HomeArchiveमराठी पंतप्रधान: एक...

मराठी पंतप्रधान: एक हळवं स्वप्न!

Details
मराठी पंतप्रधान: एक हळवं स्वप्न!

    08-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
एके काळी मराठी सैन्याने अटकेपार झेंडे लावले होते. शिवरायांचा भगवा सध्याच्या अफगाणिस्तानाच्या सीमेजवळ, सध्याच्या पाकमधील अटक या गावावर मराठी सैन्याने फडकवला होता. राघोबादादाच्या सैन्याने तो पराक्रम केला होता. मल्हारराव होळकर त्यांच्या समवेत होते. दोघांनी मिळून अहमदशहा अब्दालीचा पुरता बंदोबस्त केला. काबूल, कंदहारपर्यंत त्यांनी अंमल बसवला. तेव्हापासून मराठी पराक्रमाचा शिरपेच म्हणून, मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले, ही म्हण मराठी साहित्यात रूजली. ते मराठी माणसाचे स्वप्न कायमच राहिले. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असा मुजरा कविंनी या स्वप्नाला मराठी पराक्रमाला केला. 1752 – 1760 या काळात दिल्लीच्या बादशहाचे तख्त फोडण्याचाही पराक्रम मराठी सेनेने त्या काळात करून दाखवला होता. ती मराठी सैन्याची भीती नंतरच्या पिढ्यांमध्ये दिल्लीने कायमच मनात बाळगली. मराठी माणसाला, मराठी नेत्याला वाव मिळाला तर तो सहजच दिल्लीचे सिंहासन काबीज करू शकतो. पराक्रमाने ते सिंहासन राखूही शकतो, टिकवूही शकतो. पण हे इतिहासातील दाखले अलिकडच्या राजकारणात लागू झाले नाहीत. जेव्हा जेव्हा मराठी नेत्यांनी दिल्लीत जम बसवला, पराक्रम केला. राजकारणात नवी शिखरे पादाक्रांत केली, तेव्हा तेव्हा मराठी माणसाला हेच स्पन पडते की, “चला, आता आपला एखादा नेता दिल्लीत खऱ्या अर्थाने राज्य करणार, मराठी माणूस पंतप्रधान होणार..!” पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत नाही.

स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व 1980 पर्यंत दिल्लीवर राहिले. सर्वाधिक संख्येने खासदार याच पक्षाचे निवडून येत असत. तेव्हा त्या पक्षाचा नेताच पंतप्रधान होणार हे उघड होते. ती संधी उत्तर प्रदेशाबाहेरच्या नेत्यांना क्वचितच मिळाली. नेतृत्त्वाची संधीच नाही तेव्हा पंतप्रधानपदाचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यातही धूसर. हीच स्थिती कायम होती. यशवंतराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान होऊ शकले असते. मराठी माणसाने स्वप्न पूर्तीची शक्यता चव्हाण साहेबांमध्ये नक्कीच पहिली. पंडित नेहरूंनंतर काँग्रेसमध्ये कुणाला नेतृत्त्व द्यावे याचा विचार सुरू झाला. तेव्हा सर्वात आधी लालबहाद्दुर शास्त्रींचे नाव पुढे आले. कारण तेव्हा पंडितजींच्या कन्या इंदिरा गांधी या सरकारमध्ये व पक्षातही फार पुढे नव्हत्या. शास्त्रींच्या निधनाने जी अचानक पोकळी निर्माण झाली, त्यात मोरराजी देसाईंचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येऊ शकले असते. तसेच ते यशवंतराव चव्हाणांचेही येऊ शकले असते. पण सिंडिकेट नावाच्या काँग्रेसमधील कंपूने इंदिरा गांधींना ते पद बहाल केले.

तेव्हा असे मानले जात होते की, इंदिरा गांधी या कुणाच्या तरी हातातले बाहुले म्हणून काम करतील. निजिलिंगप्पा म्हणा वा सिंडिकेटचे अन्य नेते यांच्या धोरणात्मक निर्णयावर इंदिराजींचे सरकार चालेल. पण तसे घडले नाही. गुंगी गुडिया म्हणून ज्यांची संभावना केली गेली त्या इंदिरा गांधींनी त्यांचे राजकीय रंग हळूहळू प्रकट केले आणि सिंडिकेटची तोंडेच बंद झाली. इंदिरा गांधींनी सिंडीकेटच्या नीलम संजीवा रेड्डी यांच्याऐवजी व्ही. व्ही. गिरी यांना राष्ट्रपतीपदाची संधी देण्याचे ठरवले. त्या साऱ्या राजकारणात इंदिरा गांधींना यशवंतरावांनी साथ दिली. पण काँग्रेस फुटू नये अशीही त्यांची इच्छा व प्रयत्न राहिले. राम खांडेकरांच्या पुस्तकात ते सारे संदर्भ तपशिलात आले आहेत. पण यशवंतरावांनी काही काळ सिंडिकेटला साथ दिली हे इंदिरा गांधी कधीच विसरल्या नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीविरूद्ध यशवंतराव असा छुपा संघर्ष काँग्रेसमध्ये सुरू राहिला. जनता लाटेत यशवंतरावांना केवळ काही महिने उपपंतप्रधानपदाची संधी मिळाली. नंतरच्या निवडणुकीत पुन्हा इंदिरा गंधी याच धुंवाधार संख्यने खासदार घेऊन परतल्या आणि मराठी मनाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दुरावली. इंदिरा गांधींच्या राजवटीत दिल्लीने चव्हाण साहेबांचा दुस्वासच केला. याचे मराठी माणसाने लावलेला अर्थ इतकाच होता की एखादा मराठी माणूस दिल्लीत स्थिरावणे हे दिल्लीकरांच्या राजकारणाला मानवणारे नव्हते.

