भारत-श्रीलंका यांनी संयुक्तपणे नुकत्याच आयोजित केलेल्या १०व्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात आपले वर्चस्व अधोरेखित करुन अंतिम लढतीमध्ये धोकादायक न्युझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवून अखेर आपले जेतेपद कायम ठेवण्यात यश मिळवले. या जेतेपदावर विजयाची मोहर उमटवताना सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. या स्पर्धेच्या इतिहासात विजेतेपद राखणारा भारत पहिला संघ ठरला. भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकून आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. यजमान या नात्याने ही स्पर्धा जिंकणारा भारत या स्पर्धेतील पहिला देश ठरला आहे. या विजयाबरोबरच न्युझीलंडविरुद्ध भारताने आपला घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी आणि वनडे सामन्यातील पराभवाचा बदलादेखील घेतला. टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच न्युझीलंडला नमवले. महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय संघाने आपल्या कोट्यवधी महिला भगिंनीना विश्वचषक विजयाची आगळी भेट दिली असे म्हणावे लागेल.
भारताने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व सिद्ध करून न्युझीलंडला विजयाची बिलकुल संधीच दिली नाही. भारताची अंतिम सामन्यावरील मजबूत पकड बघून हा अंतिम फेरीचा का पहिल्या फेरीचा सामना होता अशी कुजबूज भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये सुरु होती. सॅमसन ८९, अभिषेक ५२, ईशान किशन ५४ धावा यांनी झकास फटकेबाजी करुन भारतीय विजयाचा पाया रचला. मग बुमराह आणि अक्षर पटेलने अनुक्रमे ४, ३ बळी घेऊन भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले. २०२३मध्ये याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत बलवान ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा आरामात पराभव केला होता. त्या पराभवाच्या कटू आठवणी भारतीय संघाने यावेळी मात्र लगेचच पुसून टाकल्या. शेवटच्या सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला मालिका वीर आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला अंतिम सामन्यातील सर्वोतम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेत शेवटच्या तीन सामन्यात संजु सॅमसनच्या अफलातून खेळीमुळे भारताला तारले.
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय संघाला फारसा सूर गवसला नव्हता. पण “सुपर एट”पासून स्पर्धेला खरी सुरुवात झाली. तेथून मात्र प्रत्येक सामन्यात भारताचा आलेख कमालीचा उंचावत गेला. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्युझीलंड कप्तान सॅन्टेनरने त्याचे चांगले नेत्तृत्व केले होते. योग्य संघ निवड केली होती. पण निर्णायक सामन्यात त्यांची संघनिवड चुकली. उपांत्य फेरीत प्रभावी ठरलेला ऑफ स्पिन गोलंदाज कोल मॅकाईनला वगळण्याची मोठी चूक न्युझीलंड संघाने केली. भारतीय संघात सहा डावखुरे फलंदाज खेळत असताना कोलला खेळवणे नक्कीच फायदेशीर ठरले असते. त्याच्याऐवजी तेज गोलंदाज डफीला खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय चुकला. त्याच्या ३ षटकांत ४२ धावा फटकावल्या गेल्या. कोलऐवजी फिलीप्सच्या फिरकी माऱ्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. पण त्याला एकच षटक देण्यात आले. त्यामध्ये त्याने अवघ्या ५ धावा दिल्या. एकंदर भारताचा आक्रमक पवित्रा पाहता न्युझीलंड संघ गोंधळला. कप्तान सॅन्टेनर गडबडला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत न्युझीलंड सलामीवीर फिन अॅलनने स्पर्धेतील सर्वात जलद शतक फटकावले होते. पण अंतिम फेरीत अक्षर पटेलने तिसऱ्या षटकात फिन अॅलनला अवघ्या ९ धावांवर बाद करुन भारतीय विजयातील मोठा अडसर दूर केला. २५६ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्युझीलंडची सुरूवात खराब झाली. बिनबाद ३१वरुन ३ बाद ४७ धावा अशी त्यांची पडझड झाली. तेथेच भारतीय संघाचा विजय पक्का झाला. निर्णायक लढत एकतर्फी झाल्यामुळे क्रिकेटप्रेमींची मात्र चांगलीच निराशा झाली. आतापर्यंत उभय संघात आयसीसीच्या चार स्पर्धेत अंतिम फेरीत लढती झाल्या. त्यात न्युझीलंडने चॅम्पियन्स स्पर्धेत नंतर जागतिक कसोटी स्पर्धेत भारताला नमवले होते. त्यानंतर झालेल्या चॅम्पियन्स स्पर्धेत भारताने बाजी मारली होती. तर आता विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारताने त्यांना नमवले. दोन्ही संघात विश्वचषक टी-२० स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने झाले. त्यात पहिली लढत भारताने जिंकण्यात यश मिळवले.
