Homeहेल्थ इज वेल्थमुंबईतली कोविडची साथ...

मुंबईतली कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात!

कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेने तिसऱ्या तुकडीतल्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले असून यात ‘डेल्टा व्हेरिअंट’चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन दिसून येते असे मत मुंबई महापालिकेने व्यक्त केले आहे.

मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या या यंत्रणेने आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण ३४३ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास केला. नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तिसऱ्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

नमुने घेतलेल्या बाधित ३४३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण (१३ टक्के) रुग्ण ० ते २० वर्षे वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात १२६ रुग्ण (३७ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९८ रूग्ण (२९ टक्के) ६१ ते ८० वयोगटात ६३ रुग्ण (१८ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ११ रुग्ण (३ टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत.

चाचणीतील निष्कर्षानुसार, ३४३ पैकी १८५ रुग्ण (५४ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ११७ रुग्ण (३४ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे ४० बाधित रुग्ण (१२ टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंटसमवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण / प्रसारवेगदेखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ५४पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

कोविड

दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.

याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२१ नागरिकांना बाधा झाली. त्यातील ५७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाबग्रस्त होते. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरिअंट’ची लागण झालेली होती. या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निष्पन्न होऊनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जीवावर बेतले. याचाच अर्थ, कोविड लस घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता रोखता येते, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

वय वर्ष १८पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण ३४३ रुग्णांपैकी २९ जण (८ टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी ११ जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’, १५ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि ३ जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

मुंबई महापालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित (validation) होऊन कार्यान्वित करण्यात आली.

या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करू शकणारे दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र पालिकेला दान स्वरुपात दिले आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचारपद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते.

जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून यापूर्वी २३ ऑगस्ट २०२१ रोजी सर्वात पहिल्यांदा तर २१ सप्टेंबर २०२१ रोजी दुसऱ्यांदा कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार अद्यापही समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे पालिका प्रशासनाला शक्य झाले आहे.

कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण चाचण्यांचे निष्कर्ष पाहता असे लक्षात येते की, सर्व पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचेदेखील कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. मुखपट्टी (मास्क)चा योग्य उपयोग करावा. सार्वजनिक स्थळी सुरक्षित अंतर राखावे. गर्दी टाळावी. हातांची नियमित स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content