HomeArchiveपॉलिटिकल एअर स्ट्राईक!

पॉलिटिकल एअर स्ट्राईक!

Details
पॉलिटिकल एअर स्ट्राईक!

    05-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
टिकलं ते पॉलिटिकलं, पॉलिटिकलं ते टिकलं, हे इथल्या टोपीबाज राजकारण्याचं ब्रीद. खुर्ची, मानसन्मान, सत्ता, सामर्थ्य गमावण्याची वेळ जवळ आल्यावर सत्ताधुंद माणूस सैरावैरा होतो. वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी तो जिवाचा आटापिटा करू लागतो. गेले काही दिवस आपण हे पाहतच आहोत. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये शिरून भारतीय वायूदलाने अचूक लक्ष्यभेदाने दहशतवादी व त्यांच्या अड्ड्यांची अवघ्या काही मिनिटांत दफनभूमी बनवली. वायूदलाच्या या शौर्याला अवघ्या देशवासियांनी सलाम ठोकला. पण, हा हल्ला कसा करायचा, विमानांचे उड्डाण कसे भरायचे इथपासून दहशतवादी तळांवर बॉम्बवर्षाव करण्याच्या मोहिमेत आपले पंतप्रधान जातीने नजर ठेवून होते. अनेक तळांवर तर त्यांनी आपल्या हातांनी बॉम्बचा मारा केला (सौजन्य, सोशल मीडिया, भाजपा भक्तसंप्रदाय) इतपत या ‘एअर स्ट्राईक’ चित्रपटाची तयारी आता पूर्ण झाली आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असले तरी आमचा न. मो. भक्तसंप्रदाय तसेच भाजपातील स्टोरी व स्क्रीप्ट रायर्टसनी अख्खा सिनेमाच देशवासियांसमोर ट्रेलररूपात ठेवला आहे. जसजशी लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येत जाईल तसतसे या चित्रपटातील नायकापासून एका एका पात्राचा आपसूक उलगडा होत जाईल नव्हे तो होतही आहे.

आम्ही राजकीय लाभासाठी त्याचा पुरेपूर उपयोग करू. ज्यांनी आई, बाप, भाऊ, बहीण, पती गमावला त्याच्या दु:खावर आमचं राजकारणच फुंकर घालेल. आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह पाहयचे आहेत, पुरावे द्या! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भारतीय हवाई दलाच्या बालाकोट एअरस्ट्राईकवर उपस्थित केलेली ही शंका कितपत योग्य? त्यावर हवाईदल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांचे, ‘किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम आम्ही करत नाही, हे चोख उत्तर हे मिशन किती सिक्रेट होतं हेच दर्शवतं. बालाकोटच्या मिशनमध्ये अवघ्या दीड मिनिटात 200 ते 300 दहशतवाद्यांची राख झाल्याने सरकार आणि हवाईदल विरोधकांना पुरावे तरी कसे देणार? अरविंद केजरीवाल, राज ठाकरे उठसुठ सरकारच्या मिशनवर प्रश्न उपस्थित करत आहेत. आता तर शरद पवारांनीही मोदींची फिरकी घेण्यास सुरूवात केली आहे. देशाचा मूड बदलला हे मोदींना समजल्यानेच त्यांनी हवाई हल्ल्याचं आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचंही राजकारण सुरू केलं आहे. पवारांच्या या बोलण्यात तथ्य मानावं?

पुलवामानंतर दु:खात आकंठ बुडालेले आपले पंतप्रधान कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले नाहीत. लोकार्पण, रिबिन कापणे, भाषण ठोकणे हे समस्त महाराष्ट्र व देशाने गेले कित्येक दिवस पाहिलेच नाही. किती ते अपार दु:ख, पंतप्रधानांच्या चेहर्‍यावर. डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्ये भाजपाने गमावली. त्यानंतर जनता आपल्याला नाकारणार, याची कुठेतरी या सरकारला खात्री पटू लागल्याने ‘जवानाचं शौर्यही आमचं शौर्य’, हा टेंभा मिरवण्याची किंचितही संधी सोडली जात नाही. मोदी आणि त्यांचा भक्तसंप्रदाय हे कसे मान्य करेल? शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणि आता छाती कोण फुगवून दाखवत आहे, हे पवारांचे बोल जिव्हारी लागणारे आहेत. पण, देशासाठी चौकीदाराची भूमिका बजावणार्‍या मोदींशिवाय आता देशाला पर्याय नाही. अहो इतकचं काय ‘मोदी सरकार पुन्हा सत्तेत न आल्यास पाकिस्तान संसदेवर हल्ला करेल’, हे आमासमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते हेमंत बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य इथल्या यंत्रणांना आता अधिक गांभीर्याने घ्यावे लागणार. तरीही पुलवामा घडले की घडवले, हे प्रश्न मोदी सरकारच्या बिगरराजकीय, देशहिताच्या हेतूवर संभ्रम निर्माण करत आहेत. ‘रोम जळत होता तेव्हा नीरो फिडेल वाजवत होता’, हे आपल्या पंतप्रधानाविषयी सूतराम शक्य नाही. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकसारख्या मिशनचा राजकीय फायदा उचलणारे मोदी सरकार नव्हे. आतापर्यंत ते व त्यांच्या पक्षाने हे आम्हीचं केलं, असं राजकीय श्रेय घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही हो!

माध्यमांनाही जाहिरातीचा ‘खुराक’ मिळाल्यानं पुलवामातील हुतात्मा सैनिकांपेक्षा 56 इंचाची छाती फुगवणारे रिअल हिरो का नाही वाटावेत? पुलवामात आपल्या 44 जवानांनी प्राणांची आहुती दिली. तरीही किती दहशतवादी मारले गेले? एअरस्ट्राईक केला की झाडं पाडण्यासाठी गेला होतात? पण, या एअरस्ट्राईकचे एकमेव साक्षीदार तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या स्ट्राईकमध्ये 250 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करून विरोधकांना गप्प केले आहे. शरद पवार, नवज्योत सिंह सिद्धू, कपिल सिब्बल, पी. चिंदबरम्, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील बडी नेतेमंडळी हा आकडा नेमका किती? दहशतवाद्यांच्या मृतदेहाचे काय झाले? असे सवाल करत आहेत. पण, टीम मोदी व भाजपाला अशा गोष्टींचा राजकीय फायदा कसा उठवायचा, हेच गेल्या साडेचार वर्षांत कधीच जमले नाही. तरीही त्यांच्या या बिगरराजकीय ‘एअरस्ट्राईक’वर प्रश्नचिन्ह का उपस्थित व्हावं?”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content