Homeब्लॅक अँड व्हाईटआता मुंबईतला 'मटका'...

आता मुंबईतला ‘मटका’ नागराज मंजुळेच्या हाती!

‘मटका किंग’ म्हणताच चित्रपटरसिकांच्या पन्नाशी ओलांडलेल्या पिढीला फिरोज खान अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘धर्मात्मा’ (१९७५) आठवला असेल तर त्याच वयाच्या पण फारसे चित्रपट न पाहिलेल्या परन्तु सामाजिक भान असलेल्यांना ओरिजनल मटका किंग रतन खत्री आठवला असेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ ही वेबसिरिज खूपच उशिरा आली असं म्हणायला हवं. साठ आणि सत्तरच्या दशकात गल्लीगल्लीच्या आड वा बाजूला बसलेल्याकडे आकडा लावल्याचे चिटोरे दिवसभर प्राणपणाने सांभाळायचे आणि मग संध्याकाळी ‘आकडा लागल्या’वर आपलं नशीब खुलले का पाहयचे, असे अनेकाचे आशादायी, स्वप्नाळू आयुष्य होते. तीन पत्ती वगैरे शब्द त्या काळात फार प्रचलित होते. आणि यामागचे अथवा यासाठीचे नेटवर्क अनाकलनीय होते. केवळ लॅण्डलाईन फोनवर सगळा खेळ मांडला जाई आणि एकदा का ‘शुभाऺक’ काढला की लॅण्डलाईन फोनच्या माध्यमातून आवश्यक तेथे पोहोचत असे.

‘धर्मात्मा’ चित्रपटात धरमदास ‘धर्मात्मा’ (प्रेमनाथ) अशा पद्धतीने संध्याकाळी उशिरा आपल्यासमोरील टेबलावर पत्ते पिसून टाकतो आणि एकेक करत तीन पत्ते काढतो. दुरी, सत्ता (सात) आणि मेंढी (दहा) आणि लगेचच त्याचे फऺटर आपलं नेटवर्क कामाला लावतात. हा चित्रपट फ्रान्सिस फोर्ड कोपोला दिग्दर्शित ‘गाॅडफादर’ (१९७२)वर बेतला होता. फिरोज खान हा तसा डॅशिंग चित्रपट निर्माता. त्याच्या चित्रपटावरचा पाश्चात्य संस्कृतीचा आणि धाडसी पटकथेचा प्रभाव कधीच लपला नाही. पण ऐन आणीबाणीत ‘धर्मात्मा’ सहजी सेन्सॉर संमत कसा होणार? सेन्सॉरचे नियम कडक झाले होते. ‘धर्मात्मा’ पकडला गेला कैचीत. फिरोज खानच्या वितरकांनी चित्रपटगृहे आणि चित्रपट प्रदर्शित करण्याचा शुक्रवार निश्चित केला. तो पुढे ढकलला. सेन्सॉरने सुचवलेल्या कट्समधून आकडा काढण्याचे दृश्य सुटले. फक्त प्रौढांसाठी असं प्रमाणपत्र नाखुशीने घेतले आणि मुंबईत ९ मे १९७५ रोजी लिबर्टी आणि इतरत्र चित्रपट झळकला.

रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच ‘तीन पत्ती’ दिसला. हे एकप्रकारचे धाडसी पाऊल. १९७५ साली हिंदी चित्रपटसृष्टीने नवीन वळण घेतले. त्यात हेदेखील एक. आता इतक्यावरच थांबून कसं चालेल? खुद्द रतन खत्रीच हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर आला, दिसला हे माहित्येय? एस. रामनाथन दिग्दर्शित ‘रंगीला रतन” (१९७६) या चित्रपटात एका मारहाणदृश्यात काही युवक आणि ऋषि कपूर यांच्यात देमार घेमार, ढिश्यूम ढिश्यूम सुरु असतानाच रतन खत्री यांची एन्ट्री होते. ते ही मारहाण थांबवतात. एक जोरदार डायलॉग बोलतात. दूध के दात अभी गिरे नहीं और चले… मला आठवतंय. इंपिरियल चित्रपटगृहात मॅटीनी शोला हा चित्रपट एन्जॉय केला. तरी असं काही चित्रपटात दाखवल्याचे तत्कालिक समीक्षकांना अजिबात आवडलं नव्हतं. अशी व्यक्ती चित्रपटात दाखवता? अरे बापरे.. असा त्यात सूर होता.

