Details
“आल्या निवडणुका, मतदार झाला राजा!”
12-Mar-2019
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
दुष्काळ मोठा मौजेचा.. असे अनेक सरकारी यंत्रणांना वाटत असते. तसेच काहीसे निवडणुकांचे आहे. सार्वत्रिक निवडणुका असोत वा अन्य कुठल्या हा काळ काही घटकांसाठी मौजेचाच असतो. आल्या निवडणुका म्हणत ढोलताशे वाजू लागतात. आताही तेच झाले आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी तातडीची बैठक घेतली तेव्हाच सोमवार किंवा मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी अटकळ होती. पण निवडणूक आयोगाने रविवारचा राहू काळ निवडला. राहू काळ एवढ्यासाठी म्हटलय की हा काळ अनेकजण अनिष्ट मानतात म्हणून राजकीय पक्ष आणि नेते, उमेदवारांच्या पोटात गोळा आला, भीतीची पाल चुकचुकली वगैरै बातम्याही छापल्या गेल्या.
शनिवारी निवडणूक आयोगाची बैठक आहे म्हटल्यावर निवडणूक जाहीर होईल अशी चर्चा पत्रकारांच्या काही ग्रुपवर सुरू होती. तेव्हा कुणीतरी म्हणाले, नाही रविवारी काही उद्घाटने व कार्यक्रम उरकून घेतले जातील मगच सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत निवडणूक जाहीर होईल. पण रविवारी दुपारपर्यंतचे कार्यक्रम पार पडत नाहीत तोच आयोगाने पत्रकार परिषद जाहीर केली आणि संध्याकाळी निवडणुकाही जाहीर झाल्या. अर्थात संबंधित राजकीय पक्षांना या सगळ्याची पूर्वकल्पना असते. त्यानुसारच निवडणुकांआधी महिना-दीड महिना कार्यक्रम, घोषणा, भूमीपूजन, उद्घाटन असा एकच गलका सुरू असतो.
रविवारी सकाळी वाडा-कुडुसकडे एका संमेलनासाठी गेलो होतो. तिथे एका राजकीय कार्यकर्त्याशी गाठ पडली. त्याने सांगितले की, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सकाळी नऊ वाजताच एका गावातील नळपाणी योजनेचे भूमीपूजन उरकून घेतले होते. संध्याकाळी मात्र सगळ्यांचे लक्ष आयोगाच्या घोषणेकडे, निवडणूक कार्यक्रम नेमका कसा असेल याच्याकडे लागले होते. सात टप्प्यांत देशात आणि आपल्याकडे चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ज्या जागांच्या भरवशावर आहेत अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. विविध मुद्द्यांवर लढवली जाणारी ही लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात तरी काही प्रमाणात स्थानिक पातळीवरील नाराजी, तिथले विकासाशी निगडीत मुद्दे, युती वा आघाडीतील सुप्त कधी उघड व्यक्त होणारी धुसफूस, नाराजांची गटबाजी आणि भाजपा सरकारची कामगिरी या बाबींभोवती फिरत राहाणार आहे. प्रचाराचा सारा रोख याच मुद्द्यांवर केंद्रीत असेल.
मोदी की मोदींना पर्याय याचे उत्तर मतपेट्यांमधून मिळेलच पण त्याआधीही कदाचित मोदींना पर्याय म्हणून वेगळेच नाव भाजपा आणि रा.स्व. संघाकडून पुढे येऊ शकते. मोदी आणि अमित शाह आता निवडणुका जाहीर झाल्यावर किती धूर्तपणा दाखवतात, पुढची पावले किती चाणाक्षपणे उचलतात यावर हा पर्याय पुढे येईल की नाही ते अवलंबून असेल. निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व नीती-अनीतीचे मार्ग अवलंबले जाणार आहेत. पेड न्यूजवर नजर, उमेदवारांवर नजर, भरारी पथके, व्हीडीओ पथके, आचारसंहितेची काटेकोर अमलबजावणी, १९५० ही हेल्पलाईन, एप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर हे सारे आयोगाच्या आणि संबंधित यंत्रणांच्या दिमतीला आता २३ मेपर्यंत असले तरी यापेक्षाही एक वेगळाच खुष्कीचा मार्ग राजकीय पक्षांकडे, उमेदवारांकडे असतो. तो यथायोग्य प्रमाणात वापरलाही जातो आणि आताही वापरला जाईल. आचारसंहिता अंमलात आणण्याची पहिली कारवाई ठिकठिकाणच्या बॅनरबाजांवर सुरू झाली आहे. सर्व राज्यांतील बॅनर आता खाली उतरवले जातील. खेदाची बाब म्हणजे या सूचनेची अमलबजावणी ज्यांनी करायला हवी ते राजकीय पक्ष, पुढारी, कार्यकर्ते मात्र आपण त्या गावचेच नाहीत, हे फलक आमचे नाहीतच म्हणत प्रचाराला लागले आहेत.
आयोग, जिल्हा आणि महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा मात्र झाकपाक करायला लागले आहेत. आचारसंहितेचा तरीही भंग होत असल्याचे लक्षात आल्यास ते सी व्हिजील या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आयोगाच्या वा निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आणून देता येईल. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे. वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार काही ठिकाणी धोक्यात येतील त्याचवेळी शिवसेना आणि भाजपा यांच्याही काही जागा स्थानिक स्पर्धेमुळे, नाराजीमुळे, गटबाजीमुळे धोक्यात आहेत. प्रत्येक पक्षाची आणि स्वत:ला कर्तृत्त्ववान मानणाऱ्या नेत्यांची कसोटी पाहणारी ही निवडणूक असेल हे नक्की. २०१४ ला जी लाट होती ती आता ओसरली आहे. पण जी लाट परतली आहे, ओसरली आहे असे वाटते तीच उसळी घेऊन पुन्हा वेगाने फुसांडत येऊही शकते हे विसरणे विरोधी पक्षांसाठी घातक ठरू शकते. मोदींची प्रतिमा ते राफेल आणि डळमळीत अर्थव्यवस्था ते शेतकऱ्यांचा संताप असे अनेक मुद्दे या निवडणुकीत मतदारांभोवती फेर धरणार आहेत.
अमिताभ, तापसी पन्नू यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बदला या चित्रपटात जसे अनेक प्रकारचे सत्य समोर येत राहते तसेच प्रचाराच्या रणधुमाळीत वास्तव, सत्य, असत्य यांची सरमिसळ मतदारांना गुंगवून टाकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मुबलकपणे वापरली जाईल. पण, भारतीय मतदार हा खरोखरीच निवडणुकांपुरता तरी काही दिवसांचा राजा असतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे राजेपद त्याच्याकडे आलेले असते. लाट कुठलीही असू दे, येऊ दे आपल्या मतदारांनी नीरक्षीर विवेकबुद्धी बाळगून नेहमीच लोकशाहीला अनुकूल कौल दिला आहे.”

