Homeबॅक पेजकविसंमेलनाप्रमाणे ऐटीत संपन्न...

कविसंमेलनाप्रमाणे ऐटीत संपन्न झाले कुस्तीसंमेलन!

आपल्याकडे‌ साहित्यसंमेलन, विज्ञानसंमेलन, नाट्यसंमेलन, कवीसंमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात, पण कुस्तीसंमेलनाचेदेखील राज्यात गेली तीन वर्षं शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी क्रीडा‌प्रेमींना असेल. फलटण‌‌ येथील कुस्तीमित्र, कुस्तीवर प्रचंड प्रेम करणारे‌, कुस्तीवेडे‌ वस्ताद संपतराव जाधव, आपल्या सुजन फाऊंडेशनच्या माध्यमातून या महाराष्ट्र कुस्ती संमेलनाचे आयोजन करत आहेत. सुमारे सहा दशकांपेक्षा जास्त काळ या खेळात कार्यरत असलेल्या जाधव यांनी हा खेळ महाराष्ट्रात जास्तीतजास्त वाढवण्यासाठी आणि त्याचा योग्यप्रकारे प्रचार, प्रसार करण्यासाठी हे कुस्तीसंमेलनाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. प्रत्यक्ष कुस्ती सांगण्यासाठी आणि कुस्तीचे प्रबोधन योग्यरित्या करण्यात आपण कमी पडत असल्याची बाब जाधव यांच्या लक्षात आली. त्यामुळेच त्यांनी हा संमेलनाचा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. पहिले संमेलन फलटण‌‌ येथे २०२३मध्ये झाले. त्यानंतर दुसरे संमेलन सातारा येथे २०२४मध्ये संपन्न झाले, तर तिसरे संमेलन नुकतेच यंदा पुन्हा फलटण‌‌ येथे आयोजित करण्यात आले होते.

१९६५ साली छोट्या गावातुन‌ जाधव यांनी कुस्तीचा श्रीगणेशा सातारा येथील हनुमान व्यायाम मंडळातून केला. सुरूवातीला गावागावात होणाऱ्या जत्रांमधील कुस्ती सामन्यांत त्यांनी आपली ताकद अजमावली. त्याच जोरावर जाधव यांना सातारा, भुईंज येथील सातारा सहकारी साखर कारखान्यात काम मिळाले. त्यामुळे त्यांच्या कुस्तीला मोठी चालना मिळाली. “कामगार साखर श्री” किताब जिंकण्याचा पराक्रम जाधव यांनी केला. शहरी भागात ग्रामीण भागातील कुस्तीपटूंची फारशी दखल घेत नाही हे जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मर्यादा ओळखून आपल्या पंचक्रोशीत नाव कमवायचे याची खुणगाठ बांधली. कुस्ती खेळासाठी आपल्या कुवतीनुसार जे काही करता येईल ते मात्र अखंडपणे करत राहयाचा जणू काही ध्यासच त्यांनी घेतला. आठ-दहा कुस्ती मैदाने त्यांनी घेतली. २०१५-१६मध्ये महाराष्ट्र कुस्ती उपक्रम जाधव यांनी हाती घेतला. त्या उपक्रमातून त्यांनी विविध तालमींना भेटी दिल्या. तेथे कुस्ती पुढे नेण्याकरिता कायकाय करता येईल याबाबत अनेकांशी संवाद साधला. नवोदित पैलवानांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज युवा पैलवानांसमोर अनंत अडचणी उभ्या असल्याचे त्यांना जाणवले. त्यावर काही तोडगा काढण्यासाठी या खेळातील अनेक दिग्गजांशी सल्लामसलत‌ केली. नवी प्रतिज्ञा सुरु केली.

ही प्रतिज्ञा सर्व तालमीत म्हणावी यासाठी जाधव यांनी आग्रह धरला. विविध तालमीत होणाऱ्या प्रार्थना त्यांनी समजून घेतल्या. शंभरपेक्षा जास्त तालमींना या उपक्रमांर्तगत जाधव यांनी भेटी दिल्या. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. डिसेबर २०१९मध्ये शाहूपुरी तालमीत महाराष्ट्राचे पहिले‌ हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचा १५० पैलवानांच्या उपस्थितीत सुजन फाऊंडेशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. नंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५०पेक्षा जास्त खेळाडूंना सुजन फाऊंडेशनतर्फे गौरविण्यात आले. या यशस्वी सत्कार समारंभानंतर त्याचवेळी कुस्तीसंमेलनाची कल्पना जाधव यांना सुचली. या खेळाडूंचा कौतुकसोहळा आपण करु शकतो तर मग संमेलनाचे आयोजनदेखील आपण करू शकतो असा विश्वास जाधव यांना मिळाला. मग त्यातूनच संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिल्या संमेलनाला दोनशे जणांची उपस्थिती लाभली, तर ‌तिसऱ्या संमेलनाला हिच कुस्तीप्रेमींची उपस्थिती पाचशेच्या‌देखील पुढे गेली. कुठलीही सरकारी मदत न घेता लोकवर्गणीच्या माध्यमातून सुजन फाऊंडेशन हा संमेलनाचा उपक्रम राबवत आहे ‌ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.

