Homeबॅक पेजशिवसेनेवर डॉक्टरेट मिळवणारी...

शिवसेनेवर डॉक्टरेट मिळवणारी विदर्भकन्या!

१०६ बहाद्दर बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महत्प्रयासाने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. अशावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’ हे जगाच्या इतिहासातील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ख्यातकीर्त झालेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या ‘मार्मिक’चे प्रकाशन केले. ठाकरे यांनी ‘मार्मिक’मधून अमराठी लोकांची यादी जाहीर केली आणि त्या स्तंभाला ‘वाचा आणि थंड बसा’ हे चपखल आणि चीड आणणारे शीर्षक दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विचारले की, अरे बाळ, तू केवळ ‘वाचा आणि थंड बसा’ लिहीत बसणार की पुढे आणखी काही करणार? मग प्रबोधनकार ठाकरे यांच्या सूचनेनुसार ‘शिवसेना’ ही मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी संघटना स्थापन केली.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आमच्या एक वैदर्भीय कन्या सरिता वाकोडे यांनी गेल्या सहा वर्षांच्या संशोधनानंतर शिवसेनेवर पीएचडी करुन डॉक्टरेट मिळवली आहे. अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांचा ‘शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन’ हा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सरिता वाकोडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला हा प्रबंध सादर केला आणि २६ मे २०२६ रोजी त्यांना समारंभपूर्वक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. १३ डिसेंबर २०२५ रोजी आम्ही अकोल्यात वाकोडे परिवाराची भेट घेतली. सरिता आणि त्यांच्या भगिनी या सख्ख्या बहिणी व सख्ख्या जावा आहेत, हे कळताच मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई आणि श्रीकांत ठाकरे यांच्या पत्नी कुंदाताई यासुद्धा सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा आहेत. ही गोष्ट मी त्यांना बोलून दाखविली. याचवेळी सरिता यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सादर केलेल्या प्रचंड मोठ्या प्रबंधाची प्रत अवलोकनासाठी दिली. ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी त्यांना सहकार्य केले असल्याने आम्ही तेथूनच आचार्य यांच्याशी संपर्क साधून त्यांना दाद दिली. गेल्या दोन वर्षांपासून सरिता वाकोडे यांनी मुंबईमध्ये दादर ते दहिसर अशा सर्वच ठिकाणी भेटी देत दिवंगत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी आमदार नीला देसाई, विशाखा राऊत, विनोद घोसाळकर, मागाठाणे मित्र मंडळ, प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय, रेखा बोऱ्हाडे, रोहिणी चौगुले अशा अनेकांची भेट घेतली. संपूर्ण माहिती संकलित केली. माझे ‘पासष्टायन’, ‘गुरुजी’ ही पुस्तके, योगेंद्र ठाकूर यांचीही पुस्तके त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रसिद्धीप्रमुख हर्षल प्रधान यांनीसुद्धा त्यांना सहकार्य केले. अशी ठिकठिकाणाहून माहिती घेत वाकोडे यांनी हा प्रबंध लिहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते शिवसेनेच्या कार्यापर्यंतचा इतिहास, मराठी अस्मिता, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारधारेचा सखोल अभ्यास करणारा “शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन: विशेष संदर्भ मुंबई विभाग (कालखंड इ. स. १९६० ते २०१०)” हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि इतिहास विषयातील संशोधन प्रबंध सादर करून
डॉ. सरिता वाकोडे महाराष्ट्रातील पहिल्या महिला संशोधक ठरल्या आहेत.

सुमारे ४५० पानांच्या या विस्तृत संशोधनामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांतरचना, मराठी अस्मितेचा संघर्ष, शिवसेनेची स्थापना, संघटनात्मक विस्तार, सामाजिक कार्य, सांस्कृतिक चळवळी आणि महिला सक्षमीकरणाचा व्यापक ऐतिहासिक अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनामध्ये शिवसेनाप्रमुखांपासून शिवसैनिकांपर्यंत आणि शाखांपासून मातोश्रीपर्यंत शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. शिवसेनेची स्थापना, ‘मार्मिक’ साप्ताहिकाची भूमिका, मराठी युवकांच्या प्रश्नांवरील आंदोलने, दसरा मेळावे, हिंदुत्वाची भूमिका, मराठी माणसासाठीचा संघर्ष आणि मानवतावादी कार्याचा तपशीलवार आढावा या प्रबंधात मांडण्यात आला आहे. स्वच्छ मुंबई हरित मुंबई, बॉम्बेचे मुंबई नामांतर, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव विमानतळाला देण्यासाठीचा लढा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, चित्रपटसृष्टीतील प्रश्न, शाखा म्हणजे प्रतिन्यायमंदिरे, रक्तदान व आरोग्य शिबिरे, झोपडपट्टी पुनर्वसन, एक रुपयात झुणका भाकर, मराठी युवकांना रोजगार, लोकाधिकार समिती महासंघ, कामगार सेना, आपत्ती व्यवस्थापनातील योगदान यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. मराठी भाषेचे रक्षण, मराठी लोककला संवर्धन, गणेशोत्सव, दहीहंडी, शिवजयंती, मराठी चित्रपटांना प्रोत्साहन, सांस्कृतिक मंच व नाट्यमंदिरे, कवी, शाहीर, कलाकार यांना पाठबळ, आदी विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.

एका महिलेने शिवसेनेची विचारसरणी, समाजकारण, मानवतावादी कार्य आणि मराठी अस्मितेवर एवढ्या व्यापक स्वरूपात पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करणे ही निश्चितच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी स्वाभिमानाची आणि गर्वाची बाब मानली जात आहे. या पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यातील महिला जिल्हा संघटिका म्हणून त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. अशा रणरागिणी शिवसैनिकेचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे. हा संशोधनग्रंथ महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दैनिक ‘सामना’मधील आमचे सहकारी अनंत गुरव तसेच अमरावती येथील डॉ. मनीष देशमुख यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर डॉक्टरेट मिळवली आहे तर माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी शिवसेनेवर प्रबंध लिहित डॉक्टरेट प्राप्त केली. ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांनी लोकमान्य टिळक विद्यापीठातून दैनिक ‘सामना’वर सुमारे चारशे पानांचा प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली. आता शिवसेना (उबाठा)च्या अकोला जिल्हा महिला संघटक सरिता वाकोडे यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा!

(लेखक योगेश वसंत त्रिवेदी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

समर्पिताः प्रेमकहाणी रमा आणि निशूची!

फार वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. अंबरनाथ त्यावेळी आजच्या इतकं सुधारलेलं/पुढारलेलं नव्हतं. १९७२ साली दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातून अकरावी उत्तीर्ण होऊन रमेश मुंबईत सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचं उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. यातून त्याने सुवर्णपदकं...

जे हिंदुत्व बाळासाहेबांचे तेच खणखणीत हिंदुत्व उद्धव ठाकरेंचे!

महाराष्ट्र विधानसभेच्या एका निवडणुकीत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील शिवसेना-भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व...

सुधा चुरीः लढवय्या महिलांचे स्फूर्तिस्थान!

शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले. गेल्या काही दिवसांपासून सुधाताईंची सतत आठवण येत होती. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि मी आम्ही...
Skip to content