HomeArchiveशिवसेनेला रोखण्यासाठी खेळी!

शिवसेनेला रोखण्यासाठी खेळी!

Details
शिवसेनेला रोखण्यासाठी खेळी!

    31-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तंबूत गेलेल्या शिवसेनेला यावेळी मोदी सरकारमध्ये अधिकच्या मंत्रीपदांची अपेक्षा होती. चार वर्षांतील कडव्या संघर्षानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तलवार म्यान केली. भाजपच्या आग्रहानंतर ठाकरे यांनी युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ अर्थात शिवसेनेला झालाच, तसा तो भारतीय जनता पक्षालाही झाला. झालं-गेलं विसरून अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि उद्धव ठाकरेंची गळाभेट झाली. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले. मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. भाजप अधिक बलवान झाला. शिवसेनेला १८ जागा मिळाल्या, तर चार ठिकाणी पराभव झाला.

हा पराभव ठाकरेंच्या जिव्हारी लागला असावा कारण मंत्री राहिलेले अनंत गिते यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी चांगले मताधिक्य घेऊन पराभव केला. शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव अभिनेते अमोल कोल्हे यांनी केला. चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ हे ज्येष्ठ खासदार पराभूत झाले. जिंकणारे पडले. पराभवातील आनंद म्हणजे दोन नव्या जागा शिवसेनेने काबीज केल्या. प्रा. संजय मंडलिक (कोल्हापूर) आणि धर्यशील माने (हातकंणगले) हे दोन महत्त्वाचे चेहरे खासदार म्हणून शिवसेनेला मिळाले. १८ जागा कायम राखल्या. चार विद्यमान खासदार पराभूत झाल्याने शिवसेनेला भाजपशी बरोबरी करता आली नाही. विजयापेक्षा पराभवाची चर्चा अधिक झाली ती यामुळेच. स्वत:कडील जागा शिवसेना राखू शकली नाही. त्यावर “लोकशाही आहे” असे मोघम उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावे लागले.

चार विद्यमान खासदार पराभूत झाले. त्यामुळे सेनेची भाजपशी बरोबरी हुकली. त्याचे शल्य उद्धव ठाकरेंना जरूर असणार. पाच मंत्रीपदाची मागणी त्यामुळेच यावेळी पूर्ण होऊ शकत नाही. भाजपने एकमेव मंत्रीपद शिवसेनेला दिले. मात्र पाच-सहा इच्छुक आता नाराजीचा सूर आळवत आहेत. दुसऱ्यांदा खासदार झालेल्या अरविंद सावंत यांना यावेळी कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. परिणामी यवतमाळमधून पाचव्यांदा विजयी झालेल्या भावना गवळी कमालीच्या नाराज झाल्या आहेत. कोकणात राणे कंपनीला शिंगावर घेणाऱ्या विनायक राऊत यांचे नाव चर्चेत होते. मागीलवेळी शपथविधीसाठी दिल्लीला निघालेल्या पण अर्ध्यावरून माघारी आलेल्या अनिल देसाई, धारावीचे राहुल शेवाळे यांचीही नावे चर्चेत होती.

सावंत दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले आहेत. त्यांच्या गळयात मंत्रीपदाची माळ पडली असल्याने विदर्भ-मराठवाडा आणि कोकण आता पिछाडीवर पडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे ग्रामीण भागाचे प्रश्न अजेंडयावर घ्यायचे आणि मुंबईलाच झुकते माप द्यायचे. याला काय म्हणायचे? मंत्रीपदाचा वापर मागास भागासाठी महत्त्वाचा ठरत असतो. मर्जीतील वशिल्याच्या माणसांची भरती पक्षसंघटनेस घातक ठरू शकते. पक्षनेतृत्त्वाने साधकबाधक विचाराने निर्णय घेतले तर असंतोष, नाराजी आणि गटबाजीचे प्रकार होणार नाहीत. पण केवळ अधिकाराचा वापर हाच एकमेव निकष असेल, तर बोलायलाच नको.

भाजपची युती करण्याची खेळी यशस्वी होत असताना दुसरीकडे दबावाचे राजकारण करणे पक्षासाठी गरजेचे असते. आता राजकारण बदलले आहे. भाजप स्वत:च्या बळावर निर्विवाद बहुमतात आहे. त्यामुळे आता दबावाची चिंता भाजपला नाही, याची जाणीव आता शिवसेनेच्या नेतृत्त्वास झाली आहे. त्यामुळे भाजपकडून जे काही मिळेल, ते पवित्र मानून घ्यायची वेळ आता पुन्हा शिवसेनेवर आली आहे. महाराष्ट्रातही त्याचे परिणाम होताना दिसतील. तसे ते दिसू नयेत यासाठी काळजी घ्यावी लागेल. भाजपने चार वर्षे खूपच सहज केलेले आहे. आता परतफेडीचे दिवस आले आहेत. शिवसेनेने चूक केली तरी भाजप ती करणार नाही असे नाही. न बोलता, भाजप आता बदल्याची खेळी करणारच. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सुरूवातीस एकच मंत्रीपद देऊन भाजपने चुणूक दाखविली आहे. शिवसेनेला आव्हानं, प्रतिआव्हानं देऊन नव्हे, तर मुंगी होऊन साखर खावी लागेल. वास्तव फार कसोटीचे आहे. राजकारणात फासे बदलत असतात. तेथे हट्ट आणि दुराग्रह चालत नाहीत. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, तर त्याला राजकीय खेळीनेच उत्तर द्यावे लागते. शिवसेनेचे महत्त्व कायम राहयलाच हवे, असे महाराष्ट्राला वाटते.

विधासभेत रोखण्यासाठी

शिवसेनेच्या मागणीप्रमाणे तीन किंवा पाच मंत्रीपदे यावेळी न देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नजिकच्या काळात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. जादा मंत्रीपदाचा लाभ शिवसेनेला होऊ नये ह्याच कारणामुळे शिवसेनेची मागणी दुर्लक्षित करण्यात येत आहे. राज्यातील निवडणुका पार पडल्यावरच उद्धव ठाकरेंची मागणी मान्य किंवा अमान्य होईल. भाजपने विदर्भातील ज्येष्ठ खासदार संजय धोत्रे यांची वर्णी मंत्रीमंडळात लावली आहे. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याने विदर्भात मंत्री अत्यावश्यक आहे. म्हणूनच धोत्रेंना मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. थोडक्यात युती झाली म्हणून शिवसेनेच्या अवास्तव मागण्या मान्य होणार नाहीत, असा संदेशच एक मंत्रीपद देऊन भाजपने दिला आहे. शिवसेना यापुढे कोणती भूमिका घेते, याकडेही लक्ष ठेवायला हवे. राजकारण मनाप्रमाणे कधीच करता येत नाही, हेच खरे.”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content