अगदी दोन दिवसांपूर्वीच नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकामध्ये राजकीय पक्षांना मतदान काय म्हणून करायचे, असा उद्विग्न प्रश्न विचारला होता. यावर अर्थात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे स्वागतच आहे. या प्रश्नावर प्रतिक्रिया येत असतानाच एका दुसऱ्या समस्येसाठी वरळी आणि परळ परिसराच्या सीमारेषेवरील सेंचुरी मिल कंपाउंडमध्ये असलेल्या इमारतींचा परिसर पायाखालून घालावा लागला. इथे तर प्रत्येक पावलागणिक यंत्रणाचा उद्धार करावा लागत होता. बरे, हा संपूर्ण विभाग वरळी, वरळीचा दूरदर्शन मानोरा, वरळी नाक्यावरील चकाचक इमारती, काहीतर अगदी परदेशातील इमारती वाटाव्यात इतक्या साफसुथऱ्या (बाकीचा विभाग बकाल असला तरी चालेल). दूरदर्शन मनोऱ्याच्या आजूबाजूच्या इमारतींनी तर या विभागाचा नूरच पालटून टाकला आहे, हे मान्यच करावे लागेल. पण या स्वप्ननगरीचा प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळल्यावर ‘बकवास’ रस्त्याने रसभंग झाला. जेथे सेंचुरी मिल कंपाउंड सुरु होते तेथेच मोठी ठेच लागली.
गेले दोन दिवस दररोज सुमारे दोन-अडीच तास तुलनेने टिचभर असलेल्या जागेबाबत (टीचभर अशा अर्थी की संपूर्ण वरळी विभागाचा विचार केला तर या सुमारे १३ / १४ इमारती) अनेक सुरस कथा कानावर आल्या. अगदी सेंचुरी कापड गिरणीतील कामगारांना डावलून अनेक बिगर कामगार या इमारतीत घुसले, काहींनी रग्गड पैसे घेऊन जागा विकल्या, अनेक कामगार अजून बाहेर आहेत, येथपासून ते आता हा नवीन इमारतींचा देखभालखर्च परवडत नाही येथपर्यंत. तक्रारीचा पाढा काहींनी वाचला, तर इतकी मोठी वसाहत आहे परंतु बेस्ट प्रशासनाने एक छोटी बसही येथे सुरु केलेली नाही इथपर्यंत.. प्रभादेवीच्या टाटा मोटर्सपासून या इमारतींपर्यंत पायपीट करावी लागते ही सर्वांचीच व्यथा होती. या परिसराची पायपीट करत असताना क्षणोक्षणी जाणवत होती ती गोष्ट म्हणजे अत्यंत बोगस रस्ते. रस्ते कसले, रस्ते नाहीच मुळी! यापेक्षा गावाकडील पायवाट बरी म्हणायची! रस्त्याचे, गटाराची कामे सुरु असल्याचे सांगण्यात आले. पण तसा बोर्ड मात्र कुठेही दिसून आला नाही. हा रस्ता तब्बल १२ वर्षे रखडला असून नजिकच्या भविष्यात तरी तो पुरा होईल की नाही याबाबत शंकाच आहे, असे मत एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केल, तर दुसऱ्या एकाने तर भन्नाटच कथा ऐकवली. मध्यंतरी कुणाच्या तरी डोक्यात इथपासून केइएम रुग्णालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्याची कल्पना होती म्हणे! म्हणून हा रस्ताही त्यानंतरच पूर्ण होईल अशी खोचक टिपणीही त्याने जोडली.