1990 च्या दशकात देशात कडबोळ्या सरकारांचे प्रयोग सुरू झाले. आघाड्यांची सरकारे आली. त्या राजकारणात ज्या नेत्याला देशस्तरावर विविध पक्षांमध्ये मित्र जोडता येतील त्याचा नंबर देशाच्या नेतृत्त्वपदी लागू शकले अशी स्थिती तयार झालेली होती. यशवंतरावांचे चेले शरदराव पवार हे या काळात दिल्लीत दाखल झाले. नरसिंहरावांचे संरक्षणमंत्री ते बनले. काँग्रेसचे सरकार सत्तेत नसतानाच्या काळात त्यांना पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेतृत्त्व करता आले. त्या नात्याने ते लोकसभेतील विरोधी पक्षनेता बनले. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही दावा ठोकला होता. पण पुन्हा काँग्रेसमधील उत्तरेतील नेत्यांनी मराठी नेत्याला दिल्लीत वरच्या पदावर येऊ न देण्यात यश मिळवले. पवारांऐवजी त्यांनी सीताराम केसरींना काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसवले. जेव्हा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा शरद पवार पंतप्रधानपदाच्या सर्वात जवळ पोहोचल्याचे दिसत होते. मात्र संसदेतील विरोधी पक्षनेता या नात्याने सरकारचे नेतृत्त्व करण्याची संधी पवारांना देण्याचे काँग्रेसने नाकारले. त्यांच्याऐवजी सोनिया गांधींची निवड नेतेपदावर करून काँग्रेसने पुन्हा एकदा मराठी नेत्यांला रोखले. राष्ट्रपती भवनापुढे उभे राहून सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, “येस आय हॅव द नंबर्स!” बहुधा तिथेच शरदराव पवारांच्या मनात काँग्रेसला सोड-चिठ्ठी देण्याचे ठरले असेल. नंतर थोड्याच काळात त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला.

त्यांच्याआधी चंद्रशेखर, आय. के. गुजराल, देवेगौडा असे नेते मुठभर खासदारांच्या जिवावर थेट पंतप्रधानपदावर आरूढ झालेले देशाने व मराठी माणसांनीही पाहिलेच होते. मग पवारसाहेब का नकोत, या ईर्षेने त्यांचे कार्यकर्ते तर कामाला लागलेच. पण, मराठी माणूस पंतप्रधानपदावर बसणार असेल तर शिवसेनाही त्यांच्या पाठीशी राहील ही भूमिका स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. 2004 आणि 2009 च्या निवडणुकांमध्ये पवारांनी त्या दृष्टीने शर्थीचे प्रयत्नही केले. पण यशाने हुलकावणी दिली. कारण काँग्रेसने भरभक्कम खासदार लोकसभेत आणले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा सरकार स्थापनेसाठी त्यांना हवा होता. पण नेतृत्त्व त्यांच्याकडे सोपवण्याची काँग्रेसला गरजच नव्हती. त्यांना पंतप्रधानपदासाठी गरज नव्हती. पण सरकार स्थापन करण्यासाठी गरज होती. अर्थातच मनमोहन सिंहांकडे ती जबाबदारी आली. पण शरदरावांचे दिल्लीत वजन मात्र वाढले होते. महत्त्वाची खाती त्यांनी दहा वर्षे सांभाळलीच. पण तरी उपपंतप्रधानपदही नाही. मग पंतप्रधानपदाची संधी तर पुष्कळच दूर राहिली. काँग्रेसेतर पक्षांच्या संदर्भात दिल्लीत मराठी माणसाचे महत्त्व वाढण्याची शक्यता सध्या फक्त भारतीय जनता पक्षाकडेच आहे. त्यातही नितीन गडकरी हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.

तेव्हा पुन्हा एकदा मराठी माणसाला पंतप्रधानपदाची संधी दिसू लागली. स्वप्नांना धुमारे फुटले. आताही नरेंद्र मोदी जर पंतप्रधान पदावर दिसणार नसतील तर ज्या दुसऱ्या भाजपा नेत्याचे नाव पुढे येऊ शकते त्यात गडकरींचेच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात कदाचित संधी मिळूही शकेल. शरद पवारांनी मात्र आपण आता त्या स्पर्धेत असणार नाही असे म्हटले आहे. माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे. त्यामुळे मी भलतीच स्वप्नं पाहात नाही असेही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे भाजपाच्या दुसऱ्या फळीतील एक प्रमुख नेते सध्या आहेत. ते तरूण आहेत. त्यांना राजकारणात व त्यांच्या पक्षातही भवितव्य नक्कीच मोठे आहे. २०१९ मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी दिसतील असे अनेक निरिक्षकांना वाटते. महाराष्ट्रातही भाजपाचेच सरकार आले तरीही फडणवीसांना दिल्लीत जावे लागेल असे सांगितले जाते. त्यामुळे मराठी माणूस पंतप्रधानपदावर दिसण्याची आणखी एक शक्यता तयार झालेली आहे. आणखी पाच-दहा वर्षांनतंरच्या राजकारणात मराठी पंतप्रधानपद हे आपले हळवं स्वप्न पूर्ण होऊ शकेल का, हा प्रश्न मात्र अजुनी आपल्याला खुणावतच राहणार आहे.”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content