गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या या प्रयोगाबाबत आपण जाणून घेऊया.
अमरेली जिल्हा शेतीबहुल परिसर आहे. इथली अर्थव्यवस्था शेतीआधारित आहे, बहुतेक लोक शेतीशी जोडलेले आहेत. जिल्ह्यातील काही भागात शेतकरी हिवाळी, उन्हाळी आणि पावसाळी पिके घेतात. परंतु सावरकुंडला हा एक असा भाग आहे, जो खारपट (क्षारप्रवण) म्हणून ओळखला जातो. या भागात खाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्यात एकच पीक घेतले जाते. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात पीक घेऊ शकत नाहीत. शकतात. खारपट परिसर असल्याने, बहुतेक शेतकरी कापसाची लागवड करतात. सावरकुंडला तालुक्यातील जिरा गावातील घनश्यामभाई या शेतकऱ्याने आपल्या अडीच बिघा जमिनीत खजूरची लागवड केली. सुरुवातीला त्यांना अनेकांनी वेड्यात काढले. परंतु या प्रगतीशील शेतकऱ्याला नव्या धाडसाची मधुर फळे मिळाली. आज त्यांना इतर पिकांपेक्षा चांगले उत्पादन मिळत आहे.

शेतातील पाण्याला 3,600 टीडीएस
घनश्यामभाई चोडवडिया यांनी पाच वर्षांपूर्वी अडीच बिघा जमिनीवर खजूर लागवड केली होती. आता त्यांना एका खजूर झाडापासून 12 ते 15 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यांनी नवसारी कृषी विद्यापीठ आणि अमरेली जल प्रयोगशाळेत पाण्याची चाचणी करून घेतली. त्यांच्या शेतातील पाण्यात 3,600 टीडीएसचा अहवाल मिळाला. जिरा गावातील या शेतकऱ्याने पीक पद्धतीत बदल केला. सुरुवातीला खजूर लागवड यशस्वी करणारे ते सावरकुंडला क्षेत्रातील एकमेव शेतकरी होते. पुढे त्यांच्याद्वारे प्रेरणा घेऊन इतरही अनेक शेतकऱ्यांनी खजूर लागवड सुरू केली आहे.
गुजरात सरकारचे भरघोस अनुदान
अमरेली जिल्ह्यातील 50हून अधिक शेतकऱ्यांनी विविध भागात खजूर लागवड सुरू केली आहे. खजूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना गुजरात सरकार प्रोत्साहन देत आहे. नवीन खजुराची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति झाड 1,250 रुपये मदत दिली जात आहे. एका शेतकऱ्याला प्रति हेक्टर जास्तीतजास्त 1 लाख 56 हजार रुपयांची मदत दिली जात आहे. अमरेली जिल्ह्यात हळूहळू खजूर लागवड वाढत आहे.

कोकणात खजूर लागवडीसाठी पोषक घटक
हवामान: कोकणात भरपूर पाऊस आणि दमट हवामान असते, जे खजुरासाठी आदर्श नाही. तरीही, काही शेतकरी खजुराची लागवड यशस्वीरित्या करत आहेत.
सिंचन: खजुराला पाणी आवश्यक आहे, परंतु कोकणात पावसाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता चांगली असते.
पीक: खजुराचे पीक घेण्यापूर्वी कोकणातील इतर प्रमुख पिकांचा अभ्यास करावा.
माती: क्षारयुक्त आणि जास्त पाऊस असलेल्या जमिनीत खजुराची लागवड केली जाऊ शकते, परंतु योग्य माती आणि सिंचन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
कोकणात खजूर लागवडीसाठी मार्गदर्शक बाबी
जमीन: कोकणातील जमीन साधारणपणे आम्लयुक्त (Acidic) असते आणि जास्त पाऊस पडतो. खजूर लागवडीसाठी क्षारयुक्त जमीन निवडणे चांगले.
लागवडीची वेळ: लागवडीसाठी ऑगस्ट-सप्टेंबर किंवा मार्च-मे या महिन्यांचा वापर केला जातो, जेणेकरून लागवडीनंतर रोपांना चांगली वाढ मिळेल.
लागवड पद्धत: 1.5 मीटर लांब, रुंद आणि खोल खड्डे तयार करा. वरची माती, वाळू आणि सेंद्रिय खत 3:1:1 प्रमाणात एकत्र करून खड्ड्यांमध्ये भरा. खड्ड्यांमध्ये साधारण 4 ते 5 मीटर अंतरावर खजुराची रोपे लावा. खजुराच्या रोपांची निर्मिती बियांपासून किंवा शाखीय पद्धतीने (Suckers) केली जाते.