भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड दबावाखाली आहे. सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा सामना करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स 900 अंकांपेक्षा जास्त घसरला. निफ्टी 22,600च्या खाली आला तर आयटी निर्देशांक 2% घसरला. इंडिया VIX मध्ये 4%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. बाजारातील ही घसरण अन् अनिश्चितता सामान्य नाही. गेल्या 30 वर्षांत, फक्त 3 वेळाच असे घडले आहे की, बाजारात 4 ते 5 महिने सतत घसरण झाली आहे. यापूर्वी 1996, 2001, 2004मध्ये ही अशी घसरण दिसून आली होती. या आठवड्यातही बाजार आणखी असाच खाली जात राहिला तर मात्र 30 वर्षांचा विक्रम मोडला जाईल.
भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी सलग पाचव्या सत्रात घसरले. ग्राहकांच्या मागणीत घट आणि टॅरिफ धोक्यांमुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेतही कमकुवतपणा दिसत आहे. भारतीय बाजारात आज सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक विक्री दिसून आली.
जागतिक बाजारपेठेतील निरीक्षण-
* अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे वॉल स्ट्रीटच्या वर्षातील सर्वात वाईट कामगिरीनंतर आशियाई शेअर बाजारांमध्ये घसरण सुरू आहे.
* जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीत रूढीवादी पक्षाने अव्वल स्थान मिळवल्यानंतर युरोला बळकटी मिळाली आहे.

भारतीय बाजारात घसरणीमागील काय आहे कारण?
* अमेरिकन ग्राहकांमध्ये सेंटीमेंटल प्रेशर.
* स्टॅगफ्लेशनची चिंता.
* मुख्य चलनवाढीच्या आकडेवारीपूर्वी सावधगिरी.
* जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता: अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीची चिन्हे.
* परदेशी गुंतवणूकदारांकडून (FII) मोठ्या प्रमाणात विक्री: एफआयआय भारतीय बाजारातून सतत पैसे काढत आहेत.
* देशांतर्गत चलनवाढ आणि व्याजदरांचा परिणाम: गुंतवणूकदारांमध्ये भीती.
सेन्सेक्स 76,000च्या पुढे जाईल की आणखी घसरेल?
* बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर सेन्सेक्स 76,000च्या वर राहिला तर हा ट्रेंड बदलू शकतो. परंतु जर ते 75,800च्या मजबूत आधारपातळीच्या खाली गेले तर घसरण आणखी वाढू शकते.
पुढे काय?
*”नोमुरा”ने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, डिसेंबरपर्यंत बाजारात आणखी सुधारणा होऊ शकतात. त्यांचा अंदाज आहे की, भारतीय बाजारपेठ आणखी 4% ने घसरू शकते. दुसरीकडे, जर सरकार आणि रिझर्व्ह बँकेने ठोस पावले उचलली, तर बाजारात स्थिरता येऊ शकते.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला-
* बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते म्हणून सध्या कोणत्याही ट्रेड, गुंतवणुकीपासून दूर राहा.
* मोठ्या घसरणीत चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी असू शकते; पण तज्ञांच्या सल्ल्यानेच हा धोका पत्करा. सध्या बाजारात तेजी आहे की मंदी त्या दिशेचा अंदाज अवघड आहे.
* जागतिक ट्रेंडवर लक्ष ठेवा, कारण परदेशी बाजारपेठांचा भारतीय शेअर बाजारावर थेट परिणाम होतो. परदेशी संकेत सुधारण्याची वाट पाहा, धीर धरा, शांत राहा.
* कमी महागाई आणि करसवलतीच्या अपेक्षेसह, हा काळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी ठरू शकतो. बाजारातील चढउतारांमध्ये गुंतवणूकदारांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.