Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत बॉम्बस्फ़ोट घडवून आणलेल्या काही देशविरोधी शक्तींचा हात आहे. मात्र, पोलीस याबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. योग्य वेळ येताच आम्ही सर्व गोष्टी उघड करू, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने माझ्याशी बोलताना सूचित केलें.

१९९३मध्ये मुंबई शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फ़ोटातील काही आरोपींना जन्मठेप झाली. आग्रीपाडा परिसरातच राहणाऱ्या मुस्तफा डोसा या आरोपीस अखेर फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. आग्रीपाड्याच्याच घास गल्लीतील ‘जस्मिन’ इमारतीवर घाड घालून अमली पदार्थविरोधी पथकाने एमडी गोळ्या बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला असला तरी त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिलेले आहेत. ‘जस्मिन’ या इमारतीत मुस्लिम राहतात. (याबाब आक्षेप नाहीच.) परंतु कोणत्या घरमालकाने या तीन आरोपींना आपले घर राहण्यास दिले याची माहिती पोलिसांनी अजून जाहीर केलेली नाही. या आरोपींपैकी एक बांगलादेशी मुस्लिम महिला असल्याचे पोलिसांनीच सांगितलेले आहे. तर मग या सर्व भाडेकरूंनी समोरच असलेल्या आग्रीपाडा पोलीसठाण्याकडून भाडेकरुंसाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले होते का? शिवाय जस्मिनच्या सहकारी गृह निर्माण संस्थेने याची माहिती पोलीसठाण्याला दिली हॊती का? असे एक ना दोन विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

केवळ ‘सील’ ठोकून पोलिसांचे काम संपले असे कसे वाटले? आरोपीचे त्या इमारतीत राहणारे सहनभूतीदार कशावरून सीलशी छेडछाड करणार नाहीत? त्या इमारतीतील काही मजल्यांची न्यायवैद्यक तपासणी का केली गेली नाही, असेही एका माजी पोलीस अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर विचारले. फाशी देण्यात आलेल्या मुस्तफा डोसा या आरोपीचे काही जवळचे नातेवाईक आग्रीपाड्याच्या एका ‘फॉर्चून ग्रँड’ या इमारतीत राहत आहेत. दुसऱ्या मजल्यावर त्यांचे कार्यालय असून १८व्या मजल्यावर ते राहतात, अशी माहिती मिळाली. त्यांचे सर्व व्यवहार गुन्हेगारी जगताशी संबंधित असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले. अमली पदार्थांची नेआण व हवालासंबंधी आरोपाबाबत पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले होते, असे समजते. त्यांच्याकडे स्कोडा, सँट्रो व करड्या रंगाची आलिशान फॉर्चूनर गाडी असून त्यांच्या तैनातीसाठी इतरही गाड्या मागवल्या जातात.

डोसाच्या या जवळच्या नातेवाईकाचे काही मित्र तर ‘नामचीन’च आहेत. बिल्लाल नावाचा मित्र अमली पदार्थ वितरण व हवाला मार्गाने पैसे पाठवणे व उठवणे हा दोन नंबरचा बिझनेस पाहतो. एक ‘ऑल्टरनेट’ नावाचं पात्र एमडी गोळ्यांचे वितरण पाहतो. एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेला रमीझ मोहम्मद अहमद हा तर एमडी गोळ्यांंसहित चरसही लीलया किनारे लगाता है. संतापजनक बाब म्हणजे याचाच एक पापा नावाचा मित्र व संशयित ‘बूर्ज अल कडिया’ या अल कायद्याच्या धर्तीवर नाव असलेल्या इमारतीत राहतो. याची आग्रीपाडा व डोंगरी परिसरात बरीच दहशत आहे. त्यांचा नौमन नावाचा साथीदार मुसाफिरखाना रोडवरील आलिशान धर्मशाळेत राहतो. हा सुरुवातीच्या काळात मनीष मार्केटमध्ये तस्करीच्या वस्तू विकत असे. हल्ली एमडी गोळ्या व सुई (अमलीच डिस्पॉसेबल इंजेक्शन) अनेक बार व आलिशान पबला कसे पोहोचेल याची काळजी घेतो.

अंग्री, बिहारीं, कुरेशी (याच्या मालकीचे इटली येथे शॉप आहे म्हणे..), एक शानू तसेच मनीष मार्केटमधला मोबाईल विक्रेताही या चांडाळचौकडीत सामील असल्याचे डोंगरी परिसरात दबक्या आवाजात बोलले जाते. मुस्तफाची बेगम साफिया डोसा, ही गेले कित्येक वर्ष दुबईत राहत असून मुस्तफाचा हवालाचा व्यवसाय हीच सांभाळते असे समजले. हवाला व्यवहार आठवड्यातून दोन वेळा करून ती मुस्तफाच्या नातेवाईकांना रग्गड पैसा पुरवते. इतकेच नाही तर यंत्रणाना ‘शांत’ ठेवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खेळवते. हल्ली गेल्या काही महिन्यांपासून दररोज कुठे ना कुठे अमली पदार्थांची फॅक्टरी उद्ध्वस्त होत असल्याच्या बातम्या येत आहेत. पोलिसांची कारवाई होत असली तरी त्यात दिवसागणिक वाढचं होताना दिसत आहे. मुंबई विभागात (संपूर्ण एमएमआर) विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करावे व त्यांना अमली पदार्थविषयक बाबीच सांभाळण्याचे विशेष अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी आम्ही करत आहोत. हे पद स्वतंत्र ठेवले जावे (पूर्वी विशेष आयुक्त होते. परंतु ते आयुक्ताच्या सहाय्याने कार्यभार सांभाळायचे, असे नको..) हे विशेष आयुक्त थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलतील व आदेश घेतील.) गुन्हे अन्वेषणातील कामगिरी पाहूनच एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी सोपवावी. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवाभाऊंनी जस्मिन इमारतीसंबंधातील अधिक माहिती घ्यावी. नेटाने तपास केल्यास डोळे सताड उघडे राहतील, याची आम्हाला खात्री आहे.

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ गुन्हेगारीविषयक पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आग्रीपाड्यातली ‘यास्मिन’ आणि पोलिसांचे ‘डोला रे डोला…’!

बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात 'आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त', अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि गेलोही! आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या दारातच उतरलो. आजूबाजूला नजर टाकली. प्रशस्त रस्ता, गगनचुंबी इमारती.. काही इमारती तर...

ठाणे पालिकेच्या गावदेवी मार्केटला ना ओसी, ना योग्य अग्नीसुरक्षा!

ठाणे शहरातील महापालिकेच्या गावदेवी मार्केटला आग लागून सर्व मार्केट आगीत भस्मसात झाल्याला आज आठवडा झाला असूनही मार्केट सफाईचे काम अत्यंत हळू सुरु असल्याबाबत गाळेधारकांनी संताप व्यक्त केला आहे. यांत्रिक झाडू वा आधुनिक पद्धतीने सफाई न करता बाबा आदमच्या काळाप्रमाणे...

गावदेवी मार्केटची आग संशयाच्या भोवऱ्यात!

दोन दिवसांपूर्वीच आमचे वकीलमित्र गणेश सोवनी यांनी सव्वा सात वाजता पाठवलेला एक मेसेज पाहून मी हादरलोच! मेसेज छायाचित्रासह असल्याने त्याचे गांभीर्य लगेचच लक्षात आले व सकाळची सर्व कामे आटोपल्यावर ठाण्यातीलच गावदेवी मार्केट परिसरात जाण्याचे पक्के केले. वकीलसाहेबांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये...
Skip to content