मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी सायबर अटॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, विमानतळ प्रशासनाने ती अफवा असल्याचे सांगत हा केवळ तात्पुरता नेटवर्क बिघाड असल्याचे स्पष्ट केले. विमानतळाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7.05 वाजता चेक-इन आणि बोर्डिंगची प्रणाली हाताळणाऱ्या थर्ड-पार्टी डेटा नेटवर्कमध्ये ग्लिच आला. यामुळे इंडिगो आणि एअर इंडियाच्या प्रवाशांना चेक-इन आणि बोर्डिंग गेट बदलामुळे काहीशा गोंधळाला सामोरे जावे लागले. हा व्यत्यय सुमारे 50 मिनिटे चालला. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ काँटिंजेंसी प्लॅन लागू करत संपूर्ण विमानतळ मॅन्युअल मोडवर चालवण्यास सुरुवात केली.
प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे की, “मंगळवारी संध्याकाळी तात्पुरता नेटवर्क व्यत्यय आला होता. आमच्या टीमने मॅन्युअल प्रक्रिया सुरू करून प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत विमानतळ किंवा उड्डाण ऑपरेशनवर कोणताही परिणाम झाल्याची नोंद नाही.”
गेल्या वर्षी, 9 ऑगस्ट 2025 रोजीही अशाच थर्ड-पार्टी नेटवर्क आऊटेजमुळे मुंबई विमानतळावर विलंब झाला होता. दिल्लीसारख्या मोठ्या सायबर हल्ल्याशी याचा संबंध नसल्याचे सीआयएसएफ आणि प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रवाशांना आपल्या एअरलाइनकडे फ्लाइट स्टेटस तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

