Homeबॅक पेजअत्यल्पजीवी प्रॉडक्टसाठी दिवसरात्र...

अत्यल्पजीवी प्रॉडक्टसाठी दिवसरात्र झटणारे आमचे ‘पीजीपी’!

नोकरी आणि मराठी माणूस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मराठी माणूस उद्योगधंद्यात फारसा पडत नाही. आता या वाक्यातच इतकी गंमत आहे, की प्रत्येकवेळा आपण ‘पडत नाही’ असं म्हणतो. उद्योगधंद्यात उतरत नाही, शिरत नाही, असं का आपण म्हणत नाही. कारण मराठी माणूस आणि उद्योग याचं प्रमाणच उलटं अर्थातच न जुळणारं असं आहे. मराठी माणसानं पिढ्यान् पिढ्या उद्योग केला आहे, असं फारसं घडत नाही. एखाद्या पिढीनं उद्योग केला की दुसरी पिढी तो राखते, तिसऱ्या पिढीत टिकेल का नाही याची खात्री देता येत नाही. मराठी माणसाचे उद्योग म्हटले की, किर्लोस्कर, डहाणूकर, गरवारे, पारखे, ओगले… अजून दोन-चार नावं घेतली की ही यादी थांबली जाते. पण मराठी माणसानं पिढ्यान् पिढ्या धंदा केला आहे, अशी उदाहरणं खूप कमी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ वर्तमानपत्र आणि संपूर्ण उद्योगसमूह आणि त्याचे प्रमुख ‘पीजीपी’ अर्थात प्रताप गोविंदराव पवार यांचं उदाहरण वेगळंच मानावं लागेल. मुळात त्यांचा उद्योग हा कन्स्ट्रक्शन किंवा सोने-चांदी किंवा एखादा साखर कारखाना असं नाही. तर बुद्धीशी संबंधित असा त्यांचा उद्योग आहे. व्यापार किंवा धंदा हा शब्द चुकीचा आहे. खऱ्या अर्थानं त्यांचा तो उद्योग आहे.

रतन टाटा यांना एकदा एका मुलाखतीत विचारलं गेलं की, रिलायन्स आणि तुम्ही या दोघांत तुलना केली तर रिलायन्स तुमच्याइतके कसे पुढे आहेत. त्यांनी उत्तर दिलं, ‘‘त्यांचा व्यापार आहे आणि आम्ही इंडस्ट्री चालवतो, आमचा उद्योग आहे.’’ थोड्याफार फरकानं पवार यांच्या उद्योगाबाबत हेच म्हणता येईल. माणसाच्या मेंदूशी संबंधित अर्थात बुद्धिमत्तेशी संबंधित वर्तमानपत्र हा प्रतापराव पवारांचा उद्योग आहे. सकाळ उद्योग समूह हा एकोणीसशे पंचाऐंशीपासून त्यांच्या व्यवस्थापनाखाली वाटचाल करू लागला. आज बेचाळीस वर्षं त्यांच्याच नेतृत्त्वाला पूर्ण झाली. आणि सकाळ शतकाकडे झेप घेण्यासाठी अगदी काही वर्षं बाकी आहेत. (‘सकाळ’ला ९५ वर्षे झाली आहेत.) हे सगळं आठवायचं कारण, आपण आज अशा एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत की जे पुस्तक सगळ्यात वेगळं आहे, सगळ्यात वाचनीय असं आहे. हे पुस्तक वेगळं म्हणजे काय? ही कथा नाही, ही कादंबरी नाही, ही कविता नाही, संशोधनग्रंथ नाही, मग हे काय आहे? तर हा उद्योग क्षेत्रातील एका कंपनीच्या सर्वोच्च नेतृत्त्वाचा, कुटुंबप्रमुखाचा आणि एका यशस्वी समाजपुरुषाचा वेध घेतलेला असा मराठीतील आगळावेगळा प्रत्येकाच्या संग्रही असावा असा लेखसंग्रह आहे. हे पुस्तक कुणासाठी आहे? ज्याला वाचायला आवडतं आणि उद्योगांबद्दल किमान जाणून घ्यायचंय, त्यांच्यासाठी. तसेच एखाद्या टीमचं लीड करणाऱ्या नेतृत्त्वाने, आपल्या मुलाला घडवण्यासाठी काय केलं पाहिजे, असं वाटणाऱ्या प्रत्येक पालकाच्या घरात हे पुस्तक असायला हवं.

वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा परीघ

एखादा माणूस नम्रपणाने वागत असतो, कामाचा आग्रह धरण्यासाठी, ते काम परिपूर्ण होण्यासाठी सतत झटत असतो. पण हे करताना तो कुटुंबप्रमुखासारखा वागतो, तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून काही सूचनाही देतो. त्याचवेळेला तो तुमच्या आरोग्याबाबत, तसेच समाजात व काम करताना कसे वागावे याबद्दल जागरूकतेच्या काही टिप्सही देतो आणि हे सगळं करताना, करोडोंच्या उलाढालीचे निर्णयही तितक्याच शांतपणे घेतो. हे सगळं एकाच माणसामध्ये असेल, असं आपल्याला वाटत नाही. पण असा माणूस आहे, सध्या काम करतोय आणि एका पूर्ण समूहाचं तो नेतृत्त्व करतोय. असं जर कोणी सांगितलं तर, ते पटेल का? तर, हो, पटायलाच पाहिजे, असं स्पष्ट करणारं पुस्तक म्हणजे ‘आमचे पीजीपी.’ ‘आमचे पीजीपी’ हे पुस्तक म्हणजे काय आहे, तर त्याचं वर्णन या पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा जो मजकूर आहे, तो वाचल्यावर ते पटकन लक्षात येईल.

‘‘ ‘सकाळ’मधील माजी कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या आठवणीमधून ‘पीजीपी’ सरांबरोबरच्या त्यांच्या नात्याचे बंध उलगडत गेले. त्यातून सरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे दर्शन झाले. मालक म्हणून नव्हे तर माणूस म्हणून पीजीपी सरांचे मोठेपण दिसले. हा शब्दसंचय म्हणजे केवळ त्यांच्या आठवणींचा संग्रह नाही तर एखादी संस्था नावारूपाला येण्यासाठी आणि स्पर्धेच्या जगातही आपले स्थान अबाधित ठेवण्यासाठी तिथे नेतृत्त्व कसे असावे याचे अनुभवसार आहे. ’’ मलपृष्ठावरची ही ओळख, पुस्तकाच्या भाषेत हा ‘ब्लर्ब’ वाचल्यावर या पुस्तकाची कल्पना येईल. पण हा परिच्छेद म्हणजे ही पुस्तकाची ओळख नाही. या पुस्तकात नेमकं काय आहे? तर या पुस्तकाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य हे आहे, की ‘सकाळ’मध्ये काम केलेल्या, आता सकाळमध्ये सेवेत नसलेल्या पण आता बाहेरच्या जगात यशस्वी झालेल्या किंवा निवृत्तीचे जीवन जगत असलेल्या अनेक नामवंत आणि सामान्य अशा सर्व थरातल्या कर्मचाऱ्यांनी ‘पीजीपी’ सरांबद्दलच्या आठवणी यात लिहिलेल्या आहेत. म्हणजेच मालकाबद्दल काहीतरी चांगलं बोलून किंवा त्यांची स्तुती करून आपल्याला एखादं प्रमोशन मिळेल किंवा त्यांचा काहीतरी कृपाकटाक्ष आपल्यावर राहवा, या उद्देशातून यातील एकही आठवण लिहिण्यात आलेली नाही. लिहिणारी मंडळी आता सकाळच्या बाहेर त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात उत्तमपणे काम करत आहेत. तरीही केवळ मर्मबंधातला जो ‘पीजीपी’ नावाचा अतूट धागा आहे त्या धाग्याशी आपण पुन्हा एकदा रिकनेक्ट व्हावं, या हेतूने या मंडळींनी पीजीपी सरांविषयी लेखन केलेलं आहे. हे लेखन केवळ सरांबद्दलच्या आठवणी सांगतं का? तर मुळीच नाही. सरांबद्दलच्या आठवणी तर हे पुस्तकातले अनेक प्रसंग सांगतच आहेत. पण मराठी उद्योगक्षेत्रात इतक्या ताकदीचा, सालस, सज्जन प्रवृत्तीचा संवेदनशील माणूस, त्याचबरोबर उद्योग व्यवस्थित कसा चालवावा याचं कृतिशील उदाहरण घालून देणारा हा माणूस किती वेगळा आहे, त्याचं प्रत्यंतर व नेमका अनुभव यातल्या प्रत्येक पानावरच्या वेगवेगळ्या प्रसंगांतून वाचकाला येतो.

