भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच ‘भूकंप’सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले. तर दुसरीकडे, भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९५ ही पातळी ओलांडत आजवरची सर्वात मोठी ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे.
जागतिक संकेतांमुळे बाजार दबावात उघडणार याची चिन्हे स्पष्ट होती. मात्र, ‘प्री-ओपनिंग’मध्ये त्याची झलक दिसली; पण पुढे ९.१५ वाजता बाजार उघडताच विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला. सकाळी ९.३०च्या सुमारास बाजारात ‘पॅनिक सेलिंग’ला सुरुवात झाली. निफ्टीमध्ये एकाएकी ३७० अंकांची मोठी घसरण झाली. बाजारातील या पडझडीमुळे अवघ्या दोन तासांत बीएसईवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल लक्षणीयरीत्या घटले. सकाळी ११.१५पर्यंतच गुंतवणूकदारांचे अंदाजे ८.३७ ते ९ लाख कोटी रुपये बुडाले.
चलन बाजारातही धक्कादायक स्थिती
शेअर बाजारातील पडझडीसोबतच चलन बाजारातूनही धक्कादायक बातमी आली. भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९५.०० ची पातळी गाठली आहे. रुपयाच्या या ऐतिहासिक घसरणीमागे प्रामुख्याने खालील ५ कारणे आहेत-
१. कच्च्या तेलाचा भडका: ब्रेंट क्रूड ११५ डॉलरच्या पार गेल्याने भारताच्या आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे.
२. परकीय गुंतवणूकदारांची (एफआयआय) माघार: भारतीय बाजारातून परकीय गुंतवणूकदार वेगाने पैसा काढून घेत असल्याने रुपयावर दबाव वाढला आहे.
३. डॉलरचा वाढता दबदबा: जागतिक बाजारात डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने रुपयासह इतर आशियाई चलनांची घसरण होत आहे.
४. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव: जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने व्यापार तूट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
५. जागतिक महागाईचा धोका: अमेरिकेतील महागाई आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.
पुढे काय? तज्ञांचा सावधगिरीचा इशारा
बाजारातील या ‘घसरणी’नंतर तज्ञांनी गुंतवणूकदारांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. निफ्टीने २४०६०ची महत्त्वाची पातळी तोडल्याने ही घसरण आणखी खोलवर जाऊ शकते.
“बाजारातील जोखीम आता सर्वोच्च स्तरावर आहे. कच्च्या तेलाच्या किमती जोपर्यंत शांत होत नाहीत आणि रुपया स्थिर होत नाही, तोपर्यंत नवीन मोठी गुंतवणूक करणे टाळावे,” असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. सध्याची स्थिती पाहता, सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

