहिले जाऊ लागले होते. पहिल्या पत्नीची कन्या कुहू हिनेही आपल्या सावत्र आईमुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्त्या केल्याचे आरोप केले होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर तसेच आत्महत्त्येसंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट होऊ लागल्यानंतर या दोघींमधील मतभेद संपुष्टात आले असून या दोघींनी नुकतीच पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरिनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली आणि भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरूणीने भय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.
भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्त्या केली होती. अचानक आणि अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने देशभरात खळबळ माजली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्त्या केल्याची चर्चा सुरू झाली होती. भय्यू महाराज यांच्या आत्महत्त्येनंतर सुसाईड नोटही सापडली होती. त्याच्या दुसऱ्या पानावर ‘माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा’, असा उल्लेख होता. भय्यू महाराजांचा कुटूंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली? आणि हा विनायक कोण, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. मात्र, जे लोक भय्यूजी महाराज यांच्याकडे नियमितपणे जात होते त्यांना विनायक कोण हे माहीत आहे. विनायक दुधाळे असे त्याचे नाव असून तो मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे. विनायक नेहमी भय्यूजी महाराजांसोबतच असे. भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे. विनायकचा शब्द हा भय्यूजी महाराजांचा शब्द मानला जात असे. अशा या विनायकने महाराजांवरील आपल्या विश्वासाचाच विश्वासघात का केला, याचाही शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
भय्यूजी महाराजांच्या आत्महत्त्येसंदर्भात आता जवळपास वर्ष-सव्वा वर्षानंतर जी माहिती बाहेर आली आहे, ती धक्कादायक नक्कीच आहे. भय्यू महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा दावा डॉ. आयुषी आणि कुहू यांनी केला आहे. ब्लॅकमेलिंगमुळे विवंचनेत असलेल्या भय्यू महाराजांनी आत्महत्त्या केल्याचा संशयही दोघींनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला भय्यूजी महाराजांचा पूर्वीचा ड्रायव्हर कैलास पाटील याला यासंदर्भातील कटकारस्थानाची माहिती होती. त्याने पोलिसांना जी माहिती दिली आहे, त्यात सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरूणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे.
भय्यू महाराजांच्या आत्महत्त्येसंदर्भात त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील याने पोलिसांकडे नोंदवलेल्या आपल्या जबाबामध्ये ‘भय्यू महाराजांना गोळी झाडून आत्महत्त्या करण्यासाठी प्रवृत्त केले गेले. फुटी कोठी भागात राहणारी एक तरूणी याची सूत्रधार आहे. ही तरूणी भय्यूजी महाराजांच्या दुसऱ्या लग्नापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठी येत असे. तिने महाराजांसोबत प्रेमसंबंध जुळवले आणि अश्लील व्हिडिओ तयार केला. डॉ. आयुषी शर्मांसोबत महाराजांनी दुसरे लग्न केल्यानंतर या तरूणीचे घरी येणे-जाणे बंद झाले. मात्र तिने हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत भय्यूजी महाराजांकडून दरमहा दीड लाख रूपये उकळण्यास सुरूवात केली. या ब्लॅकमेलिंगमध्ये महाराजांचा खास सेवक विनायक दुधाळे आणि शेखर देशमुखही सहभागी झाले होते. विनायकच्या माध्यमातूनच अनेकदा तरूणीशी संपर्क केला जात असे.’ असे ड्रायव्हर कैलास पाटील याने नमूद केले आहे. कैलासने असा जबाब दिल्याचे पोलिसांनी एका मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलेले आहे. त्यामुळेच कैलासने नोंदवलेल्या या जबाबानुसार कलम १६४ अंतर्गत कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
भय्यूजी महाराज हे साधेसुधे आध्यात्मिक गुरूमहाराज नव्हते. तर त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले जात होते. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रिय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची ऊठबस असे. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांशी सख्य असणारा आणि त्यामुळेच पैशांची कमी नसणारा असा पॉवरफुल माणूस एकाएकी आपले जीवन कसा काय संपवून टाकू शकतो, असा प्रश्न त्यावेळी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला होता.