कर्मचाऱ्यांची काळजी आणि आस्था

‘सकाळ’मध्ये येताना पीजीपी प्रतापरावांना सोबत घेऊन येतात आणि ‘सकाळ’मधून बाहेर पडताना प्रतापराव पीजीपींना सोबत घेऊन जातात,’ असं या पुस्तकातल्या पहिल्याच लेखात ‘सकाळ’चे माजी संपादक-संचालक आनंद आगाशे यांनी म्हटलं आहे. हे खरंही आहे. ‘पीजीपी’ ही प्रतापरावांच्या नावाची आद्याक्षरं असली, तरी घरातले प्रतापराव आणि ‘सकाळ’ उद्योग समूहाचे काम करतानाचे ‘पीजीपी’ ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं आहेत, असं म्हणावं लागेल, इतक्या अचूक पद्धतीनं या माणसाचं काम चालतं. ‘सकाळ’ उद्योग समूहात काम करताना पीजीपी एखादा ऊर्जेचा महास्रोत असल्यासारखे काम करत असतात. प्रत्येक गोष्टीचं अचूक मूल्यमापन, त्याचा सातत्याने पाठपुरावा आणि गुणवत्तेच्या दिशेने केलेली सातत्यपूर्ण वाटचाल, ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. सतत एक्सलन्सकडे झेप घेत राहायचं, याकडे त्यांचं लक्ष असायचं. या पुस्तकात अनेकजणांनी प्रतापरावांच्या कामाच्या पद्धतीविषयी लिहिलं आहे. आनंद आगाशे यांनी त्यांच्या कार्यशैलीचं वर्णन केलं आहे, तर आणखी एक माजी संपादक राजीव साबडे यांनीही मोजक्या शब्दांत प्रतापरावांचं व्यक्तिमत्त्व उभं केलं आहे. राजीव साबडे यांना इस्राईल-लेबनॉन युद्धाचं वार्तांकन करण्यासाठी ‘सकाळ’ने तिकडे पाठवलं होतं. ते निघाले असताना युद्धाच्या बातम्या टीव्हीवर अत्यंत वेगाने येऊ लागल्या. त्या बातम्या पाहून प्रतापरावांनी तातडीने साबडे यांना फोन केला. त्यावेळी साबडे विनामतळावर होते, ‘‘तुम्ही जाऊ नका. आता तिथलं वातावरण तंग आहे,’’ असं त्यांनी सांगितलं. मात्र साबडे यांनी त्यांच्याशी चर्चा करून, ‘‘मी तिथे जाऊन कोणतंही आवाजवी धाडस करणार नाही. योग्य पद्धतीनं आणि योग्य ती काळजी घेऊन काम करेन,’’ असं सांगितल्यानंतरच प्रतापरावांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. एखाद्या कुटुंबाचा प्रमुख आपल्या कुटुंबातील व्यक्तीची ज्या पद्धतीने काळजी घेतो, अगदी त्याच पद्धतीचं प्रतापरावांचं वर्तन त्यावेळी साबडेंना जाणवलं. या पुस्तकातील त्या लेखातून ते आजही आपल्यापर्यंत पोहोचतं. ही दृष्टी केवळ साबडे यांच्यापुरती मर्यादित नव्हती. ‘सकाळ’मध्ये काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांबाबत प्रतापराव याच भावनेनं काम करत असत.