गेल्या १८ महिन्यांत भारताने दोन टी-२० विश्व चषक स्पर्धा, वनडे चॅम्पियन्स स्पर्धा, महिलांची वनडे विश्वचषक स्पर्धा आणि १९ वर्षांखालील मुलांची ज्युनिअर विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. हे भारताचे विजय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा किती दबदबा आहे हे दाखवून देते. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी असलेली कडी स्पर्धा भारतीय क्रिकेटचा उच्च दर्जा दाखवून देते. आता जणू काही जेतेपदाची सवय लागलेला भारतीय संघ एका खेळाडूवर अवलंबून न राहता सांघिक कामगिरीच्या जोरावर मैदानात उतरतो हे चित्र दिसायला लागले आहे. भारतीय क्रिकेट संघ कोणत्याही परिस्थितीतून उभारी घेऊ शकतो याचा प्रत्यय या स्पर्धेत आला. भारतीय संघाचा विजय सातत्य, जिद्द, सामुहिकता या त्रिसूत्रीला अधोरेखित करणारा होता. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पर्धेत पहिल्या टप्प्यात अपराजित असलेल्या बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला न्युझीलंडच्या फिल अॅलनने केलेल्या जबरदस्त स्फोटक नाबाद शतकी खेळीमुळे स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला. स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका संघाला गवसलेला सूर पाहता कागदावर दक्षिण आफ्रिका संघाचेच पारडे जड होते. तसेच विश्वचषक स्पर्धेत याअगोदर झालेल्या न्युझीलंडविरुद्धच्या सर्व लढतीत दक्षिण आफ्रिका संघाचीच सरशी झाली होती. यंदादेखील या स्पर्धेत गटातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्युझीलंडला नमवले होते. पण अखेर दक्षिण आफ्रिकेची ती विजयी दौड रोखण्यात न्युझीलंडला यश आले.
उपांत्य फेरीची पहिली लढत एकतर्फी होत असताना यजमान भारताविरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी उपांत्य फेरीची लढत चांगलीच रंगली. शेवटच्या षटकापर्यंत जय, पराजय अशा दोलामय स्थितीत हा सामना असताना अखेर भारताची अवघ्या ७ धावांनी सरशी झाली. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरली. दोन्ही संघानी मिळून तब्बल ४९९ धावा केल्या. इंग्लंड कप्तान ब्रुकचा भारताला पहिली फलंदाजी देण्याचा निर्णय महागात पडला. संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या तुफानी खेळीमुळे भारताने २० षटकात ७ बाद २५३ धावांची मोठी मजल मारली. त्याला किशन ३९, दूबे ४३, पंड्या २७, वर्मा २१ धावा यांची छान साथ मिळाली. कर्णधार ब्रुकने संजूला १५ धावांवर दिलेले जीवदान सामन्याच्या निकालाला कलाटणी देणारे ठरले. तो झेल ब्रुकने घेतला असता तर भारताला एवढी मोठी धावसंख्या काढता आली नसती. एकंदर या सामन्यात इंग्लंडला खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका बसला. उगाच म्हणत नाहीत “कॅचेस विन मॅचेस”. इंग्लंडच्या बेथेलने १०५ धावांची जबरदस्त खेळी करुन त्यांचा विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण त्यांचे स्टार फलंदाज लवकर बाद झाल्याने त्याची ही झुंजार शतकी खेळी व्यर्थ ठरली. भारताने क्षेत्ररक्षणात चांगली चमक दाखवली. खास करुन अक्षर पटेलने कप्तान ब्रुकचा घेतलेला अफलातुन झेल, तसेच जॅक्सचा घेतलेला रिले झेल सामन्याला कलाटणी देणारे ठरले. सामन्यातील महत्त्वाच्या शेवटच्या हाणामारीच्या षटकांत बुमराह, पंड्याने अचूक दिशा, टप्प्यावर मारा करुन इंग्लंडचे विजयी लक्ष्य त्यांच्या आवाक्याबाहेर नेले. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज बटलर या स्पर्धेत साफ अपयशी ठरला. त्याला ८ सामन्यात जेमतेम एकच अर्धशतक काढता आले. त्याचाही मोठा फटका इंग्लंडला बसला. उभय संघात आतापर्यंतच्या झालेल्या लढतीत भारताने १७ तर इंग्लंडने १२ विजय मिळवले. विश्वचषक स्पर्धेत ५ पैकी ३ सामन्यांत भारताने बाजी मारली.

