Homeडेली पल्सगोव्यात 56व्या 'इफ्फी'ची...

गोव्यात 56व्या ‘इफ्फी’ची सांगता!

गोव्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) काल सांगता झाली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनामी चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्काराने गौरवण्यात आले. दिग्दर्शक संतोष डावखर यांना ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार देण्यात आला. उबेइमार रिओस यांना सर्वोत्तम अभिनेता तर जारा सोफिया ओस्तान यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. इराणी दिग्दर्शक हेसाम फराहमंद आणि एस्टोनियन दिग्दर्शक टोनीस पिल यांना दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आली.

गेले आठ दिवस सिनेमाचा उत्सव साजरा करणाऱ्या महोत्सवाच्या काल गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे दिमाखात समारोप झाला. मोहक सांस्कृतिक सादरीकरणांनी उजळलेला आणि देश-विदेशातील नामांकित चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने या महोत्सवाला शोभा आली. विविध स्थळांवर प्रदर्शित झालेल्या प्रभावी चित्रपटांनी आणि रंगतदार कलात्मक सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. इफ्फीची सांगता थायलंडचे दिग्दर्शक रॅचापूम बूनबुंचाचोक दिग्दर्शित ‘अ युजफुल घोस्ट’ या चित्रपटाने झाली. सायंकाळच्या उत्सवी वातावरणात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांना गौरविण्याच्या कार्यक्रमाने. ‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनामी चित्रपटाने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सर्वात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. चित्रपटाची दिग्दर्शिका एशली  मेफेअर यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि  केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते सुवर्ण मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गोंधळ, या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘अ पोएट’ या कोलंबियन चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी उबेइमार रिओस यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) रौप्य मयूर पुरस्कार देण्यात आला. ‘लिटिल ट्रबल गर्ल्स’ या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी यारा सोफिया ओस्तान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (स्त्री)साठीचा रौप्य मयूर पुरस्कार देण्यात आला. चित्रपटाचे निर्माते मिहेक चेर्नेच यांनी याराच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. ‘माय फादर्स शॅडो’ या चित्रपटासाठी अकिनोला डेव्हिस ज्युनिअर यांचा विशेष परीक्षक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. इराणच्या ‘माय डॉटर्स हेअर’ आणि एस्टॉनियाच्या ‘फ्रँक’ या चित्रपटांसाठी हेसाम फराहमंद आणि टोनीस पिल यांना संयुक्तपणे दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘केसरी चॅप्टर २’ या चित्रपटाला प्रभावी चित्रण केल्याबद्दल सन्मान प्रदान करण्यात आला. नाॅर्वेच्या एरिक स्वेन्सन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सेफ हाऊस’ चित्रपटाने प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकावर नाव कोरले. या चित्रपटाच्या वतीने आयसीएफटी जुरी मनोज कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘बंदिश बँडेट्स सिझन 2’ या वेब सिरीजला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार मिळाला.

दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या सुवर्णमहोत्सवी चित्रपट कारकिर्दीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अभिनेते रणवीर सिंह यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षी वेव्हज बाजार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1050 कोटी रुपयांची उलाढाल झाली. महिला शक्तीला सक्षम करण्याच्या प्रयत्नात यावेळच्या इफ्फीत 50 महिला चित्रपट निर्मात्यांचा समावेश करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच एआय हॅकथॉनचे आयोजन करण्यात आले. ‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो’ या उपक्रमात तब्बल 125 प्रतिभावान तरुणांनी सहभाग नोंदवला. यंदा दिवंगत झालेल्या धर्मेंद्र, कामिनी कौशल, सुलक्षणा पंडित, सतीश शाह, पियूष पांडे, ऋषभ टंडन, गोवर्धन असराणी, पंकज धीर, वरिंदर सिंह घुमन, जुबीन गर्ग, बाळ कर्वे, जसविंदर भल्ला, ज्योती चांदेकर, रतन थियाम, बी. सरोजा देवी, शेफाली जरीवाला, पार्थो घोष, विभू राघवे, शाजी एन. करुण, मनोज कुमार, आलोक चॅटर्जी, श्याम बेनेगल आणि झाकिर हुसेन यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. रमेश सिप्पी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अभय सिन्हा, ओमप्रकाश मेहरा आणि किरण शांताराम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समारोपाच्या समारंभात भारतीय सांकेतिक भाषेतील दुभाष्यांची उपस्थिती महोत्सवातल्या सर्वसमावेशकतेची जाणीव करून देणारी ठरली.

Continue reading

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...

अमेरिकी कोर्टाचा ट्रम्पना झटका! भारतीय कर्मचारी-विद्यार्थ्यांना दिलासा!!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाला अमेरिकन न्यायालयाने एक मोठा दणका दिला आहे. एच१-बी व्हिसावर नव्याने लावण्यात आलेली तब्बल १ लाख डॉलरची (सुमारे ९५ लाख रुपये) भक्कम फी 'बेकायदेशीर कर' असल्याचे सांगत बोस्टन येथील फेडरल कोर्टाने नुकतीच ती...

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...
Skip to content