Homeन्यूज अँड व्ह्यूजटेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे...

टेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे भूमाफिया मोकाटच!

“ऐशा झोपडपट्ट्या माजवाव्या

गहिवर काढोनी गाजवाव्या

निवडणूक येता खाजवाव्या, धूर्त हस्ते

सर्व पक्षांसी वाटे हवी,

कैसी वर्णील दुबळा कवी, पामर वाचा” (मंगेश पाडगावकर)

कविवर्यांची ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची कविता आठवण्याचं कारण ठरली मुंबईतल्या घाटकोपरच्या नारायण नगरातील दरड कोसळून झालेली भीषण दुर्घटना! कवितेत झोपड्यांऐवजी दरडी वा टेकड्या हे शब्द योजले की बस्स! संतापजनक बाब म्हणजे ऐन पावसाळ्यात या दरडी कोसळून झालेल्या भीषण अपघातात गेल्या 20 वर्षांत 200हून अधिक बळी जाऊनही कानून के हाथ अभी तक तो गुनहगारों तक पहुँचे ही नही है…

नारायण नगर आहे ते…

माध्यमांनी घाटकोपरच्या चिराग नगर परिसरात दरड कोसळून अपघात झाल्याचे जाहीर केले खरे.. पण, प्रत्यक्षात चिराग नगरमध्ये हे अपघात ठिकाण येतच नाही. ठिकाण प्रत्यक्षात नारायण नगराच्या ‘लहुजी वस्ताद चौक’ परिसरात आहे. अतिशय चिंचोळ्या गल्ल्या, टेकडीची चढणं, पण टेकडीच्या सर्व खुणा छोट्याछोट्या टपऱ्या व घर म्हणायलाही लाज वाटेल अशा पत्र्याच्या शेड्सनी हा परिसर जणू फुलला आहे. त्यातच धोधो पाऊस. काही ठिकाणी हलायलाही जागा नाही. पायाखाली चिखल.. अग्नीशामक दल व आपत्ती निवारण पथकातील जवानांना मदतकार्य करायला किती कठिण परिस्थिती होती यावरून आपण जाणालच! या जवानांच्या कार्याला सलाम! हाताचा झुला करून जखमींना बाहेर काढले तर या झुल्यावरूनच मृतदेहही बाहेर काढून शववाहिकेत ठेवले गेले…

“म्हणजे काय गोची झालीय

माहिती आहे काय?

तुझ्यावर लिहायला शब्दच नाही उरले!

इतके उधळले,

खर्च केले,

सांड-लवंड झाली,

बघता बघता सगळे संपूनच गेले” (प्रज्ञा पवार)

अशीच काहीशी अवस्था झाली होती.

अगदी अलीकडच्या काही वर्षांपूर्वी विक्रोळीच्या पार्कसाईट येथेही दरड कोसळून भीषण अपघात झाला होता. तेव्हाही पावसाळाच होता. तेथे निदान रस्ते वा गल्ल्यातरी पुरेशा मोठ्या होत्या. परंतु दोन दिवसांपूर्वी नारायण नगरानजीक असलेल्या गौसिया चाळ परिसरात जेमतेम दीड-दोन फूट रुंदीच्या गल्ल्या आहेत. गल्ल्या काय त्या पायवाटाच आहेत. चिखल होता खड्डे होते. टाईल्स उखडलेल्या होत्या. अनेक ठिकाणी अंधारच होता. घराच्या भिंतीना धरूनच मी पुढेपुढे जात होतो. तेथील जनता मात्र आपुलकीने रस्ता दाखवत होती. एक छोटी मशीद दिसली. एक महापालिकेची उर्दू शाळाही तेथे आहे. या पायवाटेखाली मात्र पिण्याच्या पाण्याच्या पाईप्सचा सुळसुळाट दिसला. (काय करणार पाणीच त्यामानाने त्यांच्या खिशाला परवडेल असे होते!) मिश्र वस्ती होती. एकमेकाला सहाय्य करीत होते. सामाजिक कार्यकर्ते, पोलीस आणि इतर दलांचे जवान मदतकार्य करत होते. एका विशिष्ट हद्दीपर्यंतच रिक्षा जात होत्या. बाकी पायवाटेवर बाईक्स आरामात येजा करत होत्या.

जिल्हाधिकारी जात्यात?

शिव चुनाभट्टीपासून सुरु झालेली ही टेकडी अगदी थेट मुलुंड-ठाण्यापर्यंत पोहोचलेली आहे. टेकडी परिसर असल्याने साहजिकच जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत याचा कारभार येतो. नागरी सुविधा पुरवणे इतकेच मुंबई महापालिकेचे काम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या टेकड्यांवरील बांधकामास परवानगी कशी दिली हाच कळीचा मुद्दा ठरू शकतो. या बांधकामांना खरेतर नोटीस द्यायचीही नसते, त्वरित तोडक कारवाईची अपेक्षा असते. परंतु सर्वच राजकीय पक्ष अशा अनधिकृत बंधकामांना पाठीशी घालतात. जमले तर एखाद्या स्वयंसेवी संघटनेला मध्ये घालून तोडक कारवाई होऊ देत नाहीत, असा रोजचा अनुभव आहे. टेकडीवरील चाळींमध्ये त्यामानाने भाडे व अनामत रक्कमही कमी असल्याने गरिबांचा कल तिकडेच असतो.

प्रत्येकवेळी दरड कोसळून अपघात झाल्यावर पहिले काही दिवस वा महिने पालिका व जिल्हा प्रशासन कारवाईसाठी हालचाल करते. मृतांच्या नातेवाईकांना वा जखमीना आर्थिक साहाय्य व वैद्यकीय मदत केली जाते. बऱ्याच प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने हे सहाय्य मिळण्यासही विलंब होतो. खरेतर गल्ली वा घर जोडण्यासाठी जोवर रस्ता बांधला जात नाही तोवर वस्तीला पाणी वा वीज देण्याबाबत कडक नियम केले जावेत. न्यायालयांनीही उगाचच मानवतावादी होऊन झोपड्या उभारल्या जाऊ देऊ नयेत. टेकड्यांवरील चाळी बांधणाऱ्या भूमाफियांना शोधून काढण्यासाठी सीआयडीचे एक पथक काही काळासाठी नेमले जावे व पक्की केस तयार करून या माफियाचा बंदोबस्त केला जावा.

“काही म्हणाले

शासन निष्क्रिय

निष्प्राण शासन

शासन बोलेना, शासन हलेना

शासनाचा मेंदू चालेना” (नामदेव ढसाळ)

असे काही होऊ नये, तूर्त इतकेच!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

नामचीन गुंडाला ‘पिंजरा’ दाखवताच पोलीस अधिकारी यमसदनी!

ठाण्यात पाच दिवसांपूर्वी, 24 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराने सिमेंटची वीट डोक्यात घालून ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारले. कारण काय तर म्हणे राऊंडवर असताना मला 'पिंजऱ्यात' का टाकले? (पिंजरा म्हणजे पोलिसांची जाळीदार गाडी). स्थळ- पोखरण रस्ता...

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...
Skip to content