भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (सीओएएस) काल 24 ते 27 फेब्रुवारीदरम्यानच्या फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
आज सीओएएस पॅरिसमधील लेझ इनव्हॅलिड्स येथे फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. गार्ड ऑफ ऑनरनंतर जनरल पियरे शिल, फ्रेंच आर्मी चीफ (सीइएमएटी) यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक दृढ करणे आणि सामरिक सहकार्याचे नवे मार्ग शोधणे हा आहे. यानंतर इकोल मिलिटरै ही प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्था आणि लष्करी संकुल येथे ते भेट देतील. तेथे त्यांना फ्युचर कॉम्बॅट कमांड (सीसीएफ) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. याशिवाय, ते फ्रेंच लष्कराच्या तांत्रिक विभाग (एसटीएटी) येथे भेट देऊन तांत्रिक नवोपक्रमांवर माहिती घेतील. त्यानंतर ते व्हर्साइल्स येथील बॅटल लॅब टेरे येथे लष्करी संशोधन आणि विकासाबाबत माहिती घेतील.
उद्या, 25 फेब्रुवारीला जनरल द्विवेदी मार्सेल येथे प्रवास करतील. तेथे ते फ्रेंच लष्कराच्या तिसऱ्या विभागाला भेट देतील. येथे त्यांना तिसऱ्या विभागाच्या प्रमुख जबाबदाऱ्या, त्यांची मोहीम आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव, संयुक्त प्रशिक्षण उपक्रम, फ्रेंच लष्कराच्या आधुनिकीकरण प्रकल्प (स्कॉर्पियन) यासंदर्भातही त्यांना माहिती दिली जाईल. 26 फेब्रुवारीला जनरल द्विवेदी कार्पीगनला भेट देतील, जिथे त्यांना स्कॉर्पिअन विभागाच्या अत्याधुनिक युद्धनीतीचे थेट प्रात्यक्षिक पाहता येईल. यावेळी थेट गोळीबारासह युद्धकौशल्यांचे सादरीकरण केले जाईल.
27 फेब्रुवारीला लष्करप्रमुख न्यूवे चॅपल इंडियन वॉर मेमोरियल येथे भेट देऊन पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र अर्पण करतील. ही श्रद्धांजली भारताच्या ऐतिहासिक लष्करी योगदानाची आठवण करून देणारी असेल. त्यानंतर ते इकोल डे गुरे de (फ्रेंच संयुक्त कर्मचारी महाविद्यालय) येथे व्याख्यान देतील. तेथे ते आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि भारताचा भविष्यातील सामरिक दृष्टिकोन यावर विचार मांडतील.