Details
प्रियांका देणार धडक!
16-Feb-2019
| 0
”
विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता केवळ दोन महिने उरले असताना काँग्रेसने “प्रियांका कार्ड” काढले असून कार्यकर्त्यांत नवी उर्जा आणली आहे. प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या. उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथे प्रियांका गांधी यांनी प्रचंड असा माहोल निर्माण केला. त्यांच्या सक्रिय आगमनाने काँग्रेस पक्षात संजीवनी संचारल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रियांका आता चमत्कार घडविणार असा संदेश यानिमित्ताने देशभर गेला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यावर पक्षाला अच्छे दिन दाखविलेच, पण भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा राफेल खरेदी घोटाळयावरून झोप उडविली. एकटया राहुल यांनी मोदी, शाह आणि भाजप यांना अंगावर घेतले. आता बहिणाबाई प्रियांका साथीला आल्याने त्यांनाही मणभर बळ आले तर नवल नव्हे.
गेल्या सत्ता काळात पंतप्रधान मोदी यांनी कधी नव्हे तो आणि नव्हे इतका विकास केल्याचा डांगोरा पिटला जात आहे. केलेला विकास दिसत नसल्याने प्रचंड जाहिरातबाजी करावी लागत आहे. दिलेल्या आश्वासनांचे काय झाले असा प्रश्न मोदी सरकारला पडत नसला तरी देशातील सामान्य जनतेला तो जरूर पडत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे ढोल बडवले जात आहेत. मात्र काळया पैशाचे काय झाले? त्यावर जनतेला समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. दुसरीकडे जीएसटीमुळे छोटे उद्योजक आणि व्यापारी यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक छोटे उद्योग बंद पडले. त्यामळे बेकारांच्या तांडयात भर पडली.
मोदी सरकारने एक कोटी नोकऱ्या देण्याचे जाहीर केले. मात्र नेमक्या त्या नोकऱ्या कोणाला मिळाल्या? राज्य सरकारने बेकारांना खुश करण्यासाठी मेगा भरतीची आरोळी ठोकली. प्रत्यक्षात भरती कोठे दिसत नाही. पाचशे होमगार्डच्या भरतीसाठी साडेपाच हजार अर्ज आले. तेही पदवीधर तरुणांचे आणि अभियंत्यांचे आहेत. मेगा भरतीतसुद्धा संधी नाही म्हणून आता रोजीरोटीसाठी होमगार्ड्सची वाट धरावी लागते आहे. तेथेही पदं कमी आणि उमेदवारांची गर्दी असे चित्र आहे. मोदी सरकारच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आलाच पण रिझव्र्ह बँकेच्याही हक्कांवर गदा आणली गेली. काल परवा अभिनेता अमोल पालेकर यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कात्री लावली गेली. लोकांना निषेध करण्याचे आणि मोर्चे सभा आयोजित करण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. याला काय म्हणायचे? सरकारची चाटेगिरी करणारे देशभक्त आणि सरकारी धोरणांना, अत्याचारांना विरोध करणारे देशद्रोही अशी सरळ-सरळ विभागणी केली गेली. या देशात मोदी हाच परवलीचा शब्द होऊन बसला.
सत्ता ही सेवेसाठी असते. मोदी सरकारने विकासाचा मुद्दा रेटून मोजक्या उद्योगपतींचा विकास घडवून आणला. अदानी आणि अंबानी यांच्यासाठी हे सरकार काम करते असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राफेलचा घोटाळा सरकार दडपत होते. मात्र राहुल गांधी यांनी एकटयाने हा घोटाळा संसदेत सातत्याने देशाच्या जनतेसमोर मांडला. राहुल गांधींना टार्गेट करण्याची एकही संधी मोदी, शाह आणि भाजपने सोडली नाही. अशी आजची राजकीय परिस्थिती असताना प्रियांका गांधी यांनी काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या काही चमत्कार करतील असे मुळीच नाही. मात्र पक्षात नवी जान येईल, कार्यकर्त्यांना हुरूप येईल हे तर नक्कीच. मोदी, शाह आणि मुख्यमंत्री योगी यांना प्रियांका गांधी टक्कर देणार हे काय कमी आहे काय?
प्रियांकामध्ये लोक इंदिरा गांधी पाहतात. निरागस आणि सोज्ज्वळ चेहरा असलेल्या प्रियांका आज काँग्रेस पक्षाच्या चेहरा बनल्या आहेत. त्यांच्या लखनौमधील रॅली आणि रोड शोचे जे कव्हरेज टीव्ही चॅनेल्सने दाखविले. त्यामुळे भाजपचे विमान आता जमिनीवर यायला हरकत नाही. आव्हाने मोठी आहेत. त्यामुळे संघर्षही मोठाच करावा लागेल. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आशावादी आहेत. ते गैर नव्हे. योगायोगाने प्रियांकाच्या लखनौमधील रोड शोच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पक्षातंर्गत सव्र्हे प्रकाशात आला आहे. काही मोजक्याच वृत्तपत्रांत तो दिसला. हातातील तीन राज्ये गेली. आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि मायावती यांची आघाडी निर्माण झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि अन्य भाजपविरोधी राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. त्यात प्रियांकाची एन्ट्री झाल्याने भाजपच्या जागा घटणार, असा तो सव्र्हे आहे. महाराष्ट्रातही भाजपला जोरदार फटका बसेल यात शंका नाही. लोकसभेत नुकसान झाले. तर महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणारच. ही भीती असल्याने राज्यात एकत्र निवडणूक व्हावी असे भाजपच्या चाणक्यांना वाटत आहे. काहीही असले तरी भाजपला आता मैदान सोपे नाही. हेच खरे!
प्रियांकाना अपशकून करण्यासाठी भाजप मागे राहणार नाही. वड्रा यांची पुन्हा पुन्हा चौकशी केली जाईल. काँग्रेसला टार्गेट केले जाईल. त्यामुळे भाजपचे महत्त्व मुळीच वाढणार नाही. राजकारणात चढ-उतार असतो. काँग्रेसची विचारधारा सामान्य माणसाला सोबत घेणारी आहे. काँग्रेसला गांधींच्या तत्त्वांचे अनुष्ठान आहे. लोकांनी भाजपला भरपूर संधी दिली. एकहाती सत्ता मोदींकडे होती. मात्र लोकांच्या भल्यासाठी ती राबविली गेली काय, हा खरा सवाल आज भारतीय जनतेच्या मनात आहे. जनता नेहमी अबोल असते. मात्र संधी मिळते तेव्हा हीच जनता प्रत्येकाचे हिशेब चुकते केल्याशिवाय राहत नाही हेही, एक सत्य आहेच. प्रियांका गांधी चमत्कार करणार नाहीत. मात्र त्या मस्तवाल भाजप आणि त्यांच्या चाणक्यांना जोरदार धडक देतील, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.”

