Details
विनय गजानन खरे..
ज्येष्ठ पत्रकार
“तसं तर आपला संपूर्ण देश पर्यटनासाठी संपन्न आहे. बाह्य जगात नसतील इतकी भूवैशिष्ट्ये, दऱ्याखोऱ्या, निसर्ग, दऱ्याकिनारे, मंदिरे शिल्पे, वाळवंट, एक ना अनेक तरी लोक देश, इतर देशांकडे जाऊन तिथे पैसा ओततात. तिथली वाहवाह करतात जणू त्यांनी हा देश कधीचाच पाहिलाय नि आता काहीच नाही उरले इथे पाहण्यासारखे!”
असो. आपल्या देशात साहसी पर्यटनाला चालना देणारे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यात आता सियाचीन या ठिकाणची भर पडत्येय. ऐकलंय कधी हे? हो तेच ते जिथे हाडं गोठवणारी थंडी नि नंतर काही काळ किंवा कदाचित मोठे आजारपण! साहसी असाल तर मनोबल नक्कीच भक्कम असेल. शारीरिक तंदुरूस्ती नि काही क्षमता अंगी असतीलच जसे आव्हानांचा सामना करणे वगैरे! याचठिकाणी आपले सैनिक अहोरात्र पहारा देत असतात त्या पाकड्यांनी कोणती आगळीक करू नये म्हणून नि केलीच तर चोख प्रत्युत्तर देता यावे म्ह्णून. ते असतात उंचावरील भागात जिथे लष्करी हेलिकॉप्टरदेखील अर्धा एक मिनीटच स्थिर राहू शकते. मात्र त्याचवेळी हवामान बिघडले तर रसदही वेळेत मिळत नाही.
“जम्मू काश्मीरचा पूर्वीचा हा भाग आता लडाख या नव्या केंद्रशासित राज्यात येतो. ३१ ऑक्टोबरपासून इथे केंद्राची सत्ता लागू झाली. १९८४ साली पाकने केलेल्या आक्रमणामुळे कायम येथे सैन्य ठेवावे लागते. यासाठी करोडो रूपये खर्च तर होतातच शिवाय सैन्याला नाना आजार, व्याधी होऊन अनेक नव्याने तिथे नेमावे लागतात. रोज ५ ते ७ कोटी रूपये यावर खर्च होत असून परिसरात तीन हजार जवान अधिकाऱ्यांची नियुक्ती असते. या सर्वोच्च उंचीवरील भागात अत्यंत कणखर नि मानसिक क्षमता उच्च कोटींची असणारे निवडले जातात. जवळपास नेहमीच इकडे -६० च्या खाली तापमान असल्याने काही क्षणापुरते काढलेल्या अन्न, फळांचा दगड बनतो. इथे केवळ १०% इतका ऑक्सिजन मिळत असल्याने अनेकांना श्वासाचा त्रास, बर्फ चावणे (स्नो बाईट) यासह गंभीर आजार होतात. सरकारने तळापासून कुमार पोस्टपर्यंतचा काही भागच खुला करून दिला आहे. पण तिथे जाणेही कसोटी पाहणारेच असेल.”
“यापूर्वीही तिथे अनेक मोहीमा झाल्यात. भारतीय सैन्याने हा भाग १९७०नंतर यासाठी खुला केला होता. मात्र, १९८४ साली या ग्लेशियरचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव हा परिसरच बंद करण्यात आला. पुढे १९९९ साली कारगिल युद्ध झाल्यावर हे पाश अधिकच आवळले होते. जगातील सर्वोच्च उंचीवरची युद्धभूमी म्हणून ते ओळखले जाते. लडाखच्या या भागात मोठी पर्यटनक्षमता असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. कुमार पोस्टपर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला केल्याचे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले.”
