गोव्याच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) येथे उद्यापासून १ फेब्रुवारीपर्यंत भारत रंग महोत्सव, हा भारतीय आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात येत आहे. अभिनेता राजपाल यादव या भारत रंग महोत्सवाचे रंगदूत आहेत. ‘भारंगम’ या नावाने ओळखला जाणारा भारत रंग महोत्सव हा जगातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव आहे. २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या २० दिवसांच्या काळात भारत रंग महोत्सवात भारताव्यतिरिक्त नऊ वेगवेगळ्या देशांतील दोनशेहून अधिक अनोखे नाट्याविष्कार सादर केले जाणार आहेत.
उद्या संध्याकाळी सहा वाजता पणजीतल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होईल. कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा यांच्या सहकार्याने आयोजित, या चारदिवसीय महोत्सवात कला अकादमी येथे चार नाटके सादर होणार आहेत. गिरीश कर्नाडलिखित ‘नागमंडल’, या हिंदी नाटकाने महोत्सवाची सुरूवात होईल. त्यानंतर विजयकुमार नाईकलिखित पालशेतची विहीर (मराठी), विजयदान देठालिखित माय री मैं का से कहूं (हिंदी) आणि मिथिलेश्वरलिखित बाबूजी (हिंदी) ही नाटके सादर होतील.

‘एक रंग, श्रेष्ठ रंग’ (एक अभिव्यक्ती, सर्वोच्च निर्मिती) या संकल्पनेअंतर्गत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या २० दिवसांच्या काळात भारत रंग महोत्सवात भारताव्यतिरिक्त नऊ वेगवेगळ्या देशांतील दोनशेहून अधिक अनोखे नाट्याविष्कार सादर केले जाणार आहेत. भारतात ११ ठिकाणी आणि परदेशात काठमांडू तसेच कोलंबो या दोन ठिकाणी ते सादर केले जातील. महोत्सवाचा केंद्रबिंदू असलेल्या दिल्लीसह भारतात गोवा, आगरतळा, अहमदाबाद, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, गोरखपूर, जयपूर, खैरागड आणि रांची येथे हे नाट्याविष्कार सादर होणार आहेत. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर कार्यरत असलेले रशिया, इटली, जर्मनी, नॉर्वे, झेक रिपब्लिक, नेपाळ, तैवान, स्पेन आणि श्रीलंका या देशातील नाट्यसमूह सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाबद्दल बोलताना, एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी म्हणाले की, भारत रंग महोत्सव हा व्यापक दृष्टीकोन असलेला जागतिक व्यासपीठावरचा सर्वोत्कृष्ट नाट्यमहोत्सव बनला आहे. या महोत्सवामुळे जगभरातील रंगकर्मींना नाट्यकला सादरीकरणासाठी एक व्यासपीठ तर प्राप्त होतेच पण त्याचबरोबर पारंपरिक कलाप्रकारांच्या एकत्रिकरणाची संधीही मिळते.
अभिनेते राजपाल यादव यावेळी म्हणाले की, १९९७मध्ये एनएसडीचा विद्यार्थी म्हणून पदवी घेतल्यानंतर, ‘भारंगम’साठी रंगदूत म्हणून एनएसडीमध्ये परतणे म्हणजे आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. चित्रपटसृष्टीतली कारकिर्दीचा रौप्यमहोत्सव साजरा करत असताना, या आगळ्या मेळाव्याचा भाग होण्याची संधी मला मिळाली आहे. विशेष म्हणजे, भारत रंग महोत्सव, एनएसडीचा ६५वा वर्धापनदिन आणि एनएसडी रेपर्टरी कंपनीचा ६०व्या वर्धापनदिनाचा योगायोग साधत आहे. हे टप्पे लक्षात घेऊन, रेपर्टरी कंपनी रंगषष्ठी नाट्यमहोत्सव मालिका साजरी करत आहे. या मालिकेमध्ये देशभरातील विविध व्यासपीठांवर त्यांची काही सर्वात लोकप्रिय नाटके सादर केली जात आहेत. कंपनीच्यावतीने या महोत्सवादरम्यान कोलंबो, काठमांडू, बेंगळुरू आणि गोवा आदी ठिकाणी त्यांची निर्मितीदेखील सादर केली जाणार आहे.