राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या आरोग्य भवन येथून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे राज्यातल्या २० जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, १०५ उपजिल्हा रुग्णालये, ३७८ ग्रामीण रुग्णालये, २२ महिला रुग्णालये आणि ६० ट्रॉमा केअर युनिट्स अशा एकूण ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्रधुलाई होणार आहे. या संस्थांमध्ये एकूण २९,३१५ खाटांची क्षमता आहे.
याप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आता यांत्रिकी वस्त्रधुलाई सेवेमुळे रुग्णालयांमधील स्वच्छता, शिस्त आणि रुग्णसेवेचा दर्जा आणखी उंचावेल. महाराष्ट्रात सुरू झालेल्या यांत्रिक वस्त्रधुलाई सेवेकडे संपूर्ण देश पाहणार आहे. उद्या इतर राज्यांनीही ‘महाराष्ट्रात झाले तर आमच्या राज्यात यांत्रिक पद्धतीने वस्त्रधुलाई सेवा कधी सुरू होणार?’ असा प्रश्न विचारला तर आश्चर्य वाटायला नको.

या प्रकल्पांतर्गत सरकारी आरोग्य संस्थांतील बेडशीट, उशांचे कव्हर, ब्लँकेट, रुग्णांचे आणि कर्मचाऱ्यांचे गणवेश, पडदे, टॉवेल आदी वस्त्रांची निर्जंतुक धुलाई पूर्णतः यांत्रिक पद्धतीने केली जाणार आहे. बॅरिअर वॉशिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून मानवी हस्तक्षेपाशिवाय कपडे धुतले जातील. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाला संक्रमणमुक्त आणि स्वच्छ लिनन उपलब्ध होईल. सेवेच्या सुसूत्रता आणि कार्यक्षमतेसाठी दर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्स वापरण्याची प्रणाली लागू करण्यात आली आहे. यात सोमवार व गुरुवार पांढरा, मंगळवार आणि शुक्रवार हिरवा तसेच बुधवार आणि शनिवार गुलाबी या रंगाच्या बेडशिट्स वापरण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी बाह्य खासगी संस्थेमार्फत करण्यात येत असून, संपूर्ण राज्यातील लिनन गोळा करणे, प्रतवारी करणे, निर्जंतुकीकरण करणे व वितरण करणे हे सर्व काम मानवी हस्तक्षेपाशिवाय यांत्रिक पद्धतीने केले जाणार आहे. या सेवेच्या माध्यमातून रुग्णांना स्वच्छ, निर्जंतुक आणि सुरक्षित लिनन उपलब्ध होणार असून, त्यामुळे संक्रमणजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह उपस्थित होते.