“पूर्वेकडील काराकोरम पर्वतरांगात ७५ किमीचा भाग असून समुद्र सपाटीपासून ५७५३ मीटर उंचीवर आहे. पुढे चीनच्या हद्दीपर्यंत जातो. वरच्या पट्ट्यात ताजे अन्न मुश्किलने मिळू शकते. सफरचंद, संत्री काही वेळातच दगडासारखी टणक होऊ लागतात. स्नो लेपर्ड, ब्राऊन बिअर, इबेक्स असे काही जीव पाहण्यास मिळतात. तर बर्फ पडण्याचे प्रमाण हजार सेमीइतके म्हणजे ३५ फूट उंची भरेल असे असते. सियाचिनची कुमार पोस्ट साधारण पंधरा हजार फूट उंचीवर आहे. नि पर्यटकांसाठी असलेला बेस कॅम्प प्रतापपूर येथे असून तो फक्त ११ हजार फूट उंचीवर आहे. या पोस्टचे नाव पडले ते कर्नल नरेंद्र ‘बुल’कुमार यांच्यावरून. इथे जाण्यास पर्यटकांना विशेष परवान्याची गरज आहे. ८ डिसेंबर १९३३ ला जन्मलेले कुमार यांनी १९६५ला माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली होती. पुढे १३ एप्रिल १९८४ रोजी ऑपरेशन मेघदूत सुरू झाल्यावर त्यांनी पाकिस्तानी सैन्याला दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडले. त्यांच्या टीमने या भागाचा पूर्ण नकाशा, अनेक फोटो, व्हिडीओ तयार करून शत्रू सैन्यावर हल्ला चढविणे सोपे केले. ही रणभूमी २२ हजार फूट उंचावर आहे तर एव्हरेस्ट उंची २९ हजार फूट आहे. यावरून सैन्य काय धडाडीने काम करतंय याची कल्पना यावी.”
या भागातून घुसखोरी करून ताब्यात घेण्याची तयारी आपल्याला कळण्याआधीच सुरू झाली होती. याकरता लागणारे सर्व साहित्य कित्येक दिवस पाकने युरोपमधून जमा केले होते. तत्कालिन सरकारला जाग आल्यावर आपण चार आठ दिवसात ते मागवले तर सैन्याच्या हाती ते एक दोन दिवस पूर्वी पडले. त्यात विशेष प्रकारचा गणवेश नि बर्फ फोडण्याची अवजारे असं काही होतं.
काश्मीरपेक्षा महत्त्वाचे!
“क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता ३३ हजार चौ. किमी परिसरावर पाकचा ताबा घेण्याचा नापाक इरादा होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यानंतर अनेकदा इथे घुसखोरी नि ताबा मिळवण्याचे प्रकार घडले. पाकव्याप्त काश्मीरात अतिरेकी छावण्या आहेत तोपर्यंत काही लोकांच्या मनःशांतीसाठी सियाचिनची कुर्बानी भारत नाही देऊ शकत. चीनचीही या भूभागावर नजर आहेच. भारत, पाकिस्तानमध्ये हे गेली तीन दशके युद्धमैदान बनले आहे. सैन्य तैनातीसाठी दोन्ही देश आतापर्यंत सहाशे अरब रूपयांपेक्षा जास्त खर्च करून चुकलेत. तर काहींच्या मते एक दिवसासाठी भारत यावर दहा कोटी रूपये खर्च करतोय.”
जगाला हे मान्य नाही
“हा सियाचीन ग्लेशियर्सचा भाग जगाच्या नकाशात नाही, ज्यासाठी आपल्या देशाचे शूर वीर नेहमी तैनात असतात. हिंदीत, नाम, नमक और निशान याला डोळ्यासमोर आदर्श मानत खडा पहारा दिला जातो! त्याचं अस्तित्त्व, मानण्यास जग तयार नाही. केवळ थंडीत नव्हे तर इतरहीवेळी पारा खालीच असतो. निसर्गही आपल्यासोबत झुंज द्यायला सांगत असतो. प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. बोलताना अडखळणे, फुफ्फुसात संक्रमण आणि अत्याधिक तणाव यांच्याशीही सामना करावा लागतो. येथील अनेक चौक्यांवर माणसाऐवजी हेलिकॉप्टरने साहित्यपुरवठा करावा लागतो कारण अनेक चौक्यांवर प्रतिकूल नि क्षणात बदलणाऱ्या हवामानामुळे अनेक दिवस पोहोचण्यास लागतात. सैन्याच्या चिता हलीकॉप्टरद्वारे सामान पोहोचवले जाते. ऑपरेशन मेघदूत, पाकिस्तानी सैन्याचा पाडाव करून सियाचिनमधील सेला पास, बेलाफोंडला आणि ग्योओंगला पास ताब्यात घेण्याची ही लढाई होती. सियाचीन भागात काही ठिकाणी भारतीय बाजूने कुठे उंची जास्त तर पाकिस्तानच्या बाजूने अतिशय कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे नियंत्रित कारवाई करून हवाई सैन्यदलाने केलेली कारवाई महत्त्वपूर्ण मानली जाते.”