सहकाऱ्यांवर विश्‍वास आणि निर्णयाचं स्वातंत्र्य

याचं उत्तम उदाहरण म्हणजे या पुस्तकातील अभय कुलकर्णी यांचा लेख. त्यांच्याकडे फेररचनेचं काम सोपवण्यात आलं होतं. त्याचं सादरीकरण अभय कुलकर्णी यांनी प्रतापरावांसमोर केलं. कुठल्या माणसाकडे कोणती भूमिका द्यायची, हे त्यांनी त्यावेळी सांगितलं. अभय कुलकर्णींचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर प्रतापरावांनी आपल्याजवळील माहितीची त्यात भर घातली. कोणता माणूस कोणत्या बाबतीत कमजोर आहे, त्याची बलस्थानं काय आहेत, याबद्दल त्यांनी अभय कुलकर्णींना नेमकं मार्गदर्शन केलं. पण त्याचवेळी एक महत्त्वाची गोष्टही सांगितली
‘‘तुम्ही निर्णय घ्या. तुमच्या निर्णयात मी मुळीच हस्तक्षेप करणार नाही. फक्त तुम्हाला ही माहिती असावी म्हणून मी देतोय,’’ असं स्पष्ट करून त्यांनी अभय कुलकर्णींना निर्णयाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. आपण एखाद्यावर जबाबदारी सोपवली, तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा हे तत्त्व त्यांनी पाळलं. प्रत्येकाचा सन्मान आणि त्याचा स्वाभिमान जपला जाईल याकडे ते जाणीवपूर्वक पाहतात. फेररचनेनंतर आलेली नवी पुरवणी किती चांगली झाली आहे, याचं कौतुक करणारा पहिला फोन अभय कुलकर्णींना प्रतापरावांनी केला. हा प्रसंग वाचल्यानंतर एखाद्या टीमचा कर्णधार किती सजग असतो आणि त्याचवेळी आपल्या सहकाऱ्यांना किती स्वातंत्र्य देतो, हे लक्षात येतं. हा लेख मुळातूनच वाचला पाहिजे. असाच दुसरा छोटेखानी लेख ऋता बावडेकर यांचा. ‘हेड ऑफ द फॅमिली’ या शीर्षकाचा हा लेख वाचून प्रतापरावांतील माणूस किती गोड आणि लाघवी आहे व तितकाच किती वक्तशीर आहे, ते लक्षात येते.

समाजप्रबोधनाची कळकळ

अरुण खोरेंच्या लेखातूनही त्यांची अशी अनेक रूपे समोर येतात. अरुण खोरेंनी त्या काळात अपंग व्यक्तींवर एक पुरवणी काढावी, असा आग्रह धरला होता. तो आग्रह मान्य करून आठ पानांची पुरवणी काढण्यात आली. आपल्या सहकाऱ्याच्या एखाद्या सूचनेला मान देऊन तिची अंमलबजावणी करणं, हे केवळ एक उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणं या पुस्तकात आहेत. (प्रतापराव पवार यांचा वसा आणि वारसा आज अभिजित पवार आणि तिसऱ्या पिढीतही कसा जपला जातोय, याचे ताजं उदाहरण म्हणजे दिवंगत दीनानाथ मंगेशकर यांच्यावर सकाळ समूहानं नुकतीच काढलेली विशेष पुरवणी ही विनाजाहिरात काढण्यात आली. आजच्या युगात जाहिरातीविना अशी पुरवणी काढणं किती वेगळे आहे हे सांगायला नको, समूहाचे सध्याचे चालक-मालक अर्थातच अभिजित पवार व तिसऱ्या पिढीचे राहुल पवार आणि जान्हवी पवार यांनी याला होकार देणे, त्याचबरोबर ही सगळी संकल्पना समूहाचे सीईओ उदय जाधव व संपादक सम्राट फडणीस यांनी सिद्धीस नेणे किती मोलाचे आहे, हेही पुरवणी पाहिल्यावर लक्षात येते.)

