Details
दिलदार-दानशूर रामशेठ ठाकूर!
03-Jun-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
लोकनेते रामशेठ ठाकूर हे दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या दानशूरपणाचा लाभ समाजाला वर्षांनुवर्षे होत आला आहे. रामशेठ पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. आज ते भारतीय जनता पक्षात आहेत. पण असे असूनही ते कोणत्याही एका पक्षाचे राहिलेले नाहीत तर संपूर्ण समाजाचे झाले आहेत. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाला रायगड जिल्ह्यात, विशेषत: पनवेलमध्ये, सुगीचे दिवस येतात. राजकारणात पक्ष बदलणार्यांजना संधीसाधू म्हटले जाते. पण रामशेठ यांच्यावर असा आरोप त्यांचे विरोधकदेखील करू शकणार नाहीत. रामशेठ यांचे स्वच्छ चारित्र्य आणि पारदर्शक व्यक्तिमत्व यामुळेच पक्ष बदलूनही ते लोकप्रिय राहिले आहेत. सर्वसामान्य जनतेचे लोकनेते ठरले आहेत.
रामशेठ 1998 आणि 1999 असे दोन वेळा रायगडमधून लोकसभेवर निवडून गेले. प्रथम त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांचा तर नंतर शिवसेनेचे उमेदवार दि. बा. पाटील यांचा पराभव केला. दोन्हीवेळा रामशेठ शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते. पण माणसाची लोकप्रियता वाढली की त्याचे शत्रूदेखील वाढतात. रामशेठ यांना शे. का. पक्षात तो अनुभव आला. त्यांची जाणूनबूजून गळचेपी केली जाऊ लागली. अखेर या लोकनेत्याने 2006 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अंतुले यांनी रामशेठ यांच्या काँग्रेस प्रवेशाला जोरदार विरोध केला. पण तो विरोध डावलून काँग्रेसश्रेष्ठींनी हा ‘हिरा’ आपल्या पक्षात सन्मानाने दाखल करून घेतला. त्यावेळी प्रभा राव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. पनवेलमध्ये झालेल्या वैभवशाली समारंभात रामशेठ काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी केवळ रामशेठ यांच्यावरील प्रेमाखातर दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील हे शे. का. पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते काँग्रेसच्या मंचावर उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत बॅ. अंतुलेदेखील होते.
रामशेठ ज्या पक्षात गेले त्या पक्षाला रायगड जिल्ह्यात बळ मिळाले. गळचेपीचा जो अनुभव रामशेठ यांना शे. का. पक्षात आला होता तोच त्यांना काँग्रेसमध्ये येऊ लागला. सुनील तटकरे यांनी विरोध केल्यामुळेच रामशेठ यांचे कर्तबगार चिरंजीव प्रशांत ठाकूर यांना पनवेल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदापासून दूर राहवे लागले. जनतेसाठी काँग्रेसला रामराम ठोकणारे रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेससारख्या राजकीय पक्षाचा त्याग का केला? या प्रश्नाचे उत्तर ‘स्थानिक जनतेसाठी’, असेच आहे. कामोठे येथील टोलनाक्यावर टोल भरण्यापासून स्थानिक जनतेला मुक्त करावे अशी रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांची मागणी होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ती मान्य केली. पण नंतर त्यांनी ठाकूर पिता-पुत्रांना वाटण्याच्या अक्षता लावल्या. स्थानिक जनतेवर टोल कायम ठेवला. यासंदर्भात भाजपचे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सत्तेवर येताच स्थानिक जनतेला टोलपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले. ते आश्वासन सत्तेवर येताच पाळले. ठाकूर पिता-पुत्रांचा भाजपप्रवेश सार्थकी लागला. 2014 साली प्रशांत ठाकूर प्रचंड बहुमतांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले. पुढे ते सिडकोचे अध्यक्षदेखील झाले.
रविवार दि. 2 जून रोजी रामशेठ यांचा 68वा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला. आम्हीदेखील दूरध्वनीवरून त्यांचे अभिष्टचिंतन केले. राज्यातील सुमारे शंभर वर्तमानपत्रांनी आणि साप्ताहिकांनी रामशेठ यांच्यावर लेख लिहून, पुरवण्या काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या व्यवसायात वर्षांनुवर्षे घवघवीत यश मिळविणारे रामशेठ व त्यांची मुले आजही निगर्वी आहेत. अत्यंत नम्र आहेत. त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आपल्याकडे आलेल्या गरजवंत लोकांना सढळ हस्ते मदत करणे हीच त्यांची आदर्श परंपरा आहे. पैसा अनेकांकडे असतो. पण तो दान करण्याची दानत मोजक्या लोकांत असते. दानत असलेल्या अशा मोजक्या लोकांपैकी रामशेठ हे एक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचे अभिष्टचिंतन करतो. समाजाच्या हितासाठी रामशेठ, शतायुषी व्हा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”