मटका

आज काळ बराच पुढे गेलाय. अभय कोरान्ने आणि नागराज मंजुळे यांना ‘मटका किंग’चे सुनियोजित साम्राज्य, यंत्रणेवरची पकड, त्यातूनच घडलेली एक वेगळी सामाजिक व्यवस्था यात कमालीचे नाट्य दिसले आणि त्यानी ओटीटी माध्यमातील स्वातंत्र्य घेत ‘मटका किंग’ वेबसिरीज आणलीदेखिल. नागराज मंजुळे म्हटलं की ‘सैराट’ (२०१६) असेच काही नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि माध्यम अशी चौफेर जाण असलेला असा हा दिग्दर्शक आहे. मटका किंगच्या भूमिकेतील विजय वर्माने ही वेबसिरीज ओटीटीवर येताच दक्षिण मुंबईतील जुन्या मुंबईची आठवण देत असलेल्या स्पाॅटवर केलेलं फोटोसेशन बहुचर्चित ठरतेय. मार्केटिंग प्रमोशनचा फंडा आज भारी महत्त्वाचा झाला आहे. जुन्या काळातील उलटसुलट आकडेवारीने भरलेले ‘ते’ कागद कुठे मिळालेच तर अतिशय फोकस्ड प्रमोशन होईल. हा खेळ न्यारा होता. मन, पैसा आणि अपेक्षा असे सगळेच त्यात गुंतलेले. (काही मटका व्यसनी त्यात फार फार रस घेत, त्यामागची मानसिकता त्यांनाच माहीत) सई ताम्हणकरनेही फोटोसेशन करत मटका किंगच्या प्रसिद्धीत भर पडली. तिची अभिनयक्षमता पाहता तिला ‘लेडी मटका किंग’ची व्यक्तीरेखा साकारायला मिळावी. या वेबसिरीजचा सिक्वेल असाच असू शकतो, असाच असावा. तेच ‘सही’ ठरेल… ओपन टू क्लोज.

(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

होय, ती हेमा मालिनीसारखी दिसतेय, मग?

आपल्या बहुसांस्कृतिक देशात आपण आपल्या आवडत्या चित्रपट‌ कलाकार, क्रिकेटपटूसारखं दिसावं, असावं यासाठी आपल्या चेहऱ्यावर, केसांवर, हसण्यावार, पाहण्यावर मेहनत घेणारे, ब्यूटी पार्लरवर चकरा मारणारे 'दीवाने' (की येडे?) कमी नाहीत. ती वेडी मानसिकता वेगळी. राजेश खन्नाच्या अक्राळविक्राळ क्रेझच्या युगात आमच्या गिरगावात...

त्याला स्वतः काम केलेला चित्रपटही बघण्याची अडचण!

चित्रपटाच्या जगात काहीही घडू/बिघडू शकते. आणि म्हणूनच तर ते काय काय घडतंय हे जाणून घेण्यात रस आहे. अशीच एकदम ताजी गोष्ट, आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर २' पाहायला याच चित्रपटात रिक्षाचालकाची छोटीशी असली तरी महत्त्वाची भूमिका साकारलेल्या बदरुल इस्लाम या...

‘मधुबाला’ हवी आहे! आहे का कोणी नजरेत?

चित्रपट निर्मितीत सगळ्यात अवघड चरीत्रपट. मग तो चित्रपट रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित 'गांधी' (१९८३) असेल तर त्यावरच्या प्रचंड संशोधन, अभ्यास, चर्चा, मेहनत, खर्च यावर आणखी एक चित्रपट निर्माण होईल. तसा अतिशय प्रभावी चरीत्रपट तो एकच. तसं पाहिलं तर अनेक भाषेतील...
Skip to content