व्यसनांना प्रखर कृतिशील विरोध

गुटख्यासारख्या चुकीच्या गोष्टीची जाहिरात आपल्या वृत्तपत्रात केली जाणार नाही, असा निर्णय घेतल्यानंतर त्यातून प्रचंड आर्थिक फटका बसला. तरीही प्रतापरावांनी तो निर्णय कायम ठेवला. मोठ्या आर्थिक हितापेक्षा आपल्या संस्थेची मूल्यं आणि भूमिका महत्त्वाची, हे त्यांनी या निर्णयातून दाखवून दिलं. असाच एक वेगळा प्रसंग संपादकीय स्वातंत्र्याशी संबंधित आहे. प्रतापरावांना जवळून ओळखणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरात दुःखद घटना घडली होती. ती घटना ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होऊ नये, अशी त्यांची इच्छा त्यांनी प्रतापरावांकडे व्यक्त केली होती. मात्र संपादकीय विभागाला स्वातंत्र्य देताना प्रतापरावांनी ती बातमी छापू दिली. त्यानंतर त्या व्यापाऱ्याने ‘सकाळ’ला देण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये कपात केली. पण त्यानंतरही प्रतापरावांनी आपला निर्णय बदलला नाही. संपादकीय विभागाचं स्वातंत्र्य त्यांनी कधीही धोक्यात आणलं नाही. कुठलाही लेख त्यांच्याकडे पाठवला, तर त्यावर ते एकच भूमिका नोंदवत- ‘हा लेख तुम्हाला योग्य वाटत असेल तर छापा.’ हाच अनुभव या पुस्तकातील अनेक लेखकांनी सांगितला आहे. त्यावेळी संपादक असलेल्या सुरेशचंद्र पाध्ये यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेल्या एका निर्णयावर टीका करणारा अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं स्वतः प्रतापरावांनी संपादकीय बैठकीत कौतुक केलं. त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. प्रतापराव शरद पवारांचे भाऊ आहेत म्हणून त्यांच्याबद्दल सौम्य दृष्टिकोन ठेवा, असं त्यांनी कधीही संपादकीय विभागाला सांगितलं नाही. उलट, संपादकीय स्वातंत्र्य हीच संस्थेची ताकद आहे, याची जाणीव त्यांनी कायम ठेवली. याचे अनेक दाखले या पुस्तकातील लेखकांच्या विविध अनुभवांतून वाचायला मिळतात.

वृत्रपत्रीय कामाचा अनुभव व नेमका दृष्टिकोन

‘विशाल सह्याद्री’सारख्या एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या दैनिकाचं व्यवस्थापनही यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रतापरावांनी सांभाळलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’चा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितलं, की आपला पेपर हा कुणाचाही मुखपत्र नसेल आणि कुणाच्या बाजूने झुकलेला पेपरही नसेल, ही गोष्ट सगळ्यांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी. प्रतापरावांनी त्या बैठकीत नेमकं काय सांगितलं, याचा तपशील या पुस्तकातील लेखकांनी दिला आहे. तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. ही एकच गोष्ट नाही. या पुस्तकात प्रतापराव एका टीमचा कॅप्टन म्हणून आपल्यासमोर इतक्या वेगवेगळ्या प्रसंगांतून उभे राहतात की आपण थक्क होतो. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा उद्योजकतेची चर्चा होते, तेव्हा टाटा संस्कृतीची आणि टाटा समूहाचे प्रमुख जे.आर.डी. टाटा किंवा रतन टाटा यांच्या नेतृत्वाची उदाहरणं आवर्जून दिली जातात. प्रतापरावांचं नेतृत्वही याच अर्थानं वेगळ्या प्रकारचं आहे. स्वतःचा पेपर असून, त्यामध्ये आपण म्हणू ते छापलं जाण्याची शक्यता असूनही प्रतापरावांनी कधीही आपली मतं किंवा स्वतःचं कौतुक करणारे लेख छापले जावेत, असं पाहिलं नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करणारे लेख त्यांच्या समूहातून प्रसिद्ध होणाऱ्या कुठल्याही प्रकाशनात कधीच आले नाहीत. या पुस्तकात एक अत्यंत महत्त्वाचा तपशील आपल्यासमोर येतो तो म्हणजे आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचं शिक्षण जास्तीत जास्त कसं व्हावं, याची प्रतापरावांना असलेली काळजी. एखादा कर्मचारी अभ्यासक्रम शिकण्यासाठी जात असेल, तर त्याने प्रवास करताना कोणताही ताण घेऊ नये, याची ते काळजी घेत. विमानाने किंवा रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर आवश्यक त्या म्हणजे पहिल्या वर्गाच्या तिकिटाने त्याने प्रवास करावा, अशी त्यांची अपेक्षा असे. आपल्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षणाचा आणि शिक्षणाचा नीट लाभ घेता यावा, हा त्यामागचा दृष्टिकोन होता.

