राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर सध्या दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटक विधान भवनाला भेट दिली. कर्नाटक राज्याच्या विधान परिषद कामकाजानिमित्त आयोजित या अभ्यासदौऱ्यात उपसभापती अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहमद आणि उपसभापती उमाश्री यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कर्नाटक विधान परिषदेच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या विधिमंडळ कामकाजासाठी ‘डॅशबोर्ड प्रणाली’ यशस्वीपणे राबवली जात आहे. याच धर्तीवर अशीच आधुनिक डॅशबोर्ड प्रणाली कर्नाटक सरकारनेही आपल्या राज्यात लागू करावी, अशी संकल्पना उपसभापती अहिर यांनी मांडली. त्यावर कर्नाटक शासनाकडून या प्रस्तावाचा अत्यंत सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले. सलोख्याचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांना महाराष्ट्र विधान भवनाला भेट देण्याचे अधिकृत निमंत्रणही दिले.
कर्नाटक दौऱ्यात उपसभापती अहिर यांनी कर्नाटकाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यू. टी. खादर यांचीही सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम व जनहिताच्या प्रश्नांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या अभ्यासदौऱ्यावेळी अहिर यांच्यासोबत महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले उपस्थित होते.