द्रास अनोखे थंड शहर!
“लडाख मार्गावर कारगिल जिल्ह्यात जोझिला पास नि कारगिल शहराच्या मध्ये हे असून लदाखचे गेट वे म्हणून ओळखले जाते. उन्हाळी काळात इथे चहूकडे हिरवळच हिरवळ असते तर हिवाळ्यात दणकून बर्फ पडतो. इतका की इथल्या लोकांनासुद्धा त्याची भीती वाटते. देशाचे सर्वात थंड शहर अशी याची ओळख आहे. साधारण -४५ तापमान इथे नेहमीचे आहे. पण ते -६० वर गेल्याने त्याला थंड ओळख मिळाली. १९९५ साली नि नंतर ते वाढू लागले. थंडीत पारा शून्य नि खाली जाऊ लागला की काय होतं ते माहितीय ना! मग इथे तर विचारच करू शकत नाही प्रत्यक्ष अनुभव घ्यायलाच हवा. जगात दुसरा क्रमांक या थंडीने घेतलाय. रशियात ओम्याकोन हे असे ठिकाण आहे जिथे पारा -७२पर्यंत खाली येतो. उन्हाळ्यातदेखील इथे थंडी असते. प्रदूषण, धूळ, माती यापासून दूर असलेल्या या शहरात बर्फाचा थर सहज पाहता येतो. भारताचा उत्तर ध्रुव असेही म्हणता येईल.”
कारगिलने दिला नावलौकिक
१९९९च्या कारगिल युद्धामुळे इथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी आली. द्रास परिसरात पाहण्यासारखे बरेच आहे. दहा किमी दूरवरील मनमान टॉप जो तिथे गेल्यावर आपल्याला एलओसीचा नजारा दाखवतो. तर पाच किमी वरील गोमंचना व्हॅली ग्लेशियर नि त्याच्या जलधारा दाखवते. कारगिल वीरांना श्रद्धांजली म्हणून द्रास वॉर मेमोरियल बनवले आहे. इथून जवळच सांडो टॉप आहे त्यावरून पाकिस्तानी लष्कराचे तळ पाहण्यास मिळतात. तर इथूनच टायगर हिलचा वरचा भाग पाहता येतो जिथे युद्ध लढले गेले. त्यावरून कल्पना येते की आपले सैन्य कशा प्रतिकूल परिस्थिती झुंजले ते.
भीमबेट स्थित सात किमी वरील हा दगड हिंदूंसाठी मोठं पवित्र स्थान आहे. निनगुर मस्जिद पाहण्यास काही जातात. असं मानलं जातं की ती अल्लाने केली असून आपोआप बनली आहे. मुस्लिम श्रद्धाळू येतात. द्रासपासून ३० किमी दूरवर अमरनाथ यात्रेचा मिनामार्ग आहे. मचॉई ग्लेशियरने घेरलेल्या या मार्गजवळ लेसरला हा मार्ग आहे जो दुधासारख्या शुभ्र पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथील डोंगर एका बाजूस हिरवे तर दुसऱ्या बाजूला भुरकट दिसतात हिरवळ नि ओसाड जमीन एकाचवेळी पाहण्यास मिळते. तर थंडीत सर्वत्र पांढरी चादर जी भयाणता दर्शवते. काश्मीर पर्यटनाचा भाग असलेला नितांत सुंदर श्रीनगर-लेह रस्ता अनुभवता येतो.
तशी २००३ पासून शस्त्रसंधीमुळं तेव्हापासून या भागात शांतता आहे. एकूणच अशा दुर्गम नि कस पाहणाऱ्या भागात साहसी भारतीयांनी एखादी मोहीम करावीच जेणेकरून सैन्याचे मनोबल वाढविण्यास मदत होईल शिवाय हम तुम्हारे साथ है हे कृतीतून दिसून येईल. जो कोण साहसी असेल त्यालाही सांगा. भारत माता की जय! जय हिंद!