परदेशात जाणाऱ्या कर्मचाऱ्यालाही त्यांनी त्यावेळी असलेले नियमांचे जंजाळ लक्षात घेऊन स्वतःच्या खात्यातून परकीय चलन उपलब्ध करून दिलं, जेणेकरून आपला कर्मचारी तिथे अडचणीत येऊ नये. अनिल टाकळकर यांच्या परदेश प्रवासाच्या खर्चाचा अंदाज वाचताना तर आपल्याला धक्काच बसतो. सुमारे साठ हजार रुपये खर्च त्यावेळी अपेक्षित होता. त्यापैकी तीस हजार रुपये प्रतापरावांनीच उभे करून दिले. त्यातले दहा हजार रुपये परत करायचे नव्हते, दहा हजार रुपये बिनव्याजी होते आणि आणखी दहा हजार रुपये अनुदानासारखे होते. आपला कर्मचारी शिकावा, त्याला बाहेरचं जग पाहता यावं आणि त्याच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी एखाद्या व्यवस्थापनाचा प्रमुख किंवा त्या उद्योगाचा मालक किती सजगपणे वागू शकतो, याची अनेक उदाहरणं या पुस्तकात ठायी ठायी आढळतात. टाकळकरांच्याच लेखातला आणखी एक प्रसंग खरोखर लक्षात घेण्यासारखा आहे. संपादकांना गाडी का द्यायची, याचं स्पष्टीकरण देताना प्रतापरावांनी टाकळकरांना अत्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं, की संपादकांना अनेक गोष्टींवर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचं लक्ष गाडी चालवण्यासारख्या गोष्टींकडे जाऊन विचलित होता कामा नये. म्हणून संपादकांना शोफर-ड्रिव्हन कार दिली जाते; ती तुम्ही वापरा. आपल्या समूहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याबद्दल एखादा मालक किती कसोशीने विचार करतो, हे या उदाहरणातून दिसून येतं.

