प्रसिद्ध लेखक राजीव श्रीखंडे यांच्या ‘ग्लोबल साहित्यसफर (भाग ३)’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतल्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा (पश्चिम) येथे नुकतेच झाले. कार्यक्रमाला ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील तसेच शिक्षणतज्ज्ञ, लेखिका व भाषांतरकार डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वास पाटील म्हणाले की, ज्याप्रमाणे सोशल इंजिनिअरिंग होते, त्याचप्रमाणे राजीव श्रीखंडे हे लिटरसी इंजिनिअरिंग करत आहेत. श्रीखंडे माझ्या सुरूवातीच्या काळात असते, तर मलादेखील साहित्यकृतींसाठी याचा खूप उपयोग झाला असता.

यावेळी बोलताना राजीव श्रीखंडे यांनी आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांचे, त्यांच्या मार्गदर्शनाचे, बंधूंचे, सहचारिणीचे तसेच इतर अनेक मान्यवरांच्या सहकार्याचे स्मरण केले. त्यांच्या सहकार्याने हे सगळे शक्य झाले असल्याचे सांगत त्यांनी लवकरच या पुस्तकाची चौथी आवृत्तीही लिहिण्याचा मनोदय व्यक्त केला. डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी यांनीही गौरवोद्गार काढत या साहित्यकृतीचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. ‘निवडक अभिजात जागतिक साहित्यकृतींचा रसास्वाद’ असे स्वरूप असलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