त्या परिसरात सर्वत्र खड्डे व सुरु असलेली कामे पाहून पावसाळ्यात तर रहिवाशांना चिखलातूनच प्रवास करावा लागतो अशी संतापयुक्त प्रतिक्रिया एका महिलेने व्यक्त केली. अधिक चौकशी करता या विभागाचे आमदार शिवसेन (उबाठा)चे ‘युवराज’ असल्याचे समजले. त्याआधी सचिनभाऊ होते असेही समजले. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही १२ वर्षे हे काम राखडले कसे याचे आश्चर्यच वाटले. (भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या क्षेत्रातही असे आढळले आहे) याचाच अर्थ स्पष्ट आहे की प्रशासकीय यंत्रणा मनात असेल तरच कामे जलद करतात, नाहीतर प्रभावशाली नेत्यांनाही रडवतात वा रखडवतात! एखाद्या रस्त्याचे बांधकाम सहा-नऊ महिने वा वर्षभर रखडू शकते. परंतु काम १२ वर्षे रखडणे समजण्याच्या पलीकडचे आहे. या परिसरातील देवीच्या मंदिरातून पायवाटेने प्रभादेवीकडे जाण्यास अवघी तीन-चार मिनिटे लगतात. येथे मात्र टकाटक रस्ते आहेत. आलिशान शो रूम्स आहेत. यांचे कोडे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीच समजून सांगावे. काहींशी बोलताना मात्र कडवट प्रतिक्रिया ऐकाव्या लागल्या. आम्ही गिरणी कामगार असल्यानेच आमच्या नशिबी असे खोदलेले रस्ते १२ वर्षासाठी आले. आमच्या वस्तीत कुणी मंत्री राहत असता (हे अशक्य आहे) तर या यंत्रणांनी अर्ध्या रात्रीत रस्ता गुळगुळीत केला असता. या संतापात त्या ज्येष्ठाचे काही चुकले आहे काय?
“काळतोंड्या बरकतीतून प्रवेशद्वाराबाहेरच्या क्षुब्ध मोर्चात
प्राणांकित श्वास अवरोधून
अगोदरच्या नकट्या हुंकाराचे साक्षीदार
आमच्या हाताहातात। चलो आझाद मैदान।
अन ओटीपोटात। झिन्दाबाद। मुर्दाबाद।” (प्रकाश जाधव)
आणि आता तर कामगार आणि अन्याय हे शब्दही कानावर पडत नाहीत, साहेब… असं सांगताना त्याचा आवाज दाटला होता. वाचक हो! काय बोलावे हे माझे मलाच समजत नव्हते. पूर्वीचे गिरणी कामगार आणि त्यांची कुटुंबे येथे राहतात हे कळल्यावर कुणालाही त्यांचे पडलेले नाही असे जणू सरकारी यंत्रणानी ठरवलेलेच असल्याने कितीही डोके आपटले तरी फायदा नाही हे जणू ठरलेलेच… महापालिका यंत्रणा अशी तर पोलीस यंत्रणाही काही कमी नाही! गिरणी कामगार आणि गुंडगिरी यांचा संबंध लावण्यात पोलीस तसें पटाईत असतात. मागील इतिहासातील काही उदाहरणेही बोलकी आहेत. तसेच एक संताजनक उदाहरण नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी इमारत क्रमांक १४ व १३च्या मध्यभागी घडले असे समजले. परंतु याबाबत कुणीही काहीही बोलण्यास तयार नव्हते. ‘आम्हीही असेच काहीसे ऐकले पण काही नेमके माहित नाही हो..’ यावरच माझी बोलवण झाली. मीही काही खोदून विचारलेनाही. कारण माझी माहिती पक्की होती. त्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही गायब झाले आहे, असे समजले! झाले असे की एक मोठा पोलीस अधिकारी साध्या वेशात देवीच्या देवळात आला होता. काय सणक आली देवीच जाणे त्याने एका तरुणाच्या श्रीमुखात सणकवली! झाले त्या तरुणाला कारणाशिवाय मारले हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या महिला बिथरल्याच! त्यांनी सरळ त्या अधिकाऱ्याच्याच कॉलरला हात घातला नंतर रात्री उशिरापर्यंत मोठा राडा झाला आणि याचे उट्टे नाम जोशी पोलीसठाण्याने (म्हणजे काही अधिकाऱ्यांनी हो) नंतरच्या काही दिवसांत काढले, अशी आतली खबर आहे. आता खबर आतील गोटातील असल्याने थोडी वाट तर पाहवी लागणारच… मिलेंगे ब्रेक के बाद…
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