या पुस्तकात ७० पेक्षा जास्त माणसांनी ‘आमचे पीजीपी’ हे पीजीपी सरांचे विविध गुण स्पष्ट करणारे लेख लिहिले आहेत. या लेखांमधून प्रतापरावांचा माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची वागण्याची पद्धत, कर्मचाऱ्यांशी असलेलं नातं आणि काम करण्याची शैली यासंबंधी अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. स्वतः प्रतापरावांनी ‘वाटचाल’ हे आपल्या लेखाचे पुस्तक दोन भागांत लिहिले आहे. त्यानंतर ‘अनुभव आले’ हेही त्यांच्या अनुभवांचं पुस्तक आहे. मात्र या तीनही पुस्तकांपेक्षा उद्योजक म्हणून प्रतापराव कसे आहेत, त्यांच्या सहकाऱ्यांना ते कसे जाणवले आणि त्यांच्या नेतृत्वाचा इतरांवर नेमका कसा परिणाम झाला, याचा पडताळा ‘आमचे पीजीपी’ या पुस्तकातून ठळकपणाने येतो. याचं कारण अगदी स्पष्ट आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या काळात प्रतापरावांसोबत काम केलेल्या, त्यांना जवळून पाहिलेल्या आणि त्यांच्या सहवासाचा अनुभव घेतलेल्या अनेक व्यक्तींनी आपल्याला प्रतापराव कसे अनुभवले, हे अत्यंत प्रांजळपणे मांडलं आहे. म्हणून ‘आमचे पीजीपी’ हे केवळ प्रतापरावांवर लिहिलेल्या आठवणींचं पुस्तक राहत नाही; तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या नेतृत्वाचा आणि उद्योजक म्हणून त्यांनी उभ्या केलेल्या कार्यसंस्कृतीचा एक जिवंत दस्तऐवज ठरतं. एखाद्या व्यक्तीने आपल्या वाटचालीबद्दल काय लिहिलं हे जितके महत्त्वाचं असते, तेवढेच त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांनी त्या व्यक्तीला कसं अनुभवलं, यातून त्या व्यक्तिमत्त्वाची उंची अधिक स्पष्ट होते. आणि ‘आमचे पीजीपी’ या पुस्तकाचं नेमकं वैशिष्ट्य हेच आहे.

दैनिकाच्या उद्योगाबद्दल या क्षेत्रातील एका जुन्या जाणत्या संपादकांनी एक गोष्ट एका वाक्यात सांगितली होती, ती म्हणजे ‘हजारो लोक रोज सामूहिकपणे एका प्रॉडक्टसाठी काम करतात आणि त्या प्रॉडक्टचं बाजारातलं विक्रीमूल्य अवघ्या काही तासांचं असतं. त्यानंतर तो कागद वाचकांच्या दृष्टीने रद्दी होतो. त्याचं आयुष्य चोवीस तासांत संपतं. संदर्भमूल्य म्हणून त्या वर्तमानपत्राचं महत्त्व कितीही मोठं असलं, तरी त्याची सेलिंग व्हॅल्यू मर्यादित काळासाठीच असते. चोवीस तास राबून अवघ्या काही तासांसाठी तयार होणारं प्रॉडक्ट जगात वर्तमानपत्राशिवाय दुसरं कोणतं असेल?’ ‘आमचे पीजीपी’ या ग्रंथाची संकल्पना आणि कलात्मक संपादन प्रभाकर भोसले यांनी केले असून, संपादनाची जबाबदारी नयना निर्गुण यांनी सांभाळली आहे. चंद्रकांत कुलकर्णी, बाळासाहेब राक्षे आणि अविनाश टिंगरे यांनी संयोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली आहे. ग्रंथातील छायाचित्रण मिलिंद वाडेकर यांनी केले असून, मुखपृष्ठावरील चित्र विनोद साने यांचे आहे. प्रतापरावांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त २०२४मध्ये हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.

या पुस्तकातील लेखकांमध्ये अनेक मान्यवर मंडळी आहेत वाचनाच्या ओघात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांचा तपशील व त्यांचे पद लिहिलेले नाही ही सगळीच मंडळी मोठी आहेत. लेखकांचा उल्लेख करताना त्यांची पदे अथवा आत्ता ते काय करत आहेत हे सांगितलेले नाही यात कुणाचा अवमान करण्याचा मुळीच हेतू नाही. सगळ्यांबद्दल  आदर आहे, सतत राहिल. ‘आमचे पीजीपी’ हे पुस्तक तुम्हाला हवे असेल तर चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे तुम्हाला ते मिळू शकेल. त्यांचा क्रमांक- ९८८१०९८०२० कृपया शक्यतो त्यांना आधी व्हॉट्सॲप मेसेज किंवा ‘एसएमएस’ करावा आणि मगच त्यांच्या सोयीने फोन करावा ही विनंती. जबाबदारीची कामे त्यांच्यावर आहेत, प्रत्येक फोन अटेन्ड करणे प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यामुळे ही विनंती.

(लेखक विनायक लिमये ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

Skip to content