HomeArchiveतापलेली उन्हे आणि...

तापलेली उन्हे आणि हरवलेले पाणी

Details
तापलेली उन्हे आणि हरवलेले पाणी

    23-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
एकदा का प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली, प्रचाराचा धुरळा उडायला लागला, निवडणुकीच्या हवेने वातावरण तापायला लागलं की आपल्याला भवतालचा विसर पडतो. आपली हवा किती तापलीय, यंदा उन्हाळा नव्हे सर्वच ऋतू तीव्र ते अतितीव्र या पट्टीत अनुभवास येतायत याचाही विसर पडतो. लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी येईपर्यंत आता हवा एकच ती म्हणजे निवडणुकीची, अशी बहुसंख्य जनतेची मानसिकता होऊन गेली आहे. बुडाखाली एसी गाडी, एसी कार्यालय, घरादारांत एसीची थंड लहर असलेल्यांना बाहेरच्या उष्म्याचा काहीही फरक पडत नाही, उष्म्याची वा उष्ण हवेची लाट आली तरी ही मंडळी त्यांच्या वैयक्तिक थंड बेटांवर सुशेगाद असतात. मग कोणाला पडलीय जागतिक वसुंधरा दिन, हवामान बदल, पृथ्वी नव्हे सर्व सजीवसृष्टीच धोक्यात असल्याच्या चर्चांची फिकीर? आपलं ठरलंय ना, थंड एसीत पडे रहो, मग बाकीचे कसे का जगेनात अशी ही मनोवृत्ती आहे.

विकसित, प्रगत राष्ट्रे अनेकदा विकसनशील राष्ट्रांविषयी अशीच काहीशी वृत्ती दाखवत असतात. याच निवडणुकीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र, जवळपास अर्धा देश तप्त हवेच्या झळा सहन करतोय, उन्हाळा भयंकर तापलाय आताच एप्रिलमध्ये, अजून मे जायचाय, उन भाजून काढतय हे कितीजणांना माहितीय? महाराष्ट्रात आणि देशाच्या अनेक भागांत दुष्काळाने ठाण मांडलंय, आपल्या ग्रामीण भागात याच रणरणत्या उन्हांत बायाबापड्या, पुरूषही टाचा घासत मैलोंमैल कळशीभर पाण्यासाठी तुडवतायत, निमशहरी भागांत, ठाणे-मुंबई सोडलं तर बहुतेक सर्वच शहरं, तालुक्यांच्या ठिकाणी अगदी जिल्ह्यांच्या ठिकाणीही आठवडा-पंधरा दिवसांनी पाणी मिळतंय, ते पण अत्यंत क्षारयुक्त, अस्वच्छ. ते पाणी पिऊन पोटाचे आजार होतायत, डॉक्टरांकडे रांगा लागतायत. या भयानक वास्तवाकडे जणू राज्याने, संपूर्ण देशाने, विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्या राजकीय पक्षांनी पाठ फिरवली आहे.

दुष्काळ, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जलसंधारण योजना यापैकी कुणाच्याच गावी नाहीत. यांच्या जाहिरनाम्यातही त्यांचा उल्लेख नाही आणि प्रचाराच्या राणा भीमदेवी थाटाच्या भाषणांतही गावखेड्यातील पाण्याच्या भीषण दुष्काळाची जाण नाही. समोरची बिसलेरीची बाटली उघडली, पाणी प्यायले की निघाले पुढच्या सभेकडे. गावात पाणी आहे की नाही, समोर जमवलेल्या गर्दीतील लोकांना दररोज पाणी मिळतय की नाही याचे कुणालाच पडलेले नाही. मते मिळतील की नाही याची मात्र चिंता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. सोमवारच्या वसुंधरा दिनी हे असे वास्तव आपल्या सगळ्यांसमोर आहे. यापैकी कुणाकडून अपेक्षा करायची पर्यावरणपूरक सदिच्छांची, उपक्रमांची आणि जागतिक हवामानाबद्दल अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाची? आपल्या जनतेला पाण्याचा थेंब मिळत नाही याचीही चाड ज्यांना नाही ते जागतिक हवामानाविषयी कसली काळजी करणार? जे काळजी करतात त्यांची टर उडवायचे प्रकार आपल्याकडेच नाही इतर देशांमध्येही चालतात.