“सुपर एट”मधील पहिल्या पाकिस्तान, न्युझीलंड लढतीत पावसाचा व्यत्यय आल्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला. दुसऱ्या सामन्यात न्युझीलंडने श्रीलंकेचा ६१ धावांनी सहज पराभव केला. तिसऱ्या सामन्यात मात्र त्यांना इंग्लंडकडून हार खावी लागली. त्यामुळे पाकिस्तान, श्रीलंका या “सुपर एट”मधील शेवटच्या श्रीलंका, पाकिस्तान सामन्याच्या निकालावर न्युझीलंडच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाचे भवितव्य अवलंबून होते. पाकिस्तानने ही लढत ६५ धावांनी जिंकणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. आणि न्युझीलंडच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. “सुपर एट”मध्ये सलामीच्या लढतीत भारताला दक्षिण आफ्रिका संघाकडून ७६ धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांनी जिंकला. शेवटचा भारत विरुद्ध वेस्टइंडीज हा सामना दोघांसाठी “जिंकू किंवा मरु” असाच होता. या सामन्यातील विजयी संघ स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार होता. या लढतीत सलामीवीर संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने लीलया विजय मिळवला आणि भारताने उपांत्य फेरी गाठली.
त्याअगोदर झालेल्या गटातील सामन्यात न्युझीलंडने अफगाणिस्तानला, युएईला, कॅनडाला नमवले. पण त्यांना दक्षिण आफ्रिकाकडून हार खावी लागली. भारताला गटातील पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकेच्या संघाने जोरदार लढत दिली. कप्तान सूर्यकुमार यादवच्या ८४ धावांच्या फटकेबाजीमुळे भारत या सामन्यात विजय बघू शकला. दुसऱ्या सामन्यात दुबळ्या नामिबियाचा भारताने ९७ धावांनी धुव्वा उडवला. तिसऱ्या सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने सहज विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात नवख्या हॉलंडला नमवून आपल्या गटात भारताने अव्वल स्थान मिळवले. माजी विजेत्या इंग्लंडला पहिल्याच सामन्यात नेपाळने जोरदार झुंज दिली. अवघ्या ४ धावांनी इंग्लंडने ही लढत कशीबशी जिंकली. दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान यांच्यातील गटातील सामना कमालीचा रंगला. अखेर दोन “सुपर ओव्हर”नंतर दक्षिण आफ्रिका संघाने ही थरारक लढत जिंकली. नवख्या फुटबॉलवेड्या इटलीने नेपाळचा पराभव करून स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करून स्पर्धेत धमाल उडवून दिली. झिम्बाब्वेने मात्र हा विजय मिळवत पहिल्यांदाच स्पर्धेच्या “सुपर एट”मध्ये खेळण्याचा मान मिळवला. यजमान श्रीलंकेनेदेखील ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून आरामात पराभव करून त्यांचे पहिल्या टप्प्यात “पॅकअप” करुन टाकले. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणावरुन स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. तर सुरूवातीला त्याचे समर्थन करुन पाकिस्ताननेदेखील भारताविरुद्ध आम्ही खेळणार नसल्याचा बोभाटा केला. पण शेवटी आयसीसीने तंबी दिल्यानंतर भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने होकार दिला. या गोष्टींचा अपवाद वगळता स्पर्धा सुरळीत पार पडली. आता पुढील स्पर्धा जिंकून भारत जेतेपदाची आगळी हॅटट्रिक पूर्ण करतो का पाहायचे..
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