भय्यू महाराज यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख असे आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये १९६८ साली त्यांचा जन्म झाला होता. भय्यू महाराजांचे कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील तामसी गावचे. मात्र, पाच दशकांपूर्वी त्यांचे वडील मध्य प्रदेशातील शुजालपूर गावात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांचा या गावाशी अगदी तूरळक संबंध आला. भय्यूजी महाराजांचा लहानपणापासूनच आध्यात्माकडे कल होता. घोडेस्वारी आणि तलवारबाजीचाही त्यांना शौक होता. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत एका खासगी कंपनीमध्ये नोकरीही केली होती. मात्र नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. ‘सियाराम’ यासारख्या प्रसिद्ध कपड्यांच्या कंपनीसाठी त्यांनी मॉडेलिंगही केली होती. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगलाही त्यांनी सोडचिठ्ठी दिली होती. पुढे आध्यात्मिक क्षेत्रात ते रमले. लोकांना सल्ले देऊ लागले. महाराज म्हणून त्यांचा परिचय वाढत गेला. त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येणाऱ्यांमध्ये राजकीय क्षेत्रातील मंडळींचीही संख्या मोठी होती. एखाद्याला निवडणुकीला उभे राहयचे असेल तर ते त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. भय्यूजी महाराजांच्या मार्गदर्शनाचा अनेकांना फायदा झालेला होता. काहींना ते स्पष्टपणेच आपली मते सांगत असत. तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका. तुम्हाला यश नाही, असेही ते सांगत असत. अशा मंडळींचा हिरमोड होत असे. मात्र यश मिळेल असे ते ज्यांना सांगत असत, त्यांचीही संख्या कमी नव्हती. त्यामुळे भय्यूजी महाराजांकडे राजकारणात काहीतरी करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढली होती.
इंदूरमध्ये भय्यूजी महाराजांचे मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे असंख्य अनुयायी आहेत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारणी इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत असत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गानकोकिळा लता मंगेशकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रसिद्ध गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी अशी कितीतरी दिग्गज मंडळींची नावे घेता येतील की जे भय्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत. भय्यू महाराज यांनी केवळ आध्यात्मिक सल्ले-मार्गदर्शन देण्याचेच काम केले असे नाही, तर त्यांनी सामाजिक क्षेत्रातही काम केलेले आहे. भय्यू महाराज हे सद्गुरू धार्मिक ट्रस्ट नावाने ट्रस्ट चालवत असत. या ट्रस्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप दिली जात असे. तसेच कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत असत. शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप असो किंवा इतर काही.. त्यांनी मदत केली. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे २०११ साली लोकपाल आंदोलनाच्या वेळीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांना दूत म्हणून अण्णा हजारे यांच्याकडे पाठवले होते. तसेच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठीही भय्यू महाराज यांना बोलावण्यात आले होते. एवढेच नव्हे तर अध्यात्मिक गुरूमहाराज भय्यूजी महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीने अहमदनगरमधील कोपर्डी येथे बलात्कारपीडित चिमुकलीचे स्मारकही बांधण्यात आले होते. तसेच महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते, त्या काळात भय्यूजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते. भय्यू महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकाने दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरूपपणे वाचले होते. मात्र, कारचालक आणि सहकाऱ्यांना इजा झाली होती. मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपा सरकारने भय्यूजी महाराजांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊ केला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला होता.
भय्यूजी महाराज यांनी ज्या दिवशी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्त्या केली, त्याच्या आधी त्यांनी केलेले एक ट्विट खूपच महत्त्वपूर्ण आणि त्यांना आपला मृत्यू कळला आहे अशा स्वरूपाचे होते. हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, असे शेवटच्या ट्विटमध्ये भय्यू महाराजांनी म्हटले होते. या ट्विटमध्ये त्यांनी मासिक शिवरात्री अर्थात महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. या ट्विटसोबत भय्यूजी महाराज यांनी संस्कृत वचन असलेला महादेवाचा फोटो ट्विट केला होता.
समाजामध्ये मोठे स्थान असलेला, राजकारण्यांमध्ये ऊठबस असलेला भय्यूजी महाराज यांच्यासारखा एक आध्यात्मिक गुरू या जगातून अचानक एक्झीट घेतो, आपले जीवन संपवून टाकतो, ही खरेच धक्कादायक बाब म्हटली पाहिजे. मात्र, त्याचवेळी भय्यूजी महाराज यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करणाऱ्या, त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या त्या तरूणीचाही छडा लागला पाहिजे. ती तरूणी कोण, सेवक विनायकनेही भय्यूजी महाराजांचा का विश्वासघात केला, याचाही शोध आता पोलीस घेतील आणि या प्रकरणातील सत्य काय आहे, ते बाहेर पडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
कलम १६४ काय आहे?
कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या केसमध्ये साक्षीदार हे महत्त्वाचे असतात. मात्र अनेकवेळा साक्षीदार पोलिसांसमोर दिलेला जबाब न्यायालयात बदलतात. त्यामुळे केसचा अपेक्षित निकाल लागत नाही. त्यामुळे न्यायालयात कोणत्याही केसच्या बाबतीत सबळ साक्षीपुरावे महत्त्वाचे असतात. इतर वेळा पोलिसांसमोर दिलेला जबाब साक्षीदार न्यायालयात बदलत असतात. मात्र कलम १६४ अंतर्गत नोंदवलेला जबाब बदलणे सहज शक्य नसते. जबाब बदलल्यास साक्षीदारालाच शिक्षा होऊ शकते. या खटल्यात हेच महत्त्वाचे ठरणार आहे.”