जो तो कुस्तीप्रेमी आपल्याला जमेल तशी मदत या संमेलनासाठी करतो. सर्व कुस्तीप्रेमींची भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाते. माता-भगिंनीचा उचित गौरव केला जातो. इतरत्र त्यांची फारशी दखल कोण घेत नाही. पण संमेलनात त्यांची योग्य ती दखल घेतली जाते. कारण कुस्तीपटूंच्या जडणघडणीत माता-भगिंनींचा मोठा‌‌ वाटा आहेच. त्यांना‌ आर्दश‌ माता‌‌ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संपतराव जाधव यांना ‌हे संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांचे चिरंजीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अजितकुमार जाधव, राष्ट्रीय कुस्तीपटू मनोहर आडके, महापौर केसरी रवींद्र काकडे, मारुती माळी, सुधाकर माने, रामहरी वहिल, आयुष शेख, शुभांगी डोके यांचे मोलाचे सहकार्य‌ मिळत आहे. २००६ साली संपतराव जाधव यांनी सुजन फाऊंडेशनची स्थापना केली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या संमेलनाचा आनंद घेतात. संमेलनात होणारे‌ कुस्तीचे सामनेदेखील खास आकर्षण असते. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, ठाणे, अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद, धुळे येथील कुस्तीपटूंचा सहभाग या सामन्यात असतो. विजेत्यांना पाच मानाच्या गदा‌ दिल्या जातात. तसेच ढालीदेखील देण्यात येतात. त्याचबरोबर सन्मानपत्र, लंगोट, पदक, स्टीलचा दुधाचा ग्लास देऊन या पैलवानांना गौरविण्यात येते. दिवसभर कुस्तीशी निगडीत असे विविध कार्यक्रम संमेलनात राबवले जातात. कुस्ती सामने, या खेळात भरीव योगदान देणाऱ्या मंडळीचा गौरव, त्यांचे मार्गदर्शन, युवा पैलवानांना नवे डावपेच, नवे तंत्र, आधुनिक कुस्तीची माहिती संमेलनात करुन‌ दिली जाते.

या संमेलनात गौरविण्यात आलेल्या व्यक्ती-

ऑलिम्पिक वीर: पै. खाशाबा जाधव, कराड, पहिले हिंदकेसरी, पै. श्रीपती खंचनाळे, कोल्हापूर, हिंद केसरी पै. मारुती माने, कवठेपिरान जि. सांगली

ऑलिम्पिक वीर: पै. श्रीरंग जाधव, सातारा, पै. शंकरराव मदने, डिस्कळ. जि. सातारा यांना मरणोतर पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पै. नजरुद्दीन नायकवडी, इस्लामपूर, जि. सांगली, पै. सचिन बनकर, निमगांव जि. पुणे, पै. महालिंग खांडेकर, म्हसवड, जि . सातारा, पै. वसंतराव पाटील, मीरा भाईंदर जि. ठाणे, पै. संपतराव जाधव, आदर्की जि. सातारा, पै. मारूती माळी, रेंदाळ, जि. कोल्हापूर, पै. तानाजी घोरपडे, कोरेगांव जि. सातारा, पै. पांडूरंग शिंदे, इंदापूर, जिल्हा, पुणे, पै. जाकिर भाई मणेर, फलटण, जिल्हा सातारा, पै. रविंद्र काकडे, आदर्की जिल्हा सातारा, क्रीडा प्रशिक्षक, आष्टी, जि. बीड, महाराष्ट्र कुस्ती संमेलन.

पुरस्कार मानकरी: पै. आयुब शेख आरणगांव, जिल्हा अहिल्यानगर, पै. विष्णु आदनाक, क्रीडा शिक्षक आष्टी जि. बीड, पै. परशुराम लोंढे,  क्रीडा शिक्षक सांगली, पै. सौ पूजा पाटील क्रीडा शिक्षक मिरज जिल्हा सांगली, पै. कुमारी प्रतीक्षा सुतार, क्रीडा शिक्षक मुळशी, जिल्हा पुणे यांनादेखील या कुस्ती संमेलनात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आतापर्यंत १००पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनींचा संमेलनात उचित गौरव करण्यात आला. त्याचबरोबर इतर खेळातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “क्रीडावीर सन्मान” पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचीदेखील दखल घेतली जाते. आदर्श माता-भगिनींना शाल, मानचिन्ह, गौरवपत्र देण्यात येते. तर राष्ट्रीय खलिफा पुरस्कारप्राप्त विजेत्यांना मैदानी फेटा, मानाचा तुरा, मानचिन्ह, गौरव चिन्ह, प्रतिज्ञा प्रती, सन्मानपत्र, लंगोट, शिट्टी, शिवबंधन, खलिफा पट्टा, शाहूशेला दिला जातो.

भावी काळात या महाराष्ट्र कुस्ती संमेलनाची व्याप्ती आणखी नक्कीच वाढेल यात शंका नाही.

Continue reading

भारतीय फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी फक्त खुर्चीच्या राजकारणात!

‌विश्व चषक फुटबाॅल स्पर्धेसाठी अवघ्या दीड लाखाची लोकसंख्या असलेला कुराकाओ हा छोटा देश पात्र ठरतो आणि या स्पर्धेच्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घालतो. त्याउलट आज महासत्तेकडे झेप घेण्याची स्वप्न बघणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा भारताचा फुटबाॅल संघ २०२६मध्ये...

वाढलेल्या गवतामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला ८० कोटींचा फटका!

कसोटी क्रिकेट विश्वात १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा मोठा इतिहास असलेल्या प्रतिष्ठेच्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत जगप्रसिद्ध मेलबर्न स्टेडियममध्ये झालेला चौथा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला आणि क्रिकेटविश्वात कसोटी‌ सामन्यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु...

.. आणि भारतीय स्क्वॉश संघाने घातली विश्वविजेतेपदाला गवसणी

चेन्नई येथे आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारतीय संघाने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना चक्क विश्वचषकाला पहिल्यांदा गवसणी घालून एकच खळबळ माजवली. याअगोदर या स्पर्धेत भारताची मजल कांस्यपदकाच्या पुढे कधी गेली नव्हती. भारताने यंदा पहिल्यांदाच या...
Skip to content