आंतरराष्ट्रीय पंच, ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्तीनिमित्त गोरेगावच्या अभिनव कला आणि क्रीडा अकॅडेमीने अभिनव क्रीडा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, वडगाव आणि स्पोटवूट यांच्या सहकार्याने येत्या १५ ते २० डिसेंबर या कालावधीत भव्य जिल्हास्तरीय सुपर लीग आणि बाद फेरी कबड्डी स्पर्धांचे आयोजन दिंडोशी, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे केले आहे. नागरी निवारा परिषद क्रमांक ८ येथील एनएनपी शाळेसमोरील प्रांगणात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत महिलांचे १२ तर पुरुषाचे २४ संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत या सामन्यांची पर्वणी विभागातील कबड्डीशौकिनांना मिळणार आहे.
कोकणच्या खेड तालुक्यातील महाळुंगे येथे भव्य अभिनव कला क्रीडा नगरी उभारून ग्रामीण भागातील क्रीडापटूंना कबड्डी आणि अन्य खेळांचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे स्वप्न अंकुश मोरे यांना साकारायचे आहे. त्यासाठी कबड्डी आणि अन्य खेळाच्या चाहत्यांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. गौरवनिधी कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून युवा होतकरू महिला आणि पुरुष कबड्डीपटूंना मोठे क्रीडापीठ मिळवून देण्यासाठी मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा हा भगीरथ प्रयत्न आहे. कबड्डीशौकिनांनी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गौरवमूर्ती अंकुश मोरे आणि अभिनव कला क्रीडा अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. स्पर्धेच्या समारोपाला शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक अरविंद वैद्य यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धा १५ डिसेंबरपासून
श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई, ठाणे आदी परिसरातील १७ वर्षे व ५५ किलो वजनाखालील इयत्ता दहावीपर्यंतच्या मुलामुलींच्या शालेय संघांची श्री उद्यानगणेश मंदिर कबड्डी स्पर्धा १५ व १६ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शालेय कबड्डी स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची असून प्रथम येणाऱ्या शालेय मुलांच्या ३२ संघांना आणि शालेय मुलींच्या १६ कबड्डी संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी संघांतील सर्व खेळाडूंना विनामूल्य कबड्डी टी शर्टस व अल्पोपहार दिला जाईल.
श्री उद्यानगणेश शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास रोख रु. ५,०००/-, उपविजेत्यास रोख रु. ३,०००/- व तृतीय क्रमांकास रोख रु. १,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या अथवा मुलींच्या शालेय कबड्डी संघांनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी समितीचे क्रीडा समिती निमंत्रक प्रकाश परब अथवा व्यवस्थापक संजय अहिर (८६५५२३३७७८), श्री उद्यानगणेश मंदिर कार्यालय (०२२-२४४६६६३४), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे संपर्क साधावा.