लंडनमध्ये हवामान बदलांविरोधात ऱ्हासविरोधात उठाव सुरू आहे. पण या अहिंसक आंदोलनालाही दडपले जात आहे. रविवारीच तिथे ९६३ लोकांना अटक करण्यात आली. राज्यकर्त्यांनी हवामान बदलाचं सत्य सांगावं, कार्बनचं उत्सर्जन 2025पर्यंत शून्य व्हावं, यावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांची समिती असावी, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. कोणते राज्यकर्ते अशा मागण्यांकडे लक्ष देऊन सत्य सांगणार? आपल्याच राज्याचे उदाहरण घ्या. यंदा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत आहे, हे वाक्य आता इतके सवयीचे झाले आहे की कुणाला या वाक्यामागील दाहकता जाणवतच नाही. शहरी भागांत तर या दुष्काळाची धग पोहोचतच नाही. आपण फक्त पाण्याच्या दुर्भिक्ष्याच्या बातम्या वाचतो सकाळच्या चहाबरोबर आणि बापरे, काय भयंकर.. पंधरा दिवसांनी पाणी मिळतं यांना, असे म्हणत बेसिनचा नळ सोडून दाढी करतो वा बाथरूममध्ये शॉवरखाली आंघोळ करतो.

फार लांब कशाला जायला हवं. मुंबईच्या जवळ आणि ठाणे-पालघरच्या आदिवासीबहुल भागातच पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबईला पाणी देणाऱ्या तालुक्यांतील रहिवासी पाण्यासाठी तहानले आहेत. जलाशय, धरणे, विहिरी तळाला गेल्या आहेत. गेली काही वर्षे हे नेहमीचे झाले आहे. काही वर्षांपूर्वी, २०१३ मध्ये हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा महाराष्ट्रातील दुष्काळाशी, पाण्याच्या प्रश्नाशी काही संबंध असू शकेल का, याचा अभ्यास सेंट्रल ड्रायलँड फार्मिंग या संस्थेने केला होता. त्यानुसार, महाराष्ट्रातील १७ जिल्हे हवामान बदलासाठी असुरक्षित आणि अतिअसुरक्षित असल्याचे निदर्शनास आले होते. हे १७ जिल्हे नेहमीच अवर्षणाच्या छायेत असतात. अतिअसुरक्षित जिल्ह्यांत सोलापूर, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, सांगली, बुलडाणा, धुळे, नाशिक, जालना, अमरावती हे जिल्हे येतात. तर असुरक्षित जिल्हांत अकोला, औरंगाबाद, जळगाव, परभणी आणि वाशिम यांचा समावेश होतो. यंदा सोलापूर, अहमदनगर, बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना जास्त दुष्काळी दिवसांना तोंड द्यावं लागेल असा अंदाज आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, सांगली, धुळे, नाशिक, जालना, औरंगबाद, जळगाव, परभणी, वाशिम येथे कमालीची उन्हं असतील, तप्त हवामान असेल, असेही या अभ्यासात म्हटले होते. सध्या सोशल मीडियावर जळगाव, नागपूरच्या उन्हांत तापलेल्या जमीनीवर डोसे घालण्याचे व्हीडीओ पसरले आहेत, माठात पाण्यासाठी खडे टाकून टाकून कावळा मेला, माठ खड्यांनी भरला पण पाणी काही आले नाही कारण उरलेलेच नाही, असे एक चित्रही पाठवले जात आहे. पण या सगळ्यांतून ज्यांनी बोध घ्यायला हवा, पाणी वाचवायला हवं, पर्यावरण टिकवायला हवं, उपक्रमांची जाणीवपूर्वक आखणी आणि अमलबजावणी करायला हवी त्या माणसांना, नियोजनकर्त्यांना, राज्यकर्त्यांच्या विचारशक्तीला मात्र निवडणुकीच्या तापलेल्या हवेमुळे उष्माघात झालाय. दुर्दैव!”